महाभारत युद्ध म्हटले कि आपल्या डोळ्यासमोर १८ औक्षोहिणी सेनेच्या युदधाचा एक भलामोठा पट उभा राहतो . पण हे १८ औक्षोहिणी म्हणजे नक्की किती ? व एवढे सैन्य खरोखरीच अस्तित्वात होते का? महाभारतातील आदिपर्वाच्या दुसऱ्या अध्यायात दिलेल्या माहितीवरून घेतलेला हा वेध .
महाभारताच्या १८ पर्वांमधे वर्णन केलेल्या, महाभारतातील १८ दिवसांच्या कौरव-पांडव युद्धा मध्ये १८ औक्षोहिणी सेना सहभागी झाली होती . या औक्षोहिणी शब्दाचा अर्थ व त्यातील विविध सेना विभागांची संख्या महाभारताच्या आदिपर्वातील दुसऱ्या अध्यायातच सुमारे ९ श्लोकांमध्ये विस्ताराने दिलेली आहे. यानुसार एक औक्षोहिणी सैन्यात २१८७० गज (हत्ती) व तितकेच रथ असतात, अश्वांची संख्या ६५,६१० असून पदाती सैनिकांची संख्या १,०९,३५० असते यातील छोट्या-छोट्या विभागांसाठी चढत्या क्रमाने पत्ती, सेनामुख, गुल्म, गण, पृतना, चमू व अनीकिणी अशी नावे आहेत. यांचे परस्परसंबंध व चढती भाजणी खालील तक्त्यामध्ये दर्शविली आहे.
कौरवांच्या बाजूने लढलेले एकूण सैन्य = ११ x १०९३५० = १२,०२,८५०
आणि पांडवांच्या बाजूने लढलेले एकूण सैन्य = ७ x १०९३५० = ७,६५,४५०
म्हणजेच युद्धातील एकूण सैन्य = १८ x १०९३५० = १९,६८,३०० (सुमारे २० लाख माणसे )
एवढे प्रचंड मनुष्यबळ खरोखरीच होते काय ?
याचाच अर्थ असा की या श्लोकांनुसार सुमारे २० लाख मनुष्य सैनिक कुरुक्षेत्रावर एकवटले होते. एवढ्या प्रचंड मनुष्यबळासाठी अर्थातच जेवणखाण तयार करण्यासाठी आचारी,युद्ध तयारीसाठी, शस्त्रास्त्र तयारीसाठी, निवास, पाणी, जनावरांची देखभाल आणि दाणा पाणी करण्यासाठी, रथांची डागडुजी करण्यासाठी, जखमींवर मलमपट्टी इत्यादींसाठी अजून किमान लाखभर तरी माणसांची आवश्यकता पडेल. तत्कालीन लोकसंख्या पाहता ही गोष्ट अशक्यप्राय वाटते. या एवढ्या लढाऊ सैनिकांवर अतिरिक्त न लढणारे व कामासाठी उपयोगात आणले जाणारे विविध प्रकारचे कारागीर जसे रस्ता दुरुस्ती साठी लागणारे कारागीर भाले तलवारी धनुष्य-बाण इत्यादी शस्त्रास्त्रे तयार करण्यासाठी लागणारे कारागीर, याच बरोबर जनावरांची कातडी कमावून पाण्याच्या पखाली बनवण्यासाठी चर्मकार, या व्यक्तींची देखील या युद्धासाठी आवश्यकता होती. युद्धाशी निगडित असणाऱ्या या सर्व व्यक्तींना व्यतिरिक्त अनेक स्त्रिया, युद्धात भाग न घेणाऱ्या इतर व्यक्ती म्हणजे बालके, वृद्ध, अपंग या सगळ्यांचा एकत्रितपणे विचार केला तर तत्कालीन लोकसंख्या काही कोटींच्या घरात असायला हवी जी गोष्ट अशक्यप्राय वाटते.
अबब - किती हत्ती , किती घोडे ?
