महाभारतातील अतर्क्य व चमत्कृतीपूर्ण घटनांचे मानवीय विश्लेषण

Wednesday, March 10, 2021

महाभारताच्या चोखंदळ वाचकांसाठी संदर्भ व विश्लेषण ग्रंथ

 प्रत्येक मराठी घरात रामायण-महाभारत यासारखे धर्मग्रंथ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रथम हस्तांतरित होतात  होतात ते मौखिक स्वरूपात.  आमच्या लहानपणी तरी तशीच परिस्थिती होती व त्यामुळे त्यातील अद्भुताचे मलाही  एक कुतूहल निर्माण झाले आणि त्यातूनच त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्याची प्रेरणा देखील.  महाभारतासारखा  प्रचंड ग्रंथ तर अनेक अद्भुतांनी भरलेला.  प्रथम त्यातील लहानसहान गोष्टी वाचल्या. त्यानंतर पांडवप्रताप, महाभारत कथासार व त्यापुढे जैमिनी अश्वमेध कथासार अशा छोट्या पुस्तकातून महाभारताचा एक सलग कथा भाग माझ्या मनात साकार झाला. त्याही पुढे जाऊन मृत्युंजय, युगंधर, राधेय यांच्यासारख्या ललित कादंबऱ्या वाचल्या व त्यातील कर्ण, कृष्ण यांच्या रेखाटनाने  तर मी भारावूनच गेलो होतो. 

१९६६ च्या सुमारास पुण्याच्या भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटने (BORI)  महाभारतावर काही दशकं संशोधन करीत महाभारताची चोखंदळ अथवा संशोधित आवृत्ती (ज्याला इंग्रजीमध्ये क्रिटिकल एडिशन CE , म्हणून ओळखलं जातं)  प्रसिद्ध केली होती. मूळ महाभारतात नसलेले आणि नंतर घुसडले गेले असावेत असे वाटणारे -  सर्व श्लोक त्यांनी बाजूला काढले व महाभारताच्या तत्कालीन अभ्यासकांना महाभारताच्या अभ्यासासाठी एक नवं दालन उपलब्ध झालं. असं करताना BORI च्या अभ्यासकांनी भारताच्या विविध भागात उपलब्ध असणाऱ्या महाभारताच्या विविध प्रतींचा सुमारे चाळीसएक वर्ष अभ्यास केला व त्यामुळे या संदर्भ ग्रंथाला एक प्रतिष्ठा प्राप्त झाली. या  संदर्भ ग्रंथांच्या आधी, बर्‍याच जणांनी महाभारताच्या निळकंठ प्रतीला प्रमाण मानलं होतं. ही प्रत म्हणजे महाराष्ट्रातील गोदावरी तीरावरील कोपरगाव या ठिकाणच्या, निळकंठ चतुर्धर, या संस्कृत अभ्यासकांने  महाभारतावर केलेलं सतराव्या शतकातील विवेचन.  सध्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या ठिकाणी जन्मलेले हे कवीवर्य  पुढे संस्कृतच्या अभ्यासासाठी वाराणसीत स्थायिक झाले येथूनच त्यांनी महाभारतावरील हे संस्कृत टिपण लिहिलं.  बऱ्याच संस्कृत अभ्यासकांकडून ते आजही प्रमाण मानले जाते. 

याबद्दल एक विशेष सांगायचे म्हणजे निळकंठ यांची ही प्रत सतराव्या शतकातील असल्याने यातील युध्दवर्णनात  युद्धांच्या उल्लेख तोफांचे उल्लेख देखील आहेत.  याचा उपयोग महाभारतकाळी देखील तोफा होत्या असे सांगायला आज केला जातो तो पूर्णतः  चुकीचा आहे.  

भांडारकर प्रत उपलब्ध झाल्यावर मराठीत देखील अनेक साहित्य कृतींना बहर आला. यात मृत्युंजय, राधेय, युगंधर सारख्या ललित कादंबरी वजा लिखाण होते तसेच युगांत, व्यासपर्व, हा जय नावाचा इतिहास आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, महाभारत एक सूडाचा प्रवास असे विश्लेषणात्मक वृत्तपत्रीय लेखन संकलन अथवा पुस्तके देखील होती. कर्ण व श्रीकृष्ण या व्यक्तिरेखाना त्यामुळे बराच उठाव मिळाला. कर्णावर तर मृत्युंजय, तो राजहंस एक अशी मराठी नाटकं  देखील निघाली होती जी मी देखील त्याकाळी पाहिली होती. 

