दाशराजाचा होकार मिळाल्यावर सत्यवतीला रथात सोबत घेऊन राजपुत्र देवव्रत हस्तिनापुरात परतला व सर्व हकीकत पित्याला सांगून त्याने सत्यवतीला शंतनूच्या हवाली केलं. यानंतर शंतनू व सत्यवतीचा विवाह झाला.
या विवाहानंतर शंतनूपासून सत्यवतीला चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन पुत्र झाले. विचित्रवीर्य कुमार वयात असतानाच शंतनूचे निधन झाले. आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे भीष्मांनी तरुण चित्रांगदाला राज्याभिषेक केला. महाभारत आपल्याला सांगते कि चित्रांगद पराक्रमी होता, मात्र त्याचे चित्रांगद याच नावाच्या गंधर्वाशी युद्ध झाले. कुरुक्षेत्राजवळील हिरण्यवती (प्रचलित प्रतींनुसार सरस्वती नदी ) नदीच्या किनाऱ्यावर झालेले हे युद्ध सुमारे ३ वर्षे सुरु होते, म्हणजेच हा हस्तिनापूरच्या उत्तरेकडील भागातील सीमावाद असावा व वारंवार उफाळून येत असावा. मात्र असे असून देखील पराक्रमी व अजेय भीष्मांनी यात या ३ वर्षात हस्तक्षेप करून गंधर्वाला संपविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. याउलट या युद्धात अखेरीस चित्रांगद गंधर्वाकडून मारला गेला. त्यामुळेच या कालावधीत भीष्म राज्यकारभार चित्रांगदावर सोपवून बाजूला झाले असावेत असे दिसते. नियती मात्र भीष्मांना वारंवार हस्तिनापूरच्या राजगादीकडे वारंवार खेचत होती.
यानंतर अजूनही कुमारवयीन असणाऱ्या विचित्रवीर्याला भीष्माने राज्यावर बसविले आणि त्याच्या नावाने भीष्माने राज्यकारभार सुरु केला. विचित्रवीर्य तारुण्यात येताच सत्यवतीने व भीष्माने त्याच्या विवाहाचा विचार सुरु केला. याचवेळी काशीराजाने त्याच्या अंबा, अंबिका व अंबालिका या तीन राजकन्यांचे स्वयंवर मांडले असल्याचे कानी आले व विचित्रवीर्याला यात भरीस घालण्याऐवजी स्वतःच या स्वयंवराला हजेरी लावण्याचे ठरविले. कोवळ्या वयाच्या व हस्तिनापूरच्या गादीचा एकमेव वारस असणाऱ्या विचित्रवीर्याला, एकटेच स्वयंवराला पाठविल्यावर, इतर राजांच्या गराड्यातून एखादी राजकन्या घेऊन येणे हे त्याला शक्य होणार नाही याची सत्यवती व भीष्माला खात्री असावी. म्हणूनच भीष्म या स्वयंवरासाठी भीष्म एकटेच काशी राज्यात पोहोचले
भीष्मांचा स्वयंवरात उपहास
भीष्म ४० वर्षाचा असताना शंतनू व सत्यवतीचा विवाह झाला होता. त्यावेळचे शंतनूचेच वय ६८ वर्षांचे होते हे आपण या आधी पाहिले आहे. त्यानंतर त्याला उतारवयात झालेल्या चित्रांगद व विचित्रवीर्य या मुलांमध्ये देखील ४-६ वर्षाचे अंतर असावे असे दिसते. विवाहानंतर सुमारे १६-१७ वर्षांनी म्हणजे वयाच्या ८५ व्या वर्षी शंतनूचा मृत्यू झाला त्यावेळी चित्रांगद १६ वर्षाचा तरुण होता व तो गादीवर आला. यावेळी १०-११ वर्षाचा असणारा विचित्रवीर्य त्यानंतर जेव्हा ३-४ वर्षांनी चित्रांगदाचा गंधर्वाबरोबरच्या लढाईत मृत्यू झाला, तेव्हादेखील १४-१५ वर्षाचा कुमारचा होता. म्हणजेच चित्रांगदाच्या मृत्यूच्या वेळी भीष्मानी वयाची साठी गाठली होती व १-२ वर्षात तारुण्यात पदार्पण केलेल्या कोवळ्या विचित्रवीर्यासाठी वधू आणायला भीष्म निघाले तेव्हा ते साठी उलटलेले (६२-६३ वयाचे) होते.
