अंबेचा सूडाग्नी
भीष्मांच्या परवानगीने मोठ्या आनंदाने अंबा आपल्या प्रियकराकडे, सौभराज शाल्वाकडे निघाली. तिला सोबत करण्याकरता भीष्मांनी वृद्ध ब्राह्मण, पुरोहित व काही दासी सोबत दिल्या होत्या. पण शाल्वाकडे पोहोचताच मात्र तिचा भ्रमनिरास झाला. भीष्माने स्वयंवरात सर्व क्षत्रियांचा पराभव करून जिंकलेल्या आंबेला स्वीकारायला शाल्वाने स्पष्ट नकार दिला व तिला तेथून निघून जाण्यास सांगितले.
अतिशय दुःखद मनाने अंबा तेथून निघाली व नगरा बाहेरील वनात एका ऋषी समूहांच्या आश्रमात गेली. दोष नक्की कुणाचा हेच न समजल्याने, तिने प्रथम भीष्माला वेळीच शाल्वावरचे आपले प्रेम न सांगितल्याने स्वतःला दोष दिला, नंतर आपले स्वयंवर मांडले म्हणून पित्याला दोष दिला, त्या स्वयंवरातून आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याला पळवून नेल्या बद्दल भीष्माला दोष दिला व नंतर आपल्याला झिडकारल्याबद्दल शाल्वाला दोष दिला. आपली कर्मकहाणी तिने सर्व आश्रमवासीयांना सांगितली व आपल्याला तेथेच आश्रय द्यायची तिने विनंती केली. तेव्हा ही तरुण मुलगी इथे कशी सुरक्षित ठेवावी व पुढे नक्की काय करावे या चिंतेने आश्रमवासीयांना देखील ग्रासले. आंबे च्या मनातील दुःखाची जागा हळूहळू संताप व सूडाच्या भावनेने घेतली व आपल्याला पळवून नेणाऱ्या भीष्मा विरुद्धच ही सुडाची भावना प्रबळ होऊ लागली. पण....... सूड घ्यायचा कसा?
अंबेचे भीष्मवधासाठी परशुरामांना साकडे
भीष्माने अंबेचे हरण केले त्यावेळी स्वयंवरात या तीनही कन्या भीष्मांसमोरून वरमाला घेऊन गेल्या होत्या व वृद्ध असल्याने त्यांनी त्याला वरमाला घातली नव्हती. तसेच इतर राजांनीही भीष्माची वृद्ध म्हणून हेटाळणी केली होती. असे असताना देखील या तीनही कन्यांनी व विशेषत शाल्वावर प्रेम असणाऱ्या अंबेने भीष्मांना त्याच वेळी हे सांगण्याचे धाडस केले नव्हते. कदाचित प्रथम तिला शाल्वाच्या पराक्रमावर भरवसा असावा, व नंतर भीष्माच्या क्रोधाची भीती वाटली असावी हस्तिनापूरला पोचल्यावर देखील अंबेने विचित्रवीर्याशी विवाह निश्चित होईपर्यंत वाट पाहिली व नंतरच अखेरच्या क्षणी धाडस करून भीष्माला शाल्वावरील प्रेमाची हकिकत सांगितली. त्यामुळे भीष्म, दुसऱ्या कुणावर तरी प्रेम करणाऱ्या मुलीचे विचित्रवीर्याशी लग्न लावणार नाही हे देखील निश्चित होते. बरं, भीष्माची लढण्यास सांगणार तरी कुणाला? नुकताच एकट्या भीष्माने स्वयंवर मंडपात सर्व क्षत्रिय राजांचा केलेला पराभव तिने पाहिला होता. त्यामुळे ती अधिकाधिक बेचैन होऊन संतापत होती. ती त्या आश्रमातील ऋषीमुनींचा उपदेशही ऐकत नव्हती व तेथून निघून ही जात नव्हती. अशा विचित्र परिस्थितीत ते आश्रमवासी असताना राजा होत्रवाहन त्या आश्रमात येऊन पोहोचला. तेथील चर्चेवरून त्याला या कन्येची, अंबे ची व्यथा कळली. आणि तीच आपल्या मुलीची मुलगी, म्हणजेच आपली नात असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तिचे सांत्वन करीत धीर दिला. राजा होत्रवाहन परशुरामांचा निकटवर्ती होता. व त्यामुळे परशुरामाचा शिष्य असलेल्या भीष्मांचा बंदोबस्त तो परशुरामाकडून करून घेईल अशी ग्वाही त्यांनी दिली. ते ऐकताच अंबेच्या सूडाच्या आशा पल्लवित झाल्या.
