महाभारतातील अतर्क्य व चमत्कृतीपूर्ण घटनांचे मानवीय विश्लेषण

Showing posts with label Satyavati. Show all posts
Showing posts with label Satyavati. Show all posts

Monday, July 19, 2021

कुरुंचे वंशज कि व्यासपुत्र ?


हस्तिनापुरात विचित्रविर्याचा मृत्यू झाल्यावर सत्यवती वर मात्र आभाळ कोसळलं.  विचित्रवीर्य देखील अपत्यहीन मृत्यू पावल्याने आता हस्तिनापूरच्या गादीला वारस उरला नव्हता, व त्यामुळेच आता ज्या राज्याच्या मोहाने सत्यवतीने भीष्मप्रतिज्ञा घडवून आणली होती, तेच राज्य निर्वंश होण्याचा धोका निर्माण झाला.  व ते टाळण्यासाठी सत्यवतीने भीष्मालाच  आपलं ब्रह्मचर्य व्रत मोडण्याची विनंती केली. 

ही विनंती भीष्मांनी अर्थातच अमान्य केली.  यात महाभारतकार भीष्मांच्या वयाचा विचार मात्र मुळीच मध्ये आणत नाहीत.  ते केवळ आपल्यासमोर मांडतात ते सुमारे ८० वर्षे वयाच्या भीष्मांचा प्रतिज्ञा पालनाचा निग्रह. 

 भीष्मांनी मग आपल्या मातेला यातून एक मार्ग सुचविला व तो म्हणजे एखादा सुयोग्य ब्राह्मण बघून अंबिका व अंबालिकांशी  नियोग घडवून आणण्याचा.  तत्कालीन समाजामध्ये, काही विशिष्ट परिस्थितीमध्ये, संततीप्राप्तीचा नियोग हा सर्वमान्य व धर्ममान्य मार्ग होता.  यावर सत्यवतीने देखील आपल्या पुत्राला, भीष्माला, आपल्या विवाहपूर्व पराशर ऋषींसोबतच्या  संबंधांची व त्यातून जन्मलेल्या कृष्णद्वैपायन या कानीन पुत्राची  गोष्ट सांगितली,  तेव्हा ही भीष्मांना यात काही वावगे असल्याचे जाणवले नाही.  याउलट कनिष्ठ भ्राता व अधिकारी ब्राह्मण या न्यायाने व्यासांना नियोगासाठी पाचारण करणे योग्य ठरेल, असा निर्वाळा देखील भीष्मानी सत्यवतीला दिला. 

सत्यवतीच्या क्षत्रियकुलीन असण्याचे महत्व 

या ठिकाणी महाभारतकारांनी सत्यवतीला क्षत्रिय कुलीन ठरविण्याचे महत्त्व पुन्हा एकदा आपल्या लक्षात येते.  ती जर हीन कुलीन ठरवली गेली असती तर, पिता  ब्राह्मण (पराशर) व हीन कुलीन माता सत्यवती यांची संतती असलेले कृष्णद्वैपायन देखील हीन कुलीन ठरले असते.  महाभारतकारानी सत्यवती हि  राजा उपरिचर वसूची क्षत्रिय कन्या असल्याची कथा अगदी जाणीवपूर्वक रचल्याचे यावरून आपल्या लक्षात येते. 

भीष्मांचे  मत विचारात घेत व नियोगासाठी व्यासांना पाचारण करण्यासाठी भीष्मांची  संमती मिळवली सत्यवतीने  सुनांद्वारे नियोग पद्धतीने राज्याचा वारस मिळविण्याचे ठरविले खरे,  पण यासाठी तिने आपल्या सुनांची,  अंबिका अथवा अंबालिकेची  संमती मात्र गृहीत धरली होती. सुरुवातीला या प्रकारे परपुरुषाकडून संतती निर्मितीला त्या तयारच नव्हत्या.  पण सत्यवतीच्या हट्टापुढे त्यांचे काही चालले नाही व त्या नाईलाजास्तव राजी झाल्या.  सत्यवतीने व्यासांना पाचारण केले (व ते प्रकट झाले असे महाभारत सांगते).  ते हजर होताच  सत्यवतीने त्यांना बोलावण्याचे प्रयोजन सांगितले.  तेव्हा त्यांनाही काहीसा धक्का बसला व आपल्याला व तसेच सत्यवतीच्या सुनेला देखील मानसिक व शारीरिक तयारी करण्याकरता एक वर्षाचा कालावधी लागेल असे त्यांनी सांगितले. पण सत्यवती एवढा काळ वाट पाहायला तयार नव्हती. अशा प्रकारे विना-वारस वेळ घालविल्यास प्रजेत अराजक माजेल,  राज्य निर्नायकी  राहिल,  या कारणास्तव एवढा वेळ थांबण्यास तिने व्यासांना नकार दर्शविला. लगेचच नियोग विधीची रीतसर घोषणा करण्यात आली. 