अशा वयोवृद्ध व प्रतिज्ञाबद्ध भीष्माला स्वयंवराच्या मंडपात पाहून तेथील तरुण राजांनी नाके मुरडली व भीष्माची थट्टा देखील केली, असे वर्णन महाभारताच्या सर्व प्रचलित आवृत्त्यांमध्ये येते (चिकित्सक आवृत्ती मध्ये मात्र हे थट्टेचे वर्णन येत नाही). त्यांचे हे टोमणे भीष्माला फारच लागले आणि त्यांनी संतापून तात्काळ त्या तीनही राजकन्यांचे हरण करायचे ठरविले आणि सर्वांसमक्ष त्यांना रथात घालून उपस्थित राजांना त्याने आव्हान दिले. असे करताना त्यात त्यांनी जे वीरोचित भाषण केले त्यात त्यांनी विवाहाचे आठ प्रकार सांगितले व त्यातील आप्तेष्ठांचा व विवाहोत्सुक क्षत्रियांचा पराभव करून केलेला राक्षस विवाह हा क्षत्रियांसाठी सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगत सर्व उपस्थित क्षत्रियांना युद्धासाठी ललकारले.
भीष्म पराक्रम
या पराक्रमानंतर भीष्म हस्तिनापुराकडे निघाला असता त्याला सौभराज शाल्वाची ललकारी ऐकू आली. इतर सर्व राजे भीष्माच्या शौर्याने दिपून गेले तरीदेखील, त्या तीन कन्यापैकी, थोरल्या अंबेवर प्रेम करणारा शाल्व मात्र हार मानणारा नव्हता. भीष्माने देखील रथ थांबवून त्याच्याशी युद्ध आरंभले. या आधीच पराभूत झालेले इतर राजे आता प्रेक्षक बनले. सुरुवातीलाच शाल्वाने केलेल्या आक्रमणाने, या राजांनी आता भीष्मांविरुद्ध शाल्वाला प्रोत्साहितकरायला सुरुवात केली. ते पाहून चिडलेल्या भीष्माने आपल्या अविरत शरवृष्टीने शाल्वाला संत्रस्त केले. त्याचे घोडे मारले, रथ मोडला, आणि त्याला जेरीला आणले व अखेर जीवदान देत सोडून दिले. पराभवाने अपमानित झालेला शाल्व आपल्या नगराकडे परतला व भीष्म त्या तीनही कन्यांना घेऊन हस्तिनापूरला परतला. स्वतः जिंकून आणलेल्या या तीनही कन्या त्याने सत्यवतीच्या मुलाला, म्हणजेच आपल्या धाकट्या भावाला, विचित्रवीर्याला अर्पण केल्या आणि तो त्याच्या विवाहच्या तयारीला लागला.
आपला विवाह आता विचित्रवीर्या बरोबर होणार हे कळताच त्या तिघीतली ज्येष्ठ कन्या अंबा हिने आपले मन भीष्मांसमोर उघड केले व आपले शाल्व राजावर प्रेम होते आणि आपल्याला मिळवण्यासाठीच तो भीष्मा बरोबर तुमुल युद्ध करत होता हे तिने सांगितले. हे ऐकताच धर्म विचार जाणून घेण्यासाठी भीष्माने वेद पारंगत विद्वानांबरोबर विचारविनिमय केला व नंतर सत्यवतीच्या परवानगीने अंबेला शाल्व राजाकडे परतण्यास अनुमती दिली.
तिच्या दोन बहिणी अंबिका व अंबालिका मात्र देखण्या विचित्रवीर्याला पाहताच त्याच्याशी विवाहाला आनंदाने तयार झाल्या. अनुपम सौंदर्यवती असलेल्या या दोन कन्यांना पाहतात विचित्रवीर्य देखील भलताच वेडावला आणि त्यांच्याशी विवाह होतात “धर्मात्मा विचित्रवीर्य कामात्मा झाला” इतक्या स्पष्ट शब्दात महाभारतकारांनी त्याची लग्नानंतरची विलासी वृत्ती नोंदविली आहे. या अति कामविकाराचा जो व्हायचा तोच परिणाम झाला. सुमारे सात वर्षे राज्य कारभार दुर्लक्षून कामविहार करणार्या विचित्रवीर्या ला तरुण वयातच राजयक्ष्मा म्हणजे क्षयरोग झाला. वैद्यांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण अखेर या क्षयरोगाने त्याचा अंत झाला व हस्तिनापूरावर पुन्हा एकदा काळोखाचं साम्राज्य पसरले. भीष्मांच्या वृद्ध खांद्यांवर पुन्हा एकदा हस्तिनापूरला सावरण्याची जबाबदारी येऊन पडली आणि आपल्या प्रतिज्ञेत राहून ती कशी पार पाडायची याची चिंता त्यांना व सत्यवतीला भेडसावू लागली.
संदर्भ : आदिपर्व अध्याय १०२, चिकित्सक आवृत्ती अध्याय ९६
No comments:
Post a Comment