१९७० व १९८०च्या सुमारास वृत्तपत्रातून महाभारतावर बरेच लेख-प्रति लेख छापून येत. त्यातून यातली बरीचशी पुस्तकं संकलित केली गेली आणि म्हणूनच त्याचे साहित्यिक मूल्य देखील फार आहे.  या टीकात्मक व विश्लेषणात्मक लेख आणि पुस्तकांबरोबरच महाभारताचे एक मानवी स्वरूप देखील उलगडायला सुरुवात झाली व त्यातील प्रत्येक चमत्कृतीपूर्ण व अनाकलनीय प्रसंगावर सांगोपांग विचार व चर्चा सुरू झाली. यातूनच श्री एस एल भैरप्पा यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकाच्या लेखणीतून १९८०च्या सुमारास पर्व ही कादंबरी साकारली आणि महाभारताचा एक वेगळाच मानवी पैलू लोकांच्या ध्यानात आला व हळूहळू वाचकांच्या पचनी पडू लागला.

माझ्यासारखा सर्वसामान्य वाचक मात्र यापासून बराच दूर होता. मी शालेय जीवनात युगंधर, मृत्युंजय सारखे ललित कादंबरी प्रकारात मोडणारे वाङ्मय वाचले होते. परंतु या टीकात्मक अथवा विश्लेषणात्मक लेख व पुस्तकांपासून मी पूर्णपणे अनभिज्ञ होतो व म्हणूनच माझ्या पिढीच्या अनेकांप्रमाणे मलादेखील बी. आर. चोप्रा यांचे दूरदर्शनवरील महाभारत हेच संपूर्ण महाभारत होते. अभ्यासाच्या व नंतरच्या नोकरीच्या व्यस्ततेत महाभारत हा विषय मागे पडला आणि मधल्या कालावधीत केवळ ज्ञानरंजन म्हणून अधून मधून जमेल तसे वाचत राहिलो.

पण सुमारे दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये माझ्या नोकरीच्या अखेरच्या काळात  श्री. एस. एल. भैरप्पा यांची पर्व ही कादंबरी माझ्या हातात पडली. ती वाचताच मी भारावून गेलो. पर्व मधील घटना मनाला पटू लागल्या.  चमत्कारांवरील   दैवी आवरण बाजूला होऊ लागले. त्या मागचा मानवी चेहरा जास्त जवळचा वाटू लागला आणि  मग कुठेतरी मनाच्या मागच्या कोपऱ्यातील अडगळीतून असलेल्या युगांत, व्यासपर्व, महाभारत एक सूडाचा प्रवास,  महाभारत-संघर्ष आणि समन्वय, अशा अनेक पुस्तकांचा शोध सुरू झाला आणि हळूहळू ती वाचताना महाभारता बद्दलची उत्सुकता नव्याने जागृत झाली. त्यातील घटनांना नवे आयाम मिळाले.नवीन दृष्टीकोन मिळाला.  एकदम काहीतरी नवीन वेगळं गवसल्याचा आनंद मिळाला.  मग हे सगळं सांगायचं कुणाला? कळणार कोणाला? आणि कधी? हेच समजेना म्हणून हा ब्लॉग लेखन प्रपंच.

आता ही सर्व पुस्तक दोन-दोनदा वाचल्यावर डॉक्टर रा. शं. वाळिंबे संपादित विदर्भ-मराठवाडा कंपनीचे सर्व खंड नव्याने वाचायला घेतले आहेत.  संदर्भासाठी गीता प्रेस, गोरखपुर यांची संस्कृत हिंदी आवृत्ती व भांडारकर इन्स्टिट्यूटची संस्कृतमधील संशोधित प्रत देखील आहे. या सर्वांचा वापर करून हळूहळू मला उमगलेले महाभारत मराठीतून उलगडण्याचा विचार आहे. तसं पाहिलं तर, ते इतर बऱ्याच ब्लॉगवर पण उपलब्ध आहे तरी पण मला त्याचे अस्तित्व पुर्ण वाटत नसल्याने, माझ्या दृष्टीकोनातून ते सादर करण्याचा माझा प्रयत्न राहील. अर्थात यासाठी बराच कालावधी लागेल याचीही मला जाणीव आहे तरीपण पाहुया किती तग  धरता येतो ते.