व्यासांचे उग्र रूप 

अंबिकेची समागमाची मानसिक तयारीच नव्हती. तिला नक्की कुणाशी समागम करायचा आहे याची देखील कल्पना नव्हती. तिचा दीरच समागमासाठी येईल असे सांगण्यात आले तेव्हा तिच्या मनात भीष्मांची  प्रतिमा होती,  पण प्रत्यक्षात  पलंगावर तयार असणाऱ्या अंबिकेच्या समोर उभे राहिले ते, कृष्ण वर्णाचे, पिंगट जटांचे, तारट डोळ्यांचे, पिंगट दाढी-मिशांचे व बेढब अंगाचे,  व्यास (होय,  व्यासांचे असेच वर्णन महाभारतकारांनी म्हणजे खुद्द व्यासांनीच करून ठेवले आहे).  आणि या अशा अवताराला घाबरून अंबिकेने आपले डोळे घट्ट मिटून घेतले व ती केवळ शरीराने त्या प्रक्रियेला सामोरे गेली.  अंबिकेच्या पुत्राचे धृतराष्ट्राचे अंधत्व, हा याच घट्ट डोळे मिटुन घेण्याचा परिणाम होता,  असे व्यासांनी सत्यवतीला लगेचच सांगितल्याचे महाभारतकार आपल्याला सांगतात. 

यानंतर लगेचच व्यास तिथून निघून गेले.  यथावकाश अंबिकेला जो पुत्र झाला तो जन्मांध निपजला.  तो म्हणजेच धृतराष्ट्र.  त्याच्या अंधत्वामुळे भविष्यात त्याला राज्यकारभार करता येणार नाही म्हणून, सत्यवतीने पुन्हा एकदा व्यासांना पाचारण केले.  यावेळी अंबालिकेची  पाळी होती.  अंबिकेचा अनुभव गाठीशी होताच,  पण अंबालिका देखील व्यासांना पाहताच भीतीने पांढरीफटक पडली.  त्यामुळे तिच्याशी समागम केल्यानंतर होणारा पुत्र पांडूवर्णी होईल, असे व्यासांनी सांगितले.  अंबालिकेला दिवस भरताच  खरोखरीच तिला एक पांडूवर्णी (त्वचेचा रंग  असणारा)  पुत्र झाला असे महाभारतकारानी नोंदविले.  हाच पांडू याच  नावाने प्रख्यात झाला. 

 या दोन्ही कुमारांमध्ये व्यंग असल्यामुळे सत्यवतीने  पुन्हा एकदा व्यासांना आवाहन / पाचारण केले व अंबिकेला तयार राहण्यास सांगितले.  पण सुमारे दीड-दोन वर्षांपूर्वीचा भीतीप्रद अनुभव गाठीशी असल्याने तिने सत्यवतीला जरी होकार दिला तरी प्रत्यक्ष समागमासाठी आपल्या एका दासीला अलंकारिक वस्त्रे घालून पाठविले.  त्या सुंदर दासीने आपले कर्तव्य मनोभावे पार पाडले. कदाचित पहिले दोन राजपुत्र मानले गेलेले व्यासपुत्र सव्यंग जन्मले व आपला पुत्र  जर अव्यंग जन्मला तर कदाचित पुढेही त्याला राज्यकारभारात महत्त्वाचा वाटा मिळू शकेल या भावनेने देखील असावे.  कारण काहीही असो,  पण व्यास तृप्त झाले. आपली आपल्या सुनेकडून फसवणूक झाली हे सत्यवतीच्या  लक्षात आले. व्यास मात्र एका अव्यंग पुत्राचे दान एका दासीच्या झोळीत टाकून गेले.  पुढे दिवस भरल्यावर तिला जो पुत्र झाला तो होता महात्मा विदूर.  अर्थातच दासीपुत्र असल्याने त्याला तत्कालिन प्रथेप्रमाणे राजपद काही मिळू शकणार नव्हते.  

