महाभारतातील अतर्क्य व चमत्कृतीपूर्ण घटनांचे मानवीय विश्लेषण

Showing posts with label Vyas. Show all posts
Showing posts with label Vyas. Show all posts

Monday, July 19, 2021

कुरुंचे वंशज कि व्यासपुत्र ?


हस्तिनापुरात विचित्रविर्याचा मृत्यू झाल्यावर सत्यवती वर मात्र आभाळ कोसळलं.  विचित्रवीर्य देखील अपत्यहीन मृत्यू पावल्याने आता हस्तिनापूरच्या गादीला वारस उरला नव्हता, व त्यामुळेच आता ज्या राज्याच्या मोहाने सत्यवतीने भीष्मप्रतिज्ञा घडवून आणली होती, तेच राज्य निर्वंश होण्याचा धोका निर्माण झाला.  व ते टाळण्यासाठी सत्यवतीने भीष्मालाच  आपलं ब्रह्मचर्य व्रत मोडण्याची विनंती केली. 

ही विनंती भीष्मांनी अर्थातच अमान्य केली.  यात महाभारतकार भीष्मांच्या वयाचा विचार मात्र मुळीच मध्ये आणत नाहीत.  ते केवळ आपल्यासमोर मांडतात ते सुमारे ८० वर्षे वयाच्या भीष्मांचा प्रतिज्ञा पालनाचा निग्रह. 

 भीष्मांनी मग आपल्या मातेला यातून एक मार्ग सुचविला व तो म्हणजे एखादा सुयोग्य ब्राह्मण बघून अंबिका व अंबालिकांशी  नियोग घडवून आणण्याचा.  तत्कालीन समाजामध्ये, काही विशिष्ट परिस्थितीमध्ये, संततीप्राप्तीचा नियोग हा सर्वमान्य व धर्ममान्य मार्ग होता.  यावर सत्यवतीने देखील आपल्या पुत्राला, भीष्माला, आपल्या विवाहपूर्व पराशर ऋषींसोबतच्या  संबंधांची व त्यातून जन्मलेल्या कृष्णद्वैपायन या कानीन पुत्राची  गोष्ट सांगितली,  तेव्हा ही भीष्मांना यात काही वावगे असल्याचे जाणवले नाही.  याउलट कनिष्ठ भ्राता व अधिकारी ब्राह्मण या न्यायाने व्यासांना नियोगासाठी पाचारण करणे योग्य ठरेल, असा निर्वाळा देखील भीष्मानी सत्यवतीला दिला. 

सत्यवतीच्या क्षत्रियकुलीन असण्याचे महत्व 

या ठिकाणी महाभारतकारांनी सत्यवतीला क्षत्रिय कुलीन ठरविण्याचे महत्त्व पुन्हा एकदा आपल्या लक्षात येते.  ती जर हीन कुलीन ठरवली गेली असती तर, पिता  ब्राह्मण (पराशर) व हीन कुलीन माता सत्यवती यांची संतती असलेले कृष्णद्वैपायन देखील हीन कुलीन ठरले असते.  महाभारतकारानी सत्यवती हि  राजा उपरिचर वसूची क्षत्रिय कन्या असल्याची कथा अगदी जाणीवपूर्वक रचल्याचे यावरून आपल्या लक्षात येते. 

भीष्मांचे  मत विचारात घेत व नियोगासाठी व्यासांना पाचारण करण्यासाठी भीष्मांची  संमती मिळवली सत्यवतीने  सुनांद्वारे नियोग पद्धतीने राज्याचा वारस मिळविण्याचे ठरविले खरे,  पण यासाठी तिने आपल्या सुनांची,  अंबिका अथवा अंबालिकेची  संमती मात्र गृहीत धरली होती. सुरुवातीला या प्रकारे परपुरुषाकडून संतती निर्मितीला त्या तयारच नव्हत्या.  पण सत्यवतीच्या हट्टापुढे त्यांचे काही चालले नाही व त्या नाईलाजास्तव राजी झाल्या.  सत्यवतीने व्यासांना पाचारण केले (व ते प्रकट झाले असे महाभारत सांगते).  ते हजर होताच  सत्यवतीने त्यांना बोलावण्याचे प्रयोजन सांगितले.  तेव्हा त्यांनाही काहीसा धक्का बसला व आपल्याला व तसेच सत्यवतीच्या सुनेला देखील मानसिक व शारीरिक तयारी करण्याकरता एक वर्षाचा कालावधी लागेल असे त्यांनी सांगितले. पण सत्यवती एवढा काळ वाट पाहायला तयार नव्हती. अशा प्रकारे विना-वारस वेळ घालविल्यास प्रजेत अराजक माजेल,  राज्य निर्नायकी  राहिल,  या कारणास्तव एवढा वेळ थांबण्यास तिने व्यासांना नकार दर्शविला. लगेचच नियोग विधीची रीतसर घोषणा करण्यात आली. 

