हस्तिनापुरात विचित्रविर्याचा मृत्यू झाल्यावर सत्यवती वर मात्र आभाळ कोसळलं. विचित्रवीर्य देखील अपत्यहीन मृत्यू पावल्याने आता हस्तिनापूरच्या गादीला वारस उरला नव्हता, व त्यामुळेच आता ज्या राज्याच्या मोहाने सत्यवतीने भीष्मप्रतिज्ञा घडवून आणली होती, तेच राज्य निर्वंश होण्याचा धोका निर्माण झाला. व ते टाळण्यासाठी सत्यवतीने भीष्मालाच आपलं ब्रह्मचर्य व्रत मोडण्याची विनंती केली.
ही विनंती भीष्मांनी अर्थातच अमान्य केली. यात महाभारतकार भीष्मांच्या वयाचा विचार मात्र मुळीच मध्ये आणत नाहीत. ते केवळ आपल्यासमोर मांडतात ते सुमारे ८० वर्षे वयाच्या भीष्मांचा प्रतिज्ञा पालनाचा निग्रह.
भीष्मांनी मग आपल्या मातेला यातून एक मार्ग सुचविला व तो म्हणजे एखादा सुयोग्य ब्राह्मण बघून अंबिका व अंबालिकांशी नियोग घडवून आणण्याचा. तत्कालीन समाजामध्ये, काही विशिष्ट परिस्थितीमध्ये, संततीप्राप्तीचा नियोग हा सर्वमान्य व धर्ममान्य मार्ग होता. यावर सत्यवतीने देखील आपल्या पुत्राला, भीष्माला, आपल्या विवाहपूर्व पराशर ऋषींसोबतच्या संबंधांची व त्यातून जन्मलेल्या कृष्णद्वैपायन या कानीन पुत्राची गोष्ट सांगितली, तेव्हा ही भीष्मांना यात काही वावगे असल्याचे जाणवले नाही. याउलट कनिष्ठ भ्राता व अधिकारी ब्राह्मण या न्यायाने व्यासांना नियोगासाठी पाचारण करणे योग्य ठरेल, असा निर्वाळा देखील भीष्मानी सत्यवतीला दिला.
सत्यवतीच्या क्षत्रियकुलीन असण्याचे महत्व
या ठिकाणी महाभारतकारांनी सत्यवतीला क्षत्रिय कुलीन ठरविण्याचे महत्त्व पुन्हा एकदा आपल्या लक्षात येते. ती जर हीन कुलीन ठरवली गेली असती तर, पिता ब्राह्मण (पराशर) व हीन कुलीन माता सत्यवती यांची संतती असलेले कृष्णद्वैपायन देखील हीन कुलीन ठरले असते. महाभारतकारानी सत्यवती हि राजा उपरिचर वसूची क्षत्रिय कन्या असल्याची कथा अगदी जाणीवपूर्वक रचल्याचे यावरून आपल्या लक्षात येते.
भीष्मांचे मत विचारात घेत व नियोगासाठी व्यासांना पाचारण करण्यासाठी भीष्मांची संमती मिळवली सत्यवतीने सुनांद्वारे नियोग पद्धतीने राज्याचा वारस मिळविण्याचे ठरविले खरे, पण यासाठी तिने आपल्या सुनांची, अंबिका अथवा अंबालिकेची संमती मात्र गृहीत धरली होती. सुरुवातीला या प्रकारे परपुरुषाकडून संतती निर्मितीला त्या तयारच नव्हत्या. पण सत्यवतीच्या हट्टापुढे त्यांचे काही चालले नाही व त्या नाईलाजास्तव राजी झाल्या. सत्यवतीने व्यासांना पाचारण केले (व ते प्रकट झाले असे महाभारत सांगते). ते हजर होताच सत्यवतीने त्यांना बोलावण्याचे प्रयोजन सांगितले. तेव्हा त्यांनाही काहीसा धक्का बसला व आपल्याला व तसेच सत्यवतीच्या सुनेला देखील मानसिक व शारीरिक तयारी करण्याकरता एक वर्षाचा कालावधी लागेल असे त्यांनी सांगितले. पण सत्यवती एवढा काळ वाट पाहायला तयार नव्हती. अशा प्रकारे विना-वारस वेळ घालविल्यास प्रजेत अराजक माजेल, राज्य निर्नायकी राहिल, या कारणास्तव एवढा वेळ थांबण्यास तिने व्यासांना नकार दर्शविला. लगेचच नियोग विधीची रीतसर घोषणा करण्यात आली.
व्यासांचे उग्र रूप
अंबिकेची समागमाची मानसिक तयारीच नव्हती. तिला नक्की कुणाशी समागम करायचा आहे याची देखील कल्पना नव्हती. तिचा दीरच समागमासाठी येईल असे सांगण्यात आले तेव्हा तिच्या मनात भीष्मांची प्रतिमा होती, पण प्रत्यक्षात पलंगावर तयार असणाऱ्या अंबिकेच्या समोर उभे राहिले ते, कृष्ण वर्णाचे, पिंगट जटांचे, तारट डोळ्यांचे, पिंगट दाढी-मिशांचे व बेढब अंगाचे, व्यास (होय, व्यासांचे असेच वर्णन महाभारतकारांनी म्हणजे खुद्द व्यासांनीच करून ठेवले आहे). आणि या अशा अवताराला घाबरून अंबिकेने आपले डोळे घट्ट मिटून घेतले व ती केवळ शरीराने त्या प्रक्रियेला सामोरे गेली. अंबिकेच्या पुत्राचे धृतराष्ट्राचे अंधत्व, हा याच घट्ट डोळे मिटुन घेण्याचा परिणाम होता, असे व्यासांनी सत्यवतीला लगेचच सांगितल्याचे महाभारतकार आपल्याला सांगतात.