मला उपलब्ध झालेले काही साहित्य (गीता प्रेस व भांडारकर प्रती) नेटवर उपलब्ध आहे. यथावकाश मी ते माझ्या या ब्लॉग वर पण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेनच पण त्याआधी त्याचे माझ्या दृष्टिकोनातून परीक्षण देखील वेगळ्या लेखात करेन. आजमितीस खालील पुस्तके माझ्याकडे उपलब्ध आहेत. 

  1. महाभारत संशोधीत आवृत्ती - भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिटयूट - खास संस्कृत जाणकारांसाठी  व अभ्यासकांसाठी 
  2. महाभारत - संस्कृत - हिंदी आवृत्ती - गीताप्रेस - संस्कृत येत नसल्यामुळे येथील भाषांतराचा ताडून पाहण्यास उपयोग होतो 
  3. महाभारत - ११ खंड - संपादक डॉ रा. शं. वाळिंबे , प्रकाशक  विदर्भ मराठवाडा बुक कंपनी - यात संस्कृत श्लोक नाहीत परंतु प्रत्येकी श्लोकाचे अथवा श्लोकसमूहाचे मराठी भाषांतर आहे. मूळ संस्कृत श्लोक पाहायचा असल्यास गीता प्रेस ची आवृत्ती उपयोगी पडते.
  4. महाभारत - २ खंड - लेखिका : कमला सुब्रमण्यम , अनुवाद - मंगेश पाडगावकर - साधं सरळ गोष्टीरूप महाभारत 
  5. पर्व - एस एल भैरप्पा - मराठी भावानुवाद - सौ उमा कुलकर्णी. महाभारतावर आधारित उत्कृत्ष्ट कादंबरी (याचे वेगळे समग्र पुस्तक परीक्षण माझ्या मना सज्जना या ब्लॉग वर मिळेल). 
  6. महाभारत - माधव कानिटकर (कथारूप). एक सलग कथा म्हणून थोडक्यात वाचण्यास उपयुक्त. 
  7. महाभारतातील व्यक्तिदर्शन - शं. के. पेंडसे - व्यक्तीविशेष लेखांचे संकलन, १९६४ सालचे मॉडर्न बुक डेपो यांचे प्रकाशन. महाभारतातील व्यक्तिरेखांवर मानवी दृष्टिकोनातून प्रकाश टाकणारे एक अतिशय उत्कृष्ट पुस्तक. महाभारतातील विविध व्यक्तिरेखांचे बारकावे अभ्यासायचे असतील तर हे पुस्तक  अभ्यासायलाच हवे,
  8. युगांत - इरावती कर्वे - व्यक्तीविशेष लेखांचे संकलन. (याचे वेगळे समग्र पुस्तक परीक्षण माझ्या मना सज्जना या ब्लॉग वर मिळेल). 
  9. व्यासपर्व - दुर्गा भागवत - महाभारतातील व्यक्तीविशेष लेखांचे संकलन.
  10. जय - देवदत्त पट्टनायक - महाभारत व त्याची उपकथानक , लोकगीतं  याच्या संग्रहातून तयार होणारे  उपयुक्त संदर्भ पुस्तक 
  11. महाभारत - एक सूडाचा प्रवास - दाजी पणशीकर - महाभारतातील सूड हि मध्यवर्ती संकल्पना स्पष्ट करणारे पुस्तक. 
  12. महाभारताचे वास्तव दर्शन (आक्षेपांच्या संदर्भात) - प्रो. अनंत दामोदर आठवले (स्वामी वरदानंद भारती) - महाभारताच्या तत्कालीन लेखकांच्या पांडव विरोधी , कौरव व कर्ण धार्जिण्या लेखकांची स-संदर्भ चिरफाड करणारे पुस्तक 
  13. महाभारत - संघर्ष आणि समन्वय - रवींद्र गोडबोले , अतिशय वेगळ्या पद्धतीनं संकल्पना मांडणारे उत्कृष्ट पुस्तक 
  14. कर्ण , महापुरुष कि खलपुरुष - सौ माधवी सप्रे 
  15. कर्ण खरा कोण होता? - दाजी पणशीकर. कर्णाची काळी बाजू उजेडात आणणारे पणशीकरांचे उत्कृष्ट पुस्तक. मृत्युंजय वाचून भारलेल्यानी हे पुस्तक वाचायलाच हवे. 
  16. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे - विश्वास दांडेकर - श्रीकृष्णाच्या आयुष्याची वेगळी बाजू उलगडून दाखविणारे सुंदर पुस्तक.
  17. व्यासांचे शिल्प - नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेल्या महाभारतविषयक प्रस्तावना व लेखांचा संग्रह. एक सुंदर संकलन, महाभारताच्या अभ्यासकांनी वाचायलाच हवे असे. यातील कृष्णाविषयीचे लेख अत्यंत उत्कृष्ट आहेत. 
  18. महाभारताचा मूल्यवेध - डॉ. रवींद्र शोभणे  - महाभारतातील  व्यक्तिरेखांचा वेगळा विचार मांडणारे पुस्तक. (याचे वेगळे समग्र पुस्तक परीक्षण माझ्या मना सज्जना या ब्लॉग वर मिळेल).  
  19. महाभारत - पहिला इतिहास - वि. ग. कानिटकर - सरळ साधं महाभारत, आदिपर्वापासून स्वर्गारोहण पर्व अशी सर्व १८ पर्व थोडक्या व ३८० पानांच्या या पुस्तकात बसविली आहेत.
  20. व्यासांचा वारसा - आनंद जोतेगावकर - महाभारत कथेतील बऱ्याच गोष्टी आरश्यात लक्ख पणे उलगडून दाखविणारे पण समजण्यास थोडेसे कठीण असणारे, एक सुंदर पुस्तक.
  21. यासम हा - प्रा. सदानंद मोरे  - योगेश्वर कृष्णाचे वैचारिक चारित्र्य. कृष्णाच्या आयुष्यावर आधारित शोधनिबंध असल्याने तत्वज्ञानाची बैठक असणारे पुस्तक. वाचायला काहीसे जड.
  22. महाभारत : एक मुक्त चिंतन - प्रेमा कंटक - महाभारता वरील चिंतनात्मक स्फुट लेखन - यात महाभारत काव्याचे लेखक , त्यात अनेकांनी घातलेली भर , महाभारतातील विसंगती व असंभव घटना , दैव कि पुरुषार्थ असा विविधांगी विचार आहे. यातील सूत्रधार या प्रकरणात कृष्णाचे महाभारतातील स्थान या त्याचे जीवन यावरील चर्चा आहे. १९६७ साली प्रकाशित झालेले हे पुस्तक महाभारत अभ्यासकांसाठी संग्राह्य आहे. 