या औक्षोहिणी सैन्याच्या उल्लेखा मध्येच अश्व, गज इत्यादी प्राण्यांच्या संख्यादेखील दिलेली आहे. या प्रत्येक औक्षोहिणी मागे २१८७० गज (हत्ती) आणि ६५६१० अश्व म्हणजेच एकूण सुमारे ४ लाख हत्ती आणि बारा लाख अश्व सांभाळणे व त्यांच्या खाण्यापिण्याची आणि देखभालीची व्यवस्था करणे भाग आहे. यातील रथांची संख्या देखील औक्षोहिणी मागे २१,८७० एवढी आहे म्हणजेच सुमारे चार लाख रथ युद्धात वापरले गेले असले तर ते बनवण्यासाठी प्रचंड कारागीर,लोखंड, लागेल. सर्व च रथ इतर प्रदेशातून आणणं शक्य नसल्यामुळे त्यातील बरेचसे रथ हस्तिनापुर मध्येच बनवले असण्याची आवश्यकता आहे. तसेच त्यांची दुरुस्ती देखील तेथेच व्हायला हवी म्हणजे ते दुरुस्त करणारे कुशल कारागीर देखील इतर प्रदेशातून हस्तिनापुर कडे यायला हवे.
या महायुद्धात १८ औक्षोहिणी सेनेचा नाश झाला मात्र अश्व, गज यासारख्या जीवित राहणाऱ्या प्राण्यांना कोणी विनाकारण मारत नाही त्यामुळे यातील काही लाख प्राणी तरी निश्चितच मागे उरले असतील. हे सर्व आणले कुठून व त्यांचे पुढे काय झाले ? पण त्यांच्या बद्दलचा कोणताही उल्लेख महाभारतात येत नाही, कारण त्यांची संख्याच प्रत्यक्षात एवढी मोठी नाही.
या सर्व गोष्टी विचारात घेता एवढी प्रचंड मनुष्य संख्या या युद्धात असणे शक्य नाही असे वाटते याचे कारण मुख्यत्वे युद्ध करण्यास धडधाकट असणारी एवढी लोकसंख्या तत्कालीन भारत वर्षात अस्तित्वात नव्हती. याच्या स्पष्टीकरणासाठी उदाहरण म्हणून आपण महाभारतातील एक छोटासा प्रसंग पाहू.
विराटाचे युद्ध ... नेमके किती मोठे ?
विराटाचा मेहुणा व सेनापती किचक आणि त्याचे १०५ बंधू (उपकिचक) यांचा भीमाने अज्ञातवासात असताना वध केला. ही बातमी हस्तिनापुरात पोहोचताच ,विराटचे राज्य आता दुबळे झाले आहे व त्यांचे गोधन (जी तत्कालीन मुख्य संपत्ती होती) आपल्याला सहजपणे लुटता येईल या उद्देशाने प्रथम त्रिगर्तराज सुशर्मा याने विराटावर हल्ला केला. हा हल्ला परतविण्यासाठी विराटाला बृहन्नडा रूपातील अर्जुन वगळता, इतर चार पांडवांची ही मदत घ्यावी लागली ज्यात आचारी असलेला भीम देखील होता. या सर्वांनी मिळून सुशर्माचा पराभव केला पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूने गोधन लुटण्यासाठी कौरवांनी हल्ला केला. या हल्ल्यात देखील भीष्म, द्रोण, कर्ण इत्यादी वीरांना पण सहभागी व्हावे लागले होते. केवळ गोधन लुटण्यासाठी एवढे सारे वीर मग याचा अर्थ लढाऊ सैनिक फार उपलब्ध नव्हते का ?
तिकडे विराटाची परिस्थिती पहा. त्याचे सैन्य म्हणजे जमवाजमव केलेले मिळेल त्या हत्याराने थोडेफार लढू शकणारे नगरजन असावेत . ते सर्व देखील सुशर्माशी लढायला गेल्यावर राजपुत्र उत्तर कडे थोडीफार माणसे असावीत पण कौरव सेनेवर चालून रथातून जाण्याकरता सारथी देखील नव्हता आणि ते काम बृहन्नडा रुपी अर्जुनाला कराव लागलं. ज्यात त्याने नंतर गांडीव धनुष्य हातात येत कौरव महारथी त्यांच्या थोडक्या सैन्याचा पराभव करीत कुरूंचं आक्रमण परतवून लावलं. या सर्व प्रसंगांवरून आपल्या असे लक्षात येते कि या गो-ग्रहण युद्धात सुशर्माचे शे दोनशे सैनिक असावेत व विराटाचे थोडे जास्त. कुरुंचेही सैन्य फार नसावं व त्यामुळेच अर्जुन त्यांना सहज हरवू शकला . एकंदरीतच या सर्व प्रसंगात विराटासारख्या लहान राजाची व सुशर्मा व कुरु या सर्वांची मिळून ५०० माणसं देखील नसावीत .
