महाभारताचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. सुमारे एक लक्ष श्लोकांसह
जगातील सर्वात मोठे काव्य म्हणून मान्यता पावलेले
महाभारत जिथून सुरु होते तिथेच ते संपते देखील.
हे कसे? आपण जी कथा वाचतो ही कथा लोमहर्षण (अथवा रोमहर्षण) यांचा पुत्र उग्रश्रवा सौती नैमिषारण्यातील शौनकादि ऋषींना सांगतो तेथपासून. आता आपण या कथेचा उगम पाहू.
महाभारत युद्धामध्ये कौरव-पांडवांकडील सर्व योद्धे मारले जातात व वाचतात केवळ पांडव. पांडवांचा वंश शिल्लक राहतो तो केवळ अर्जुन-पुत्र अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या पोटी. युद्धानंतर ३६ वर्षे युधिष्ठिर राज्य करतो व
पांडवांच्या पश्चात अभिमन्यूपुत्र परीक्षित राजा होतो आणि पांडव स्वर्गारोहणाला निघून जातात. राजा परीक्षिताचा मृत्यू सर्प दंशाने होतो व हे कळल्यावर परीक्षिताचा पुत्र (अभिमन्यूचा नातू) राजा जनमेजय हे सर्पसत्र (सर्पसत्र म्हणजे सर्पांची आहुती देणारा यज्ञ) आयोजित करतो. या यज्ञासाठी आलेले वैशंपायन नावाचे ऋषी राजा जनमेजयाला आपल्या आजोबा-पणजोबांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगण्यासाठी या भारत कथेचं निवेदन करतात. (
सर्पसत्र सध्याच्या तक्षशिला परिसरात, जे आता पाकिस्तानात आहे, तेथे झाले असे मानण्यात येते). त्यांनी हि कथा
जय या नावाने व्यास महर्षींच्या तोंडून ऐकलेली असते. त्यात स्वतःच्या उपकथानकांची भर घालून ते त्याला
भारत बनवतात. अशा रीतीने हे एक वर्तुळ पूर्ण होतं. याच यज्ञाच्या ठिकाणी ही कथा सौतीने ऐकली आणि आपल्या अनेक उपकथानकं व रूपक कथांची भर घालून त्याचं जे महाकाव्य बनलं तेच आपण ऐकत / वाचत असलेलं
महाभारत.
व्यासांचे जय हे केवळ ८८०० श्लोकांचं असल्याचं मानलं जातं , तर वैशंपायनांचे भारत २४००० श्लोकांचं बनलं. आणि उग्रश्रवा सौतीनी जेव्हा ते नैमिषारण्यात शौनकादी मुनींना सांगितले तेव्हा ते सुमारे १ लक्ष श्लोकांचे बनले (मुख्य महाभारताचे ८४००० श्लोक + १६००० श्लोकांचे खिलपर्व किंवा हरिवंश ) . अर्थात हि सत्यासत्यता आपल्याला तपासून पाहता येत नाही.
असं हे महाकाव्य भारताच्या किंवा जगाच्या इतर काव्याच्या तुलनेत किती मोठे आहे हे आपण या लेखासोबत असलेल्या एका तुलनात्मक तक्त्याद्वारे पाहू शकतो. महाभारत हे रामायणाच्या सुमारे चार पट मोठे असून इलियड व ओडिसी या ग्रीक महाकाव्यांच्या एकत्रित श्लोकसंख्येपेक्षा देखील चौपट आहे.
गणेशाने लिहिलेलं काव्य ?
एवढं मोठं महाकाव्य अस्तित्वात कसं आलं असेल ? हे देखील एक कोडंच आहे. याबद्दल असे सांगितलं जाते कि व्यासांना हे काव्य स्फुरलं व त्यांना ते लिहून घेण्यासाठी श्री गणेशाला विनंती केली. गणेशाने देखील ते मान्य करताना एक अट घातली कि व्यासांनी ते सांगताना कोठेही थांबायचं नाही. व्यासांनी देखील हि विनंती मान्य करताना श्री गणेशाला एक प्रति अट घातली कि त्यानेदेखील यातील प्रत्येक श्लोक समजावून घेतल्याशिवाय शब्द बद्ध करायचा नाही. दोघांनी एकमेकांच्या अटी मान्य करत या महाकाव्याच्या निर्मितीला आरंभ केला. महर्षी व्यासांनी देखील स्वतःच्या निर्मितीला वेळ मिळण्यासाठी काही कूट श्लोकांची निर्मिती केली व एक महाकाव्य जन्माला आलं .
पण खरंच असं घडलं असेल का ? हि कथा कशी आली , गणपती हे दैवत संपूर्ण कथेत कुठेच आढळत नसताना लेखनिक म्हणून कसं आले. यातील अशा अनेक कथांचा उहापोह आपण प्रक्षिप्त म्हणजे नक्की काय? व भांडारकर संस्थेच्या डॉ सुखटणकर व त्यांच्या चमूने ते कसे ठरविले हे पुढील लेखात पाहू .
No comments:
Post a Comment