व्यासांचे उग्र रूप 

अंबिकेची समागमाची मानसिक तयारीच नव्हती. तिला नक्की कुणाशी समागम करायचा आहे याची देखील कल्पना नव्हती. तिचा दीरच समागमासाठी येईल असे सांगण्यात आले तेव्हा तिच्या मनात भीष्मांची  प्रतिमा होती,  पण प्रत्यक्षात  पलंगावर तयार असणाऱ्या अंबिकेच्या समोर उभे राहिले ते, कृष्ण वर्णाचे, पिंगट जटांचे, तारट डोळ्यांचे, पिंगट दाढी-मिशांचे व बेढब अंगाचे,  व्यास (होय,  व्यासांचे असेच वर्णन महाभारतकारांनी म्हणजे खुद्द व्यासांनीच करून ठेवले आहे).  आणि या अशा अवताराला घाबरून अंबिकेने आपले डोळे घट्ट मिटून घेतले व ती केवळ शरीराने त्या प्रक्रियेला सामोरे गेली.  अंबिकेच्या पुत्राचे धृतराष्ट्राचे अंधत्व, हा याच घट्ट डोळे मिटुन घेण्याचा परिणाम होता,  असे व्यासांनी सत्यवतीला लगेचच सांगितल्याचे महाभारतकार आपल्याला सांगतात. 

यानंतर लगेचच व्यास तिथून निघून गेले.  यथावकाश अंबिकेला जो पुत्र झाला तो जन्मांध निपजला.  तो म्हणजेच धृतराष्ट्र.  त्याच्या अंधत्वामुळे भविष्यात त्याला राज्यकारभार करता येणार नाही म्हणून, सत्यवतीने पुन्हा एकदा व्यासांना पाचारण केले.  यावेळी अंबालिकेची  पाळी होती.  अंबिकेचा अनुभव गाठीशी होताच,  पण अंबालिका देखील व्यासांना पाहताच भीतीने पांढरीफटक पडली.  त्यामुळे तिच्याशी समागम केल्यानंतर होणारा पुत्र पांडूवर्णी होईल, असे व्यासांनी सांगितले.  अंबालिकेला दिवस भरताच  खरोखरीच तिला एक पांडूवर्णी (त्वचेचा रंग  असणारा)  पुत्र झाला असे महाभारतकारानी नोंदविले.  हाच पांडू याच  नावाने प्रख्यात झाला. 

 या दोन्ही कुमारांमध्ये व्यंग असल्यामुळे सत्यवतीने  पुन्हा एकदा व्यासांना आवाहन / पाचारण केले व अंबिकेला तयार राहण्यास सांगितले.  पण सुमारे दीड-दोन वर्षांपूर्वीचा भीतीप्रद अनुभव गाठीशी असल्याने तिने सत्यवतीला जरी होकार दिला तरी प्रत्यक्ष समागमासाठी आपल्या एका दासीला अलंकारिक वस्त्रे घालून पाठविले.  त्या सुंदर दासीने आपले कर्तव्य मनोभावे पार पाडले. कदाचित पहिले दोन राजपुत्र मानले गेलेले व्यासपुत्र सव्यंग जन्मले व आपला पुत्र  जर अव्यंग जन्मला तर कदाचित पुढेही त्याला राज्यकारभारात महत्त्वाचा वाटा मिळू शकेल या भावनेने देखील असावे.  कारण काहीही असो,  पण व्यास तृप्त झाले. आपली आपल्या सुनेकडून फसवणूक झाली हे सत्यवतीच्या  लक्षात आले. व्यास मात्र एका अव्यंग पुत्राचे दान एका दासीच्या झोळीत टाकून गेले.  पुढे दिवस भरल्यावर तिला जो पुत्र झाला तो होता महात्मा विदूर.  अर्थातच दासीपुत्र असल्याने त्याला तत्कालिन प्रथेप्रमाणे राजपद काही मिळू शकणार नव्हते.  

 व्यासांचा महाभारतात वेळोवेळी हस्तक्षेप 

 या सर्व कथाभागात आपल्या लक्षात काही गोष्टी येतात त्या म्हणजे,  अंबिकेचा पुत्र अंध उपजला हे त्याच्या जन्मानंतरच  लक्षात आले.  पण तो तसाच निपजणार हे व्यासांकडून वदविणे म्हणजे व्यासांना भविष्यकाळाचे ज्ञान होते असे दर्शविणे होय.  तसे खरेच असते तर अंबालिकेकडून पुत्र प्राप्ती करून घेण्यासाठी, धृतराष्ट्र जन्माची वाट पाहण्याची आवश्यकता नव्हती.  व वाट पाहायची होती तर आधी व्यासांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनाही व्यवस्थित नीटनेटक्या  रुपात स्वतःला अंबालिकेसमोर येता आले असते व तिचा पुत्र मग पांडूवर्णीय न निपजता.  