 व्यासांचा महाभारतात वेळोवेळी हस्तक्षेप 

 या सर्व कथाभागात आपल्या लक्षात काही गोष्टी येतात त्या म्हणजे,  अंबिकेचा पुत्र अंध उपजला हे त्याच्या जन्मानंतरच  लक्षात आले.  पण तो तसाच निपजणार हे व्यासांकडून वदविणे म्हणजे व्यासांना भविष्यकाळाचे ज्ञान होते असे दर्शविणे होय.  तसे खरेच असते तर अंबालिकेकडून पुत्र प्राप्ती करून घेण्यासाठी, धृतराष्ट्र जन्माची वाट पाहण्याची आवश्यकता नव्हती.  व वाट पाहायची होती तर आधी व्यासांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनाही व्यवस्थित नीटनेटक्या  रुपात स्वतःला अंबालिकेसमोर येता आले असते व तिचा पुत्र मग पांडूवर्णीय न निपजता.  

 हीच गोष्ट तिसऱ्या वेळेची.  पण त्याही वेळी ते एखाद्या राजकन्येला घृणा येईल अशा अवतारात होते.  व त्याचमुळे राज्याचा उत्तराधिकार पणाला लागला असल्याचे ठाऊक असून देखील,  अंबिकेने स्वतः न  जाता दासीला त्यांच्याकडे पाठविणे  पसंत केले.  म्हणजे वर्षभराच्या अंतराने जन्माला आलेल्या धृतराष्ट्र व पांडू यांच्या जन्मासंबंधी महाभारतकारांनी आपल्याला व्यासमुखातून  सांगितलेले भाकीत म्हणजे नंतरच्या काळात घुसविलेला प्रक्षेप असावा असे वाटते. 

 पण इथून पुढे सुरु होते ती कहाणी केवळ कुरु वंशाचीच नसून व्यासांच्या पुत्रांचीही असल्याने महाभारत कथेमध्ये वेळोवेळी होत असणारा व्यासांचा हस्तक्षेप हा केवळ महाभारतकार असा नसून तो एक पिता व पितामह असा देखील असल्याचे आपल्या लक्षात येईल. 

_________________________________________________________________________________
संदर्भ : प्रचलित आवृत्ती अध्याय १०५ व १०६, चिकित्सक आवृत्ती - अध्याय १००

Monday, May 17, 2021

जितेंद्रिय देवव्रत भीष्म (भीष्मप्रतिज्ञा)

गंगेने हाती सोपविलेल्या तेजस्वी कुमार देवव्रताला  घेऊन राजा शंतनू अतिशय आनंदाने हस्तिनापुरात परतला.  सर्वगुणसंपन्न राजकुमार देवव्रताला पाहून नगर जन देखील आनंदी झाले.  राजा शंतनू राज्यकारभारात पुन्हा व्यग्र झाला.  त्याने देवव्रताला युवराज्याभिषेक देखील केला.  अशा प्रकारे सुमारे चार वर्षे सुखात गेली.  यानंतर राज्यकारभार देवव्रतावर सोपवून राजा शंतनु पुन्हा मृगयेत रमू लागला. यावेळी यमुनेच्या तीरावर मृगयेला गेला असताना दूरवरून येणाऱ्या एका सुगंधाने तो धुंद झाला.  या सुगंधाच्या उगमस्थानाचा जेव्हा त्याने शोध घेतला तेव्हा एक लावण्यवती कन्या त्याच्या दृष्टीस पडली आणि राजा शंतनू तिच्याकडे आकृष्ट झाला.  त्याने तिची चौकशी केली
तेव्हा तिने त्याला आपले नाव सत्यवती असून आपण नदीकाठावरील धीवर (कोळी) प्रमुखाची कन्या असल्याचे व उदरनिर्वाहासाठी नौका चालवत असल्याचे तिने सांगितले.  तिच्यावर मोहित झालेल्या शंतनूने तिच्या पित्याला भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली व नंतर त्याला भेटून त्याने त्या धीवराकडे त्याच्या कन्येला सरळ मागणी घातली. 

शंतनूचे  त्या वेळचे वय लक्षात घेता ही मागणी शंतनूने खरं तर राजपुत्र देवव्रतासाठी घालायला हवी होती.  साठी पार केलेल्या शंतनूने आपल्या तरुण राजपुत्राच्या विवाहाचा विचार करायला हवा होता.  पण या वयात देखील शंतनूने असा विवेकी विचार केला नाही. त्याची ही स्थिती सत्यवतीच्या पित्याने  ओळखली व त्याने धूर्तपणे या संधीचा फायदा घ्यायचे ठरवले.  त्याने राजाला आपली अट सांगितली की,  तू माझ्या कन्येच्या  तुझ्यापासून होणाऱ्या  पुत्राला राज्याभिषेक करायला हवा.  देवव्रताला युवराज्याभिषेक करून चुकलेल्या राजा शंतनूला  अर्थातच हा होकार देववला नाही व खिन्न मनाने तो हस्तिनापूरला परतला. 
शंतनू व सत्यवती - (चित्रकार - राजा रवी वर्मा)