महाभारतीय युद्ध हे महायुद्ध असल्याने त्यात सैनिकांची हस्तिनापुरात लढण्यायोग्य सैनिक व तसेच विविध राजांकडून केलेली जमवाजमव पाहता हि संख्या जास्तीत जास्त २० ते २५ हजाराच्या घरात जाईल . यातील हत्तीची संख्या देखील १०-१५ पेक्षा जास्त नसावी (हत्तीचे उल्लेख फारच कमी येतात). मात्र बरेचसे महारथी रथातून लढत असल्याने रथांची संख्या ५०-६० असू शकेल. घोडा हा प्राणी युद्धात वापरला जात असला तरी घोड्यांवरून युद्ध केल्याचे उल्लेख नाहीत, म्हणजेच तो मुख्यत्वेकरून रथांसाठीच वापरला जात असावा असे वाटते,
द्वंद्व युद्धाने एवढी मोठी हानी होऊ शकेल ?
आणखी एक गोष्ट विचारात घेतली पाहिजे ती म्हणजे युद्ध ज्या प्रकारे लढले गेले तो प्रकार बहुतांशी द्वंद्वयुद्धाचा होता. एक वीर दुसऱ्या (एकाच) वीराशी त्याच्या शस्त्र कौशल्यानुसार लढत होता. या प्रकारात एवढ्या मोठ्या सैन्यासाठी धनुष्यबाण , तलवारी, भाले , गदा यांसाठी प्रचंड प्रमाणावर लोखंड लागेल, जे उपलब्ध असेल कि नाही याची शंकाच आहे. अस्त्रांचा उपयोग फार कमी होता त्यामुळेच एवढ्या लक्षावधी सैन्याची हानी फक्त द्वंद्व युद्धाने केवळ १८ दिवसात होणे शक्य नव्हते. युद्धात तोफा अथवा अस्त्रे वापरली गेली तरच एवढा मोठा विध्वंस कमी कालावधीत शक्य आहे आणि असे असेल तर मग युद्ध १८ दिवस चालवायची तरी काय आवश्यकता होती.
या सर्वांचा सारासार विचार करता मला असे वाटते कि युद्धातील सैनिकांची संख्या निश्चितच फार मोठी नसावी. मी बांधलेला २०-२५ हजार सैनिकांच्या अंदाजाचा आकडा देखील कदाचित मोठा असू शकेल. एवढ्या मोठया पानिपत युद्धात देखील हि संख्या फक्त सव्वा ते दीड लाखाच्या घरात होती.
तुम्हाला काय वाटतं ?
खूप छान लेख आहे. मनापासून धन्यवाद . फक्त एक छोटासा प्रश्न मनात आला की अक्षोहिणी ही संख्या कुठल्या आधारावर बनली . कारण जवळपास बऱ्याच पौराणिक किंवा पुराणात अक्षोहीनी ही value वापरली आहे
ReplyDeleteहा लेख महाभारताच्या पहिल्या (आदिपर्वात) पर्वात दिलेल्या माहितीवर आधारलेला आहे. यातील तक्ता जसाच्या तसा त्याच माहितीवरून घेतलेला आहे. यावरून आपल्या पूर्वजांना एवढ्या मोठ्या संख्या मोजता येत होत्या एवढं समजतं. पण खरंच एवढी लोकसंख्या अस्तित्वात होती का हा एक प्रश्नच आहे.
Deleteमला असे वाटते की एका दिवशी एक अक्षोहीणी युद्धात उतरली असेल. अशी १८ दिवस १८ अक्षोहीणी. प्रत्येक दिवशी सूर्यास्तानंतर युद्ध बंद झाल्यावर दुसऱ्या दिवशी जे नुकसान झाले आहे त्याप्रमाणात सैन्य जमवून अक्षोहिणी तयार करत असतील. त्या वेळी नियम वेगळे असतील.
ReplyDeleteपण आदिपर्वात दुसऱ्या अध्यायात जी संख्या दिली आहे ती अगदीच अवास्तव वाटते त्यामुळे तो गणतीत धरून योद्धे मोजता येत नाहीत.
Delete