 हीच गोष्ट तिसऱ्या वेळेची.  पण त्याही वेळी ते एखाद्या राजकन्येला घृणा येईल अशा अवतारात होते.  व त्याचमुळे राज्याचा उत्तराधिकार पणाला लागला असल्याचे ठाऊक असून देखील,  अंबिकेने स्वतः न  जाता दासीला त्यांच्याकडे पाठविणे  पसंत केले.  म्हणजे वर्षभराच्या अंतराने जन्माला आलेल्या धृतराष्ट्र व पांडू यांच्या जन्मासंबंधी महाभारतकारांनी आपल्याला व्यासमुखातून  सांगितलेले भाकीत म्हणजे नंतरच्या काळात घुसविलेला प्रक्षेप असावा असे वाटते. 

 पण इथून पुढे सुरु होते ती कहाणी केवळ कुरु वंशाचीच नसून व्यासांच्या पुत्रांचीही असल्याने महाभारत कथेमध्ये वेळोवेळी होत असणारा व्यासांचा हस्तक्षेप हा केवळ महाभारतकार असा नसून तो एक पिता व पितामह असा देखील असल्याचे आपल्या लक्षात येईल. 

_________________________________________________________________________________
संदर्भ : प्रचलित आवृत्ती अध्याय १०५ व १०६, चिकित्सक आवृत्ती - अध्याय १००

Wednesday, April 21, 2021

महाभारतकार व्यासांची जन्मकथा

महाभारत कथेची सुरुवात जरी व्यासांच्या जन्माच्या आधी होत असली तरी या कथेत स्वतः व्यास वारंवार भूमिका निभावत असल्याने, महाभारताच्या मुख्य कथानकाला सुरुवात करण्यापूर्वी व्यासांची जन्मकथा जाणून घेणे आवश्यक आहे. महाभारतात असलेले सर्व नाट्य थोड्याफार प्रमाणात व्यास जन्माच्या कथेत देखील आहेच.

महर्षी व्यास हे पराशर मुनी व धीवर कन्या सत्यवती यांचे पुत्र.  त्यांच्या या मात्यापित्यांची कहाणी देखील असंख्य चमत्कारांनी रंगवलेली आणि बरीचशी उत्तरकालीन भर आहे, असे वाटायला लावणारी आहे.  महाभारताच्या पहील्याच म्हणजे आदिपर्वाच्या अध्याय १७६ मध्ये पराशर ऋषींची जन्मकथा येथे ही थोडक्यात अशी..... 

पराशर ऋषींची जन्मकथा

शक्ती ऋषी व कल्माषपाद राजा अरुंद वाटेवर
पूर्वी इश्वाकु वंशातील (रामाचा वंश) कल्माषपाद नावाचा राजा होऊन गेला. एकदा शिकारी करता, हा राजा वनात गेला असताना, एका अरुंद वाटेवर समोरून ज्येष्ठ वशिष्ठ पुत्र शक्‍ती येत होता.  ब्राह्मणाला प्रथम वाट द्यायची हा तत्कालीन संकेत पण राजा वाट द्यायला तयार होईना आणि शक्ती ऋषी देखील वाट सोडेना.  तेव्हा कल्माषपाद राजाने त्याला चाबकाने फोडून काढले आणि त्यामुळे संतापून शक्ती ऋषीने त्याला तू मनुष्य भक्षक राक्षस होशील असा शाप दिला.  त्याबरोबर त्या राजाने शक्तीलाच प्रथम भक्ष केले व त्यानंतर उरलेल्या वशिष्ठ पुत्रांना.  हे कळताच ऋषी वशिष्ठ अतिशय दुःखी झाले व त्यांनी आत्मघाताचे अनेक प्रयत्न केले पण ते सर्व अयशस्वी ठरले.  या सर्व प्रकारात शक्तीची पत्नी अदृश्यन्ती त्यांची पाठराखण करत होती.  व तिच्या गर्भातून येणारा, वेदाध्ययन करणारा एक स्वर वरिष्ठांच्या कानावर पडला तेव्हा वसिष्ठांनी कुतूहलाने अदृश्यन्तीकडे चौकशी केली यावेळी तिने त्यांचा नातू तिच्या उदरात वाढत असल्याचे वसिष्ठांना सांगितले हे कळताच त्यांचे नैराश्य पळाले.  यथावकाश अदृश्यन्तीला जो पुत्र झाला त्याचे नाव वसिष्ठांनी पराशर असे ठेवले. 

सत्यवतीची जन्मकथा 

उपरिचर वसु नावाचा एक राजा होता.  इंद्राच्या इच्छेप्रमाणे त्याने चेदी राज्य जिंकले त्यामुळे इंद्राने त्याची स्तुती करत त्याला सज्जनांचा प्रतिपाळ करण्यासाठी कळकाची काठी दिली.  नवीन संवत्सराचा सुरुवातीला या राजाने ती  काठी जमिनीत रोवून त्यावर शेला व पुष्पमाला बांधून त्याची पूजा केली. तद्नंतर प्रत्येक संवत्सराच्या (वर्षाच्या) सुरुवातीला ही प्रथाच झाली आजही नववर्षाच्या सुरुवातीला असे गुढी पूजन केले जाते. 