यानंतर लगेचच व्यास तिथून निघून गेले. यथावकाश अंबिकेला जो पुत्र झाला तो जन्मांध निपजला. तो म्हणजेच धृतराष्ट्र. त्याच्या अंधत्वामुळे भविष्यात त्याला राज्यकारभार करता येणार नाही म्हणून, सत्यवतीने पुन्हा एकदा व्यासांना पाचारण केले. यावेळी अंबालिकेची पाळी होती. अंबिकेचा अनुभव गाठीशी होताच, पण अंबालिका देखील व्यासांना पाहताच भीतीने पांढरीफटक पडली. त्यामुळे तिच्याशी समागम केल्यानंतर होणारा पुत्र पांडूवर्णी होईल, असे व्यासांनी सांगितले. अंबालिकेला दिवस भरताच खरोखरीच तिला एक पांडूवर्णी (त्वचेचा रंग असणारा) पुत्र झाला असे महाभारतकारानी नोंदविले. हाच पांडू याच नावाने प्रख्यात झाला.
या दोन्ही कुमारांमध्ये व्यंग असल्यामुळे सत्यवतीने पुन्हा एकदा व्यासांना आवाहन / पाचारण केले व अंबिकेला तयार राहण्यास सांगितले. पण सुमारे दीड-दोन वर्षांपूर्वीचा भीतीप्रद अनुभव गाठीशी असल्याने तिने सत्यवतीला जरी होकार दिला तरी प्रत्यक्ष समागमासाठी आपल्या एका दासीला अलंकारिक वस्त्रे घालून पाठविले. त्या सुंदर दासीने आपले कर्तव्य मनोभावे पार पाडले. कदाचित पहिले दोन राजपुत्र मानले गेलेले व्यासपुत्र सव्यंग जन्मले व आपला पुत्र जर अव्यंग जन्मला तर कदाचित पुढेही त्याला राज्यकारभारात महत्त्वाचा वाटा मिळू शकेल या भावनेने देखील असावे. कारण काहीही असो, पण व्यास तृप्त झाले. आपली आपल्या सुनेकडून फसवणूक झाली हे सत्यवतीच्या लक्षात आले. व्यास मात्र एका अव्यंग पुत्राचे दान एका दासीच्या झोळीत टाकून गेले. पुढे दिवस भरल्यावर तिला जो पुत्र झाला तो होता महात्मा विदूर. अर्थातच दासीपुत्र असल्याने त्याला तत्कालिन प्रथेप्रमाणे राजपद काही मिळू शकणार नव्हते.
व्यासांचा महाभारतात वेळोवेळी हस्तक्षेप
या सर्व कथाभागात आपल्या लक्षात काही गोष्टी येतात त्या म्हणजे, अंबिकेचा पुत्र अंध उपजला हे त्याच्या जन्मानंतरच लक्षात आले. पण तो तसाच निपजणार हे व्यासांकडून वदविणे म्हणजे व्यासांना भविष्यकाळाचे ज्ञान होते असे दर्शविणे होय. तसे खरेच असते तर अंबालिकेकडून पुत्र प्राप्ती करून घेण्यासाठी, धृतराष्ट्र जन्माची वाट पाहण्याची आवश्यकता नव्हती. व वाट पाहायची होती तर आधी व्यासांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनाही व्यवस्थित नीटनेटक्या रुपात स्वतःला अंबालिकेसमोर येता आले असते व तिचा पुत्र मग पांडूवर्णीय न निपजता.
हीच गोष्ट तिसऱ्या वेळेची. पण त्याही वेळी ते एखाद्या राजकन्येला घृणा येईल अशा अवतारात होते. व त्याचमुळे राज्याचा उत्तराधिकार पणाला लागला असल्याचे ठाऊक असून देखील, अंबिकेने स्वतः न जाता दासीला त्यांच्याकडे पाठविणे पसंत केले. म्हणजे वर्षभराच्या अंतराने जन्माला आलेल्या धृतराष्ट्र व पांडू यांच्या जन्मासंबंधी महाभारतकारांनी आपल्याला व्यासमुखातून सांगितलेले भाकीत म्हणजे नंतरच्या काळात घुसविलेला प्रक्षेप असावा असे वाटते.
पण इथून पुढे सुरु होते ती कहाणी केवळ कुरु वंशाचीच नसून व्यासांच्या पुत्रांचीही असल्याने महाभारत कथेमध्ये वेळोवेळी होत असणारा व्यासांचा हस्तक्षेप हा केवळ महाभारतकार असा नसून तो एक पिता व पितामह असा देखील असल्याचे आपल्या लक्षात येईल.