याच बरोबर अजून एक गोष्ट आपल्याला ध्यानात घ्यायला हवी ती म्हणजे शंतनू हस्तिनापूरचा राजा होता. यमुना-गंगा प्रदेशात राहणारे सर्वजण, ही त्याची प्रजा होते.  पण शंतनूने आपल्या सत्तेच्या अधिकाराचा वापर,  ही मागणी घालताना केलेला दिसत नाही.  तसेच धीवराने  देखील आपल्या राजाच्या मागणी पुढे दबून जात त्याला होकारही  दिलेला नाही.  आणि त्याने अटी घातल्यावर कोणतीही बळजबरी न करता, शंतनू हिरमुसला होऊन हस्तिनापुरात परतला आहे. 

यानंतर तो सत्यवतीच्या विचारात  सतत  उदास राहू लागला.  त्याचे कशातच लक्ष लागेना.  मुख्य म्लान दिसू लागले.  त्याची ही अवस्था, त्याचा पुत्र देवव्रत त्याच्या लक्षात आली. त्याने शंतनुला त्याबद्दल छेडले असता वेगळ्याचा  शब्दात शंतनूने आपली व्यथा आपल्या पुत्रासमोर मांडली. तो देवव्रताला म्हणाला, तू माझा एकुलता एक पुत्र असून नित्य युद्ध कर्मात व्यस्त असतोस. जर तुला काही झाले तर मी निपुत्रिक होईल व आपला कुलक्षय होईल. तो टाळण्यासाठी मला पुन्हा विवाह करायचा आहे. यापुढे हे लग्न कोळ्याच्या मुलीशी करायचे आहे हे आपल्या मुलाला सांगणे त्याला कदाचित संयुक्तिक वाटले नसावे. वास्तविक पाहता देवव्रत येण्या आधीची छत्तीस  आणि नंतरची चार,  म्हणजे चाळीस वर्षे शंतनु निपुत्रिक असल्याप्रमाणे होता.  कुलक्षय टाळण्यासाठी तो युवराज देवव्रताचा विवाह करून राज्य त्याच्या हाती सोपवू शकला असता असे असताना देखील उतारवयात त्याला झालेल्या मदनबाणाने मती भ्रष्ट झाला हे मात्र खरे. 

भीष्म प्रतिज्ञा 

देवव्रताने त्याची व्यथा समजावून घेतली. या व्यथेचा निश्चित रोख जाणून घेण्यासाठी त्याने अमात्यांना गाठले.  त्यात त्याला धीवर प्रमुखाच्या अटींची कहाणी कळली.  आपल्या पित्यावरील  आत्यंतिक प्रेमाने देवव्रताने तात्काळ एक निर्णय घेतला व सोबत प्रतिष्ठित क्षत्रिय वीरांना घेऊन तो त्या धीवर प्रमुखाकडे गेला, आणि आपल्या पित्यासाठी त्याने सत्यवतीला  मागणी घातली.  

इथेही चतुर धीवराने आपला संयम सोडलेला दिसत नाही. त्याने सत्यवतीशी देवव्रताने विवाह करावा असेही सुचविल्याचे दिसत नाही कारण कदाचित ती देखील वयाने देवव्रतापेक्षा पोक्त असावी (व काही वर्षांपूर्वी तिच्या पोटी व्यासांचा ही जन्म झाला आहे, जे देवव्रतापेक्षा काही वर्षांनी लहान असावेत).  त्याने पुन्हा एकदा आपली अट देवव्रताला सांगितली.  तो विचार करूनच देवव्रत इथे आला होता व म्हणूनच तात्काळ त्याने आपण राज्यावरचा हक्क सोडत आहोत व सत्यवतीचाच  पुत्र हस्तिनापूरचा राजा होईल असे वचन तिच्या पित्याला दिले.  

भीष्म प्रतिज्ञा (चित्रकार - राजा रवी वर्मा)
या वचनाने जरी तो धीवर खुश झाला तरी त्याने अजून एका संभाव्य धोक्याची जाणीव देवव्रताला करून दिली.  ती म्हणजे,  तू म्हणतोस ते ठीक पण उद्या तुझ्या पुत्रांना राज्य लोभ उत्पन्न झाला व त्यांनी देखील राज्यावर हक्क सांगितला तर?  हे ऐकून देखील देवव्रत जरादेखील विचलित झाला नाही.  व तत्क्षणी त्याने आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याची अजून एक प्रतिज्ञा केली.  आपल्या या प्रतिज्ञेमुळे आपण जरी निपुत्रिक राहिलो तरी आपल्याला स्वर्गप्राप्ती होईल, हा विश्वास देखील त्यांने व्यक्त केला.  त्याची ही प्रतिज्ञा ऐकून सोबत आलेले प्रतिष्ठित क्षत्रिय वीर अवाक झाले.  आणि हा तर भीष्मच आहे अशा शब्दात सर्वांनी त्याचा गौरव केला.  