या उपरिचर वसुला गिरीका नावाची पत्नी होती.  ती ऋतुमती होण्याच्या काळातच राजाला राजवाड्यातील वयोवृद्धांना मांसान्न हवे म्हणून शिकारीसाठी वनात जावे लागले. वनातच गिरीकेच्या आठवणीने राजाचे  वीर्यस्स्खलन झाले.  ते वाया जाऊ नये म्हणून राजाने ते एका द्रोणात धरले व ते गिरिके पर्यंत पोहोचण्यासाठी एका श्येन पक्षाला दिले.  हा पक्षी यमुने वरून जात असता त्याच्या चोचीत काहीतरी पाहून दुसऱ्या एका श्येन पक्षाने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्याशी झालेल्या झटापटीत तो द्रोण यमुनेच्या पाण्यात पडला.  त्या यमुनेच्या पाण्यात अद्रिका नावाची अप्सरा शापामुळे मासा झाली होती.  तिने ते वीर्य गिळले व त्यातून तिला गर्भ राहिला.  पुढे ती प्रसूत झाल्यावर तिला एक मानवी जुळे झाले.  ही जुळी मुले कोळ्यांनी राजा उपरिचर वसु कडे नेली. पैकी जो मुलगा होता तो राजाने ठेवून घेतला तर मुलगी राजाने त्या धीवराला दिली व स्वतःच्या मुलीसारखा प्रतिपाळ करण्यास सांगितले तीच मुलगी म्हणजे सत्यवती. या दोन मानवी मुलांना जन्म देऊन अप्सरा आद्रिका शापमुक्त झाली.

पराशर व सत्यवती यांच्या जन्मकथेचा मतितार्थ

या दोन्ही कथा पाहता आपल्या असे लक्षात येते की हा सर्व खटाटोप व्यासांच्या माता-पित्यांना व पर्यायाने व्यासांना उच्चकुलीन ठरवण्यासाठी उत्तरकाळात केला गेला असावा.  यात पराशरांचे वडील  शक्ती ऋषी कल्माषपाद  राजा पेक्षा श्रेष्ठ व वशिष्ठ कुळातील असे सांगितले गेले,  तर धीवर कन्या मत्स्यगंधा प्रत्यक्षात एका अप्सरेच्या पोटी जन्माला आलेली क्षत्रिय राजकन्या असे दाखवण्याचा प्रयत्न आहे.  कदाचित प्रत्यक्षात राजा उपरिचर वसु, अद्रिका या एखाद्या यमुना काठच्या धीवर कन्येबरोबर रत  झाला असावा व त्यातून मत्स्यगंधा सत्यवतीचा जन्म झाला असावा.

व्यासमहर्षींचा जन्म 

पराशर मुनी व सत्यवती
तर असे हे पराशर मुनी यमुनेच्या किनाऱ्यावर नाव चालवणाऱ्या या सत्यवती नामक धीवर कन्येवर आसक्त  झाले व त्यांनी तिला नावेतच समागमाची विनंती केली.  त्यावेळी ऋषींना नाही कसे म्हणायचे?  मग तिने त्यांना, दोन्ही किनाऱ्यांवर ऋषी उभे आहेत,  असे दाखवले.  तेव्हा त्यांनी आपल्या तपोबलाने नावेभोवती धुके निर्माण केले.  त्यावर सत्यवतीने माझे कौमार्य नष्ट होईल असे सांगताच, ऋषींनी तिला ती कुमारीच  राहील असा आशिर्वाद दिला व एखादा वर मागण्यास सांगितले.  तेव्हा माझ्या सर्वांगाचा माशांचा वास जावून छान सुगंध येऊ देत असा वर तिने मागितला.  ऋषींनी तिची ही इच्छा देखील पूर्ण केली व तिचे नाव गंधवती अथवा योजनगंधा असे देखील पडले.  त्यानंतर पराशर ऋषींनी तिच्याबरोबर समागम केला व ती गर्भवती झाली. 

कालांतराने यमुनेतील  एका द्वीपावर (बेटावर) ती प्रसूत झाली.  रंगाने कृष्णवर्ण असलेल्या व द्वीपावर जन्मलेल्या मुलाला सर्वजण कृष्णद्वैपायन म्हणून ओळखू लागले.  पुढे या ज्ञानी पुत्राने शाखा भेदाला अनुसरून वेदांचा विस्तार केला म्हणून त्यांना व्यास हे नाव प्राप्त झाले. 

या कथेतील वरदान नक्की काय ?