याच सुमारास परशुरामांचा अजून एक जवळचा शिष्य अकृतव्रण त्या आश्रमात येऊन पोहोचला. राजा होत्रवाहन व आश्रम वासियांनी त्याचा आदर सत्कार करत परशुरामाद्वारे अंबेला न्याय मिळवून देण्याची विनंती अकृतव्रणाकडे केली. परशुराम लवकरच आश्रमात येणार असून ते निश्चितच अंबेला न्याय देतील असे आश्वासन त्याने दिले.
पाठोपाठ परशुराम देखील त्या आश्रमात येऊन पोहोचले होत्रवाहन व अकृतव्रण या आपल्या निकटवर्तीयांकडून त्यांना अंबेची कर्मकहाणी कळली. भीष्म आणि शाल्व हे दोघेही आपले शिष्य असल्याने आपले ऐकतील या विश्वासाने त्यांनी अंबेला नक्की काय हवे त्याची निवड करण्यास सांगितले. यावेळी अंबेने भीष्माचा सूड हवा, असा आपला निर्णय जाहीर केला. तिला युद्ध हवे हे लक्षात येताच परशुरामांनी आपण सध्या धनुष्य खाली ठेवले असल्याचे तिला सांगितले. पण लगेचच अकृतव्रणाने त्यांना त्यांच्या “सर्व क्षत्रिय समुदायाला जो जिंकेल त्याला ठार मारण्यासाठी मी शस्त्र हाती घेईन” या प्रतिज्ञेची आठवण करून दिली व परशुरामाला भीष्माला निरोप पाठवणे भाग पडले. भीष्म तेथे पोहोचताच परशुरामांनी भीष्माला तोच सर्व अंबा प्रकरणाचे मूळ असल्याचे सांगत अंबेला स्वीकारण्याची आज्ञा केली. यावर प्रतिज्ञाबद्ध भीष्माने शाल्वासारख्या परपुरुषावर मन जडलेल्या कन्येला मी माझ्या बंधू साठी पण स्वीकारणार नाही असे ठामपणे सांगितले. दोघेही आपापल्या भूमिकांवर अडून बसल्याने आता युद्ध प्रसंगाला तोंड फुटणार हे निश्चित झाले.
भीष्म - परशुराम युद्ध
दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे हे युद्ध कुरुक्षेत्रावर सुरू झाले. आपल्या शिष्याचा,भीष्माचा, आपण सहज पराभव करू शकू हा परशुरामांचा भ्रम भीष्माने आपल्या युद्ध कौशल्याने दूर केला. तब्बल 23 दिवस हे युद्ध सुरू राहिले. अखेरच्या दिवशी तर जेव्हा आपल्या प्रस्वाप अस्त्राने भीष्म परशुरामाचा वध करेल अशी परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा नारदाने मध्ये पडून हे युद्ध थांबवले. परशुरामांनी आपला पराभव मान्य केला. याचबरोबर अंबेची उरलीसुरली आशा देखील संपुष्टात आली आणि अंबा आणखीनच पिसाळली. तिने आसुरी तपश्चर्येचा मार्ग अवलंबिला. वायू भक्षण करीत, पाण्यात उभे राहून, असे विविध तपांचे मार्ग तिने अनुसरले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही तेव्हा सुमारे बारा वर्षांनी ती तीर्थयात्रेला निघाली. यातच तिची भेट भीष्माची माता गंगा हिच्याशी देखील घडली आणि तिनेही अंबेला शांत करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. आता हळूहळू “मी कुणाच्यातरी मदतीने मी भीष्मांचा वध करेन”, या ऐवजी “मी स्वतः भीष्माचा वध करायला हवा” अशी धारणा घेऊन ती तप करायला लागली आणि यातच शंकरांनी तिला “तू भीष्माचा रणात वध करशील” असा वर दिला. वरप्राप्ती होताच अंबा लगेच हुरळून गेली नाही. तिने आपल्या स्त्रीत्वाची जाणीव शंकरांना करून दिली. तेव्हा शंकराने तिला पुरुषत्वाची प्राप्ती होईल व त्या देहात देखील तुला या सर्व गोष्टींचे स्मरण राहील असा देखील वर दिला. असा वर मिळाल्यावर मात्र अंबेने मुळीच वेळ दवडला नाही आणि सर्वांसमक्ष रानातून लाकडे आणून, चिता रचून प्रज्वलित करत भीष्म वधासाठी अग्री समर्पण केले आणि एक सूडाग्नी काही कालावधीसाठी शांत झाला. कारण महाभारतकारांच्या म्हणण्यानुसार हीच अंबा पुढे द्रुपदाच्या घरी शिखंडी म्हणून जन्म घेणार होती.