8 comments:

  1. ब्लॉग ची सुरुवातच इतकी अभ्यासपूर्ण आणि उत्कंठावर्धक आहे, की पुढे मोठा खजिना गवसेल याची खात्री वाटते
    - हेमंत धामोरीकर

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद हेमंत. लिहिण्यासारखं वेगळं बरंच काही आहे. ब्लॉगचा फायदा हाच कि स्वतःच्या सोयीनं लिहिता येत. विविध लेखकांनी सर्व गूढांची उकल आपापल्या परीने केली आहे. वाचताना मी तो आनंद घेतलाय. या सर्वांचं मिश्रण करून आता मला माझ्या शब्दात लिहायचं आहे.

      Delete
  2. महेश प्रथम तुझे अभिनंदन आणि आभार. तुझ्या या ब्लॉग ला शुभेच्छा .

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. अशा प्रतिक्रियांनी लिहावंसं वाटेल. मला उकललेली गूढं मित्रांपर्यंत पोहोचायला निश्चितच आवडेल. महाभारताचा आवाका जबरदस्त आहे.

      Delete
  3. Sadashiv aathavale yancha dekhil mahabharat var pustak bookganga.com ahe nkki bagha 🙏😊

    ReplyDelete
    Replies
    1. पुस्तक मी बुकगंगावर चाळले.फार वेगळेपण जाणवले नाही म्हणून विकत घेतले नाही.

      Delete
  4. अभिनंदन महेश! खुप सुंदर लिखाण! अगदी मुद्देसुद आणी विषयाला पकडून ! खुपच लॉजीकल ! आणि अभ्यासपूर्ण!

    ReplyDelete