या कथेतून आपल्याला असे लक्षात येते की तपोबलापेक्षा आसक्ती,  ती देखील क्षणिक कामासक्ती प्रबळ ठरते व पराशरांसारखे ऋषी देखील त्याला सहज भुलतात.  सत्यवतीला त्यांनी दिलेल्या कौमार्य भंग न होण्याचा वर म्हणजे द्विपावरील तिच्या वास्तव्याने तिची प्रसूती कुणाच्याच लक्षात येणार नाही व मी या पुत्राला लगेच घेऊन जाईन असे वचन जे त्यांनी सत्यवतील दिले व ते पाळले देखील. सत्यवती पुन्हा तिचे आयुष्य तिच्या परीने जगायला मोकळी झाली, असाच याचा अर्थ.  बरे, या प्रसूतिकालाच्या महिन्यांमध्ये माशांपासून दूर एका बेटावर राहिल्याने तिला माशांचा गंध पण येणार नाही,  हे वराचे  आणखी एक स्वरूप. 

पुढील महाभारत 

यमुनेच्या काठावर हे सर्व घडत असतानाच तिकडे दूर हस्तिनापुरात मात्र काही वेगळ्याच घटना घडून गेल्या होत्या आणि या घटनांचा व हस्तिनापुरातील त्या घटनांचा एकमेकात मिलाफ होत पुढे महाभारत घडणार होतं. काय होत्या त्या घटना ? ते आपण पुढील लेखापासून पाहू.

Monday, April 12, 2021

महाभारताचे शुद्धीकरण व BORI

प्रक्षिप्त म्हणजे नक्की काय ?

महाभारताचा अभ्यास करायला लागलं कि हळू हळू त्यातील कोडी सुटायला लागतात आणि व्यासांच्या अगाध प्रतिभेचा प्रत्यय येऊ लागतो. व्यासोच्छिष्ट्म जगत सर्वम म्हणजेच या एका महाकाव्यानेच व्यासांनी जगातलं सर्वच उष्ट करून सोडलेलं आहे या उक्तीचा प्रत्यय येतो. आणि मग यदि हास्ति तद्न्यत्र यन्नेहास्ति न तत् क्वचित ( यात जे आहे ते जगात सर्वत्र आहे मात्र यात जे नाही ते जगात कुठेच सापडावयाचे नाही)  हेदेखील समजते. असं काय विशेष आहे यात ? कसं बनले हे इतकं सर्वसमावेशक ?


महाभारत हा इतिहास असल्याचं खुद्द व्यासांनीच सांगून ठेवलंय. हा इतिहास घडला कधी असावा,  हा वेगळ्या संशोधनाचा विषय आहे. व्यासांनी हे महाभारत सर्व प्रथम त्यांच्या सुमंतू , जैमिनी, पैल , शुक (व्यासपुत्र) व वैशंपायन या ५ शिष्याना सांगितले. व्यासांनी सांगितलेला या इतिहासात वेळोवेळी भर पडत गेली व एक अवाढव्य महाकाव्य घडत गेलं.  ही हस्तलिखिते तयार होताना / झाल्यावर, त्याचा प्रसार भारताच्या इतर भागांमध्ये व भाषांमध्ये होत गेला.  त्यातील कथाकाव्य देखील लोकांना भावले व प्रतिभावंतांनी त्यात आपल्या प्रतिभेचे रंग भरले. यात वेळोवेळी वेगवेगळ्या प्रांतांचे , कवींचे , शासकांचे संस्कार घडत गेले व ते इतके बेमालूम होते कि यातील मूळ गाभा कोणता व वर चढवलेला साज कोणता हे समजणं  कठीण होऊन बसलं. हि  अनावश्यक भर म्हणजेच प्रक्षिप्तता.  मूळ संहिता वाढत वाढत लक्ष श्लोकांवर पोहोचली आणि यातील गाभा वेगळा करण्याचं काम शिवधनुष्य पेलण्याएवढं कठीण होऊन बसलं. 

भांडारकर संस्थेची संशोधित प्रत 
संशोधित प्रत (Critical Edition) म्हणजे महाभारताच्या अनेक प्रतींचा अभ्यास करून बनविलेली तौलनिक प्रत.  एक अशी प्रत की जी कालौघात बरीच मागे जाईल व अनेकविध प्रकारांनी महाभारतात पडलेली अनावश्यक भर दूर करेल.  यापूर्वी आपल्याला उपलब्ध असलेली शेवटची सर्व समावेशक प्रत, छत्रपतींच्या शिवरायांना समकालीन असलेल्या सतराव्या शतकातील निळकंठ याची होती.  निळकंठ चतुर्धर या महाराष्ट्रीय संस्कृत पंडिताने भारतातल्या बऱ्याच प्रतींचा अभ्यास करून, स्वतःच्या संस्कृत टिपणांसह ही सर्वसमावेशक प्रत काशी(वाराणशी) येथे  बनविली. 