इकडे हस्तिनापुरात.....
या सर्व कालावधीत हस्तिनापुरात काय घडत होतं अंबेच्या बहिणींचा, अंबिका व अंबालिका यांचा विवाह विचित्रवीर्याशी होऊन, त्या पुढील सात वर्षात त्याचा मृत्यूही झाला होता. सत्यवतीने व भीष्मांनी पुढाकार घेऊन घडवून आणलेल्या नियोगाने त्यांना धृतराष्ट्र व पांडू हे पुत्रही झालेले होते. अंबेच्या तपाची पहिली बारा वर्षे पूर्ण होईपर्यंत ही मुले चार-पाच वर्षांची झाली होती. त्यानंतरच्या, अंबेची तीर्थयात्रा, पुन्हा कठोर तपाचरण व त्यानंतरचे शंकराचे वरदान या कालावधीत ते कुमारवयीन झाले होते.
अंबा - शिखंडी बादरायण संबंध
महाभारतकारांनी अंबेची रचलेली कहाणी बराच काळ लांबविली आहे ते द्रुपदापर्यंत नेऊन पोहचविण्यासाठी. अन्यथा द्रोणांच्या बरोबरीचा द्रुपद, हा वयाने धृतराष्ट्र पांडू यांच्यापेक्षा काहीसा मोठा आहे. त्याला तसे भीष्मवधाचे प्रयोजन देखील दिसत नाही. पण कुरुंच्या शेजारील पांचाल हे एकच मोठे व सशक्त राज्य आहे. पांचालराज द्रुपदाचे आपला बालमित्र द्रोणाशी आलेले वैर ही नंतरची घटना आहे. आणि शिखंडी जर भीष्म वध करण्याएवढा शूर योद्धा असता तर द्रोण वधासाठी द्रुपदाने वेगळा पुत्र, ते देखील हवन करून का प्राप्त करून घेतला असावा ? ते देखील समजत नाही. बरं फक्त भीष्म वधासाठीच अंबेचा शिखंडी म्हणून जन्म झाला असे मानावे तर शिखंडीच्या हातून भीष्म वध घडलेला नाही. आणि अंबेच्या अग्नी प्रवेशाच्या वेळीच सत्तरीपार असणारे भीष्म आपल्या वयाच्या कितव्या वर्षी युद्धात सामोरे येणार हे तरी अंबेला ठाऊक होते का?
या सर्वांचा विचार करता अंबेचे शिखंडीच्या रूपात जन्म घेणे हा महाभारतकारानी जोडलेला बादरायण संबंध आहे असे माझे स्पष्ट मत आहे. याच शिखंडीच्या लिंगबदलाची कहाणी देखील तितकीच गूढ आडे व त्याचा रहस्यभेद याच मालिकेत योग्य वेळी होईलच.
___________________________________________________________________________________
संदर्भ : अम्बोपाख्यान पर्व : अध्याय १७२ ते १८७ प्रचलित आवृत्ती
informative and educative blog .
ReplyDeleteKeep it up.
All the best
धन्यवाद. आपल्यासारख्या प्रतिक्रिया लिहायची प्रेरणा देतात.
Delete