भांडारकर इन्स्टिट्यूट मे १९२० च्या सुमारास संशोधित प्रत बनविण्याचे काम हाती घेतले. औंध संस्थानाचे श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी त्या काळी या प्रकल्पासाठी सुमारे एक लक्ष रुपयांची मदत केली होती.डॉक्टर विष्णू सुखटणकर १९२५ च्या सुमारास आपली डॉक्टरेट पूर्ण करून भारतात परतले आणि त्यांनी या कामात आपल्याला झोकून दिले.  त्यासाठी त्यांनी भारतभर विखुरलेल्या विविध भाषातील महाभारताच्या प्रतींचा तौलनिक अभ्यास करायचे ठरविले.  यात काही प्रतींमध्ये फक्त काही पर्वेच सापडली (त्यात संपूर्ण अठरा पर्वे नव्हती).  सुखटणकर यांच्या या पद्धतशीर अभ्यासाचा हेतू हा होता की महाभारताची जास्तीत जास्त जुनी प्रत प्रसिद्ध करणे. म्हणजे असे करताना त्यात भरीला घातले गेलेले चमत्कार, रूपके  इत्यादी आपोआपच गळून पडतील.  

महाभारताची विविध हस्तलिखिते केवळ देशाच्या विविध भागातच  नाही तर नेपाळ, जावा अशी भारताबाहेर देखील आढळली.  भांडारकर संस्थेने अशी देशाच्या अनेक भागात  विखुरलेली हस्तलिखिते एकत्र केली. त्यांचा अभ्यास करून जुन्यात जुन्या प्रतीत एखाद्या पर्वात कोणते श्लोक होते व कोणते नव्हते ते पाहिले,  व त्यातून भांडारकर संस्थेची एक प्रत प्रसिद्ध केली. १९४३ च्या सुमारास डॉ सुखटणकरांचे निधन झाले त्यांच्यानंतरही सुमारे २३ वर्षे, त्यांचे सहकारी श्री दांडेकर, श्री बेलवलकर , पा.वा.काणे , गजेंद्रगडकर, व्ही.के.राजवाडे, उटगीरकर  यांनी हे काम सुरु ठेवले व ते १९६६ च्या सुमारास पूर्ण केले. आज अभ्यासकांमध्ये भांडारकर संस्थेची (BORI) हीच प्रत प्रमाण मानली जाते. अशा प्रकारे तयार केलेली ही प्रत आपल्याला इसवी सन १००० च्या सुमारास अस्तित्वात असलेल्या महाभारतीय काव्याच्या जवळ घेऊन जाते. म्हणजेच निळकंठ यांच्याही सुमारे सहाशे ते सातशे वर्षे आधी. पण अर्थातच हि प्रत म्हणजेच खरे महाभारत असे आपल्याला अजूनही म्हणता येत नाही. 

भृगु सिद्धांत
डॉक्टर सुखटणकर यांना विविध हस्तलिखितांचा अभ्यास करताना असे लक्षात आले की हे काव्य इसवी सनाच्या उत्तर काळात कधीतरी भृगु कुलातील ऋषींच्या हाती गेलेले आहे व त्यांनीच आपल्या कुलाचे महत्त्व वाढविण्याच्या दृष्टीने त्यात बरीच भर घातलेली आहे. त्यामुळेच यात ब्राह्मणी गुणगानाची बरीच भर आढळते. 

महाभारतातील प्रक्षेप मानल्या गेलेल्या काही घटना 
यातील सर्वात सुरुवातीचा प्रक्षेप आहे तो गणेश कथेचा,  ज्यात व्यासांनी सांगितलेले महाभारत काही अटींवर श्रीगणेशाने लिहिले  हा.  व्यासमहर्षीच्या काळात कोणतीही लिपी अस्तित्वात नव्हती व त्यामुळे भर होता तोच स्मृतींवर.   महाभारत कथा शतकानुशतके स्मृतींवर पुढे सरकली व जेव्हा कधी लिपीची निर्मिती झाली त्यावेळी ते हस्तलिखितात उतरवले गेले.  त्यातही संस्कृत केवळ देवनागरी लिपीतच लिहिले गेले असे मानण्याचे काहीच कारण नाही.  कारण देवनागरी लिपी ही साधारणपणे इसवी सन एक हजार च्या आसपास सुस्थितीला पोहोचली असावी असे मानण्यात येते. 

आता आपण अशा काही घटना पाहू कि ज्या खूप प्रसिद्ध आहेत पण भांडारकर प्रतीने त्यांना उत्तरकालीन प्रक्षेप ठरविले आहे. यात मुख्यत्वेकरून 
  • कणिक नावाच्या मंत्र्याने लाक्षागृह प्रसंगी धृतराष्ट्राला सांगितलेली कणिक नीती ,
  • द्रौपदीने स्वयंवराच्या वेळी कर्णाला सूतपुत्र म्हणाल्याचा उल्लेख
  • द्रौपदीला वस्रहरणाच्या वेळी कृष्णाने वस्त्रे पुरविल्याची घटना , 
  • द्रौपदीला सूर्याने थाळी दिली व त्यामुळे दुर्वास तिचे सत्वहरण करू शकले नाहीत हि घटना, 
 या काही घटना येतात. इतर अशा घटना आपण याच ब्लॉगवर पुढे सविस्तर पाहूच. 

सुखटणकरांची पद्धत 
भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिटयूट (BORI) या संस्थेने भारतातील सर्व भाषांतील हस्तलिखिते व मुद्रित प्रति मिळविल्या. यात उत्तरेकडील काश्मीर भागातील शारदा लिपीतील व याच भागातील (काश्मीर व उत्तरेकडील) देवनागरी हस्तलिखितांचा देखील  समावेश होतो. मध्य पूर्वेकडील भागातून (गंगा यमुना प्रदेश) नेपाळी, मैथिली व बंगाली भाषेतील प्रतीचा एक वेगळा गट तयार केला . दक्षिणेकडील तेलगू + ग्रंथ लिपीतील हस्तलिखिते व मल्याळम हस्तलिखिते हि दक्षिण गटात मोडतात. सुखटणकरांनी केलेली वर्गवारी सोबतच्या तक्त्यात दाखविली आहे. हि वर्गवारी ग्रीक अक्षरांनी दर्शविली जाते. 

(१) अशी १२ लिप्यांमधील सुमारे १२५९ हस्तलिखिते त्यांनी जमविली पण प्रत्यक्षात अभ्यासाअंती केवळ ७३४ हस्तलिखितं वापरता आली. 
(२) यात एकाच पर्वाच्या पूर्णपणे वेगळ्या आवृत्त्यांमध्ये त्याचा अंतर्भाव असेल तर तो श्लोक संशोधित आवृत्तीत घेतला गेला. 
(३) काही न पटणाऱ्या (चमत्कार, वर, शापांशी निगडित असूनदेखील) गोष्टी जर सर्व मूळ आवृत्त्यांमध्ये सापडत असतील आत त्या संशोधित आवृत्तीत देखील राखल्या गेल्या. यात पांडूच्या निधनानंतरच्या वर्णनाचे उदाहरण देता येईल. यात त्याचे वनात दहन केले असे उल्लेख आहेत व त्याचबरोबर पांडू व माद्रीचे शव हस्तिनापुरात आणून तेथे दहनसंस्कार झाले असेही उल्लेख आढळतात व हे दोन्हीही परस्परविरोधी उल्लेख संशोधित आवृत्तीत ठेवले गेलेले आहेत. 
(४) जेव्हा आवृत्त्यांमध्ये वर्णनाचे फरक आढळले तेव्हा जास्तीत जास्त आवृत्त्यांमध्ये आढळले गेलेले वर्णन संशोधित आवृत्तीत ठेवले गेले. 
(५) वर्णनाची भर असलेले श्लोक, समागमाचे वर्णन वगळण्यासाठी तयार केलेले पर्यायी श्लोक यांचा योग्य तो विचार करून त्यातील मुख्य तथ्यांश शोधून तो संशोधित आवृत्तीत राखला गेला. 

काश्मीरमधील शारदा लिपीतील भूर्जपत्रांवरील हस्तलिखितांचा या कमी बराच उपयोग झाला.य. मुख्य म्हणजे यातील एका श्लोकात आदिपर्वातील श्लोकसंख्येचे वर्णन करणारा एक श्लोक आढळला ज्यातील श्लोकसंख्या (७९८४) संशोधित आवृत्तीने काढलेल्या श्लोकसंख्येशी तंतोतंत जुळली , तो श्लोक असा 

सप्त श्लोकसहस्त्राणि तथा नव शतानिच  ।
श्लोकाश्च चतुराशीति ग्रंथो दृब्द्धो  महात्मना ।।

यातील फक्त आदिपर्वातील एकूण श्लोकसंख्या ७९८४ एवढी सांगितली आहे तर निळकंठ प्रतीत ती ८८८४, कुंभकोणम (दक्षिण) प्रतीत १०८८९ एवढी होती. 

या सर्व अभ्यासासाठी BORI ला क्षेमेंद्र च्या भारतमंजिरी, देवबोध यांच्या ज्ञानदीपिका , अर्जुनमिश्र यांच्या भारतसंग्रहदीपिका , निळकंठ यांच्या भावार्थदीपिका, तसेच विमलबोध व सर्वज्ञ नारायण यांच्या ग्रंथ टिपांचाही बराच उपयोग झाला. 

BORI चे हे कार्य खरोखरच अवजड शिवधनुष्य पेलणारे महान कार्य होते व ते वर उल्लेखलेल्या संशोधकांबरोबरच तर अनेक संशोधकांनी ४ दशकांहून अधिक काळ अपार परिश्रम घेत पार पाडले. 

Friday, March 26, 2021

महाकाव्याची भव्यता

महाभारताचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे.  सुमारे एक लक्ष श्लोकांसह जगातील सर्वात मोठे काव्य म्हणून मान्यता पावलेले महाभारत जिथून सुरु होते तिथेच ते संपते  देखील. हे कसे? आपण जी कथा वाचतो ही कथा लोमहर्षण (अथवा रोमहर्षण)  यांचा पुत्र उग्रश्रवा सौती  नैमिषारण्यातील शौनकादि ऋषींना सांगतो तेथपासून.  आता आपण या कथेचा उगम पाहू.

महाभारत युद्धामध्ये कौरव-पांडवांकडील सर्व योद्धे मारले जातात व वाचतात केवळ पांडव. पांडवांचा वंश शिल्लक राहतो तो केवळ अर्जुन-पुत्र अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या पोटी. युद्धानंतर ३६ वर्षे युधिष्ठिर राज्य करतो व

पांडवांच्या पश्चात अभिमन्यूपुत्र परीक्षित राजा होतो आणि पांडव स्वर्गारोहणाला निघून जातात. राजा परीक्षिताचा मृत्यू सर्प दंशाने होतो व हे कळल्यावर परीक्षिताचा पुत्र (अभिमन्यूचा नातू)
राजा जनमेजय हे सर्पसत्र (सर्पसत्र म्हणजे सर्पांची आहुती देणारा यज्ञ) आयोजित करतो. या यज्ञासाठी आलेले वैशंपायन नावाचे ऋषी राजा जनमेजयाला आपल्या आजोबा-पणजोबांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगण्यासाठी या भारत कथेचं निवेदन करतात. (सर्पसत्र सध्याच्या तक्षशिला परिसरात, जे आता पाकिस्तानात आहे, तेथे झाले असे मानण्यात येते).  त्यांनी हि कथा जय या नावाने व्यास महर्षींच्या तोंडून ऐकलेली असते. त्यात स्वतःच्या उपकथानकांची भर घालून ते त्याला भारत बनवतात.  अशा रीतीने हे एक वर्तुळ पूर्ण होतं. याच यज्ञाच्या ठिकाणी ही कथा सौतीने ऐकली आणि आपल्या अनेक उपकथानकं व रूपक कथांची भर घालून त्याचं जे महाकाव्य बनलं तेच आपण ऐकत / वाचत असलेलं
महाभारत. 

व्यासांचे जय हे केवळ ८८०० श्लोकांचं असल्याचं मानलं जातं , तर वैशंपायनांचे भारत २४००० श्लोकांचं बनलं. आणि उग्रश्रवा सौतीनी जेव्हा ते नैमिषारण्यात शौनकादी मुनींना सांगितले तेव्हा ते सुमारे १ लक्ष श्लोकांचे बनले (मुख्य महाभारताचे ८४००० श्लोक + १६००० श्लोकांचे खिलपर्व किंवा हरिवंश ) . अर्थात हि सत्यासत्यता आपल्याला तपासून पाहता येत नाही. 

असं हे महाकाव्य भारताच्या किंवा जगाच्या इतर काव्याच्या तुलनेत किती मोठे आहे हे आपण या लेखासोबत असलेल्या एका तुलनात्मक तक्त्याद्वारे पाहू शकतो. महाभारत हे रामायणाच्या सुमारे चार पट मोठे असून इलियड व ओडिसी या ग्रीक महाकाव्यांच्या एकत्रित श्लोकसंख्येपेक्षा देखील चौपट आहे. 


गणेशाने लिहिलेलं काव्य ?

एवढं मोठं महाकाव्य अस्तित्वात कसं  आलं असेल ?  हे देखील एक कोडंच आहे. याबद्दल असे सांगितलं जाते कि व्यासांना हे काव्य स्फुरलं व त्यांना ते लिहून घेण्यासाठी श्री गणेशाला विनंती केली. गणेशाने देखील ते मान्य करताना एक अट घातली कि व्यासांनी ते सांगताना कोठेही थांबायचं नाही. व्यासांनी देखील हि विनंती मान्य करताना श्री गणेशाला एक प्रति अट घातली कि त्यानेदेखील यातील प्रत्येक श्लोक समजावून घेतल्याशिवाय शब्द बद्ध करायचा नाही. दोघांनी एकमेकांच्या अटी मान्य करत या महाकाव्याच्या निर्मितीला आरंभ केला. महर्षी व्यासांनी देखील स्वतःच्या निर्मितीला वेळ मिळण्यासाठी काही कूट श्लोकांची निर्मिती केली व एक महाकाव्य जन्माला आलं .

पण खरंच असं घडलं असेल का ? हि कथा कशी आली , गणपती हे दैवत संपूर्ण कथेत कुठेच आढळत नसताना लेखनिक म्हणून कसं आले. यातील अशा अनेक कथांचा उहापोह आपण प्रक्षिप्त म्हणजे नक्की काय?  व भांडारकर संस्थेच्या डॉ सुखटणकर व त्यांच्या चमूने ते कसे ठरविले हे पुढील लेखात पाहू .