अशा रीतीने आपल्या इंद्रियांवर विजय मिळवण्याच्या या जितेंद्रिय प्रतिज्ञेमुळे देवव्रत पुढे भीष्म म्हणून ओळखला जाऊ लागला.  त्याच्या या प्रेमामुळे शंतनूने देखील त्याला तू इच्छामरणी होशील असा वर दिला. 

असे घडले असेल का ?

यातील देवव्रताचे  शंतनू वरील निरातिशय प्रेम पाहता,  भैरप्पांनी आपल्या पर्व या कादंबरीतून एक वेगळा विचार आपल्यासमोर मांडला आहे.  तो म्हणजे पहिल्या सात बाळंतपणासाठी गंगाच माहेरी निघून जायची व आपल्या मातृसत्ताक  कुटुंबात पुत्रांना ठेवून परतायची.  पण आठव्या वेळी मात्र शंतनूने तिला माहेरी जाण्यापासून प्रतिबंध केला. म्हणूनच पुत्रजन्म होतात लहानग्या देवव्रताला  शंतनूच्या हाती सोपवून,  आपल्या अटींप्रमाणे ती स्वगृही आपल्या आधीच्या ७ पुत्रांकडे  निघून गेली.  शंतनूने नंतर देवव्रताला सर्व प्रकारचा विद्याभ्यास देऊन घडविले असावे.  पित्याचा हा त्याग पाहून देवव्रताने  देखील आपल्या पित्यासाठी भीष्मप्रतिज्ञेद्वारे एक मोठा आयुष्यभराचा त्याग करायचा निर्णय घेतला. 

अर्थातच हा विचार स्वतः महाभारतकार कुठेच ध्वनित देखील करीत नाहीत.  पण एक गोष्ट आपल्याला महाभारतातून निश्चितपणे कळते ती मात्र अशी की,  शंतनूने जे दोन्ही विवाह केले ते नदी प्रदेशातील  वन कन्या, धीवरकन्या इत्यादी क्षत्रिय नसलेल्या जमातीतील मुलींशी केले व ते देखील दोन्ही वेळी त्यांनी घातलेल्या अटी मान्य करीत केले.  या दोन्ही कन्यांची कदाचित हीन असलेली कुळे उंचावण्यासाठी व त्या राजाला आणि राज्याला अनुरूप आहेत,  ते तत्कालीन जनमानसावर ठसविण्यासाठी त्यांच्या जन्माभोवती अद्भुततेचे  वलय निर्माण केले,  जे आपण या आधीच्या कथा भागात पाहिले आहेच. 

Wednesday, April 21, 2021

महाभारतकार व्यासांची जन्मकथा

महाभारत कथेची सुरुवात जरी व्यासांच्या जन्माच्या आधी होत असली तरी या कथेत स्वतः व्यास वारंवार भूमिका निभावत असल्याने, महाभारताच्या मुख्य कथानकाला सुरुवात करण्यापूर्वी व्यासांची जन्मकथा जाणून घेणे आवश्यक आहे. महाभारतात असलेले सर्व नाट्य थोड्याफार प्रमाणात व्यास जन्माच्या कथेत देखील आहेच.

महर्षी व्यास हे पराशर मुनी व धीवर कन्या सत्यवती यांचे पुत्र.  त्यांच्या या मात्यापित्यांची कहाणी देखील असंख्य चमत्कारांनी रंगवलेली आणि बरीचशी उत्तरकालीन भर आहे, असे वाटायला लावणारी आहे.  महाभारताच्या पहील्याच म्हणजे आदिपर्वाच्या अध्याय १७६ मध्ये पराशर ऋषींची जन्मकथा येथे ही थोडक्यात अशी..... 

पराशर ऋषींची जन्मकथा

शक्ती ऋषी व कल्माषपाद राजा अरुंद वाटेवर
पूर्वी इश्वाकु वंशातील (रामाचा वंश) कल्माषपाद नावाचा राजा होऊन गेला. एकदा शिकारी करता, हा राजा वनात गेला असताना, एका अरुंद वाटेवर समोरून ज्येष्ठ वशिष्ठ पुत्र शक्‍ती येत होता.  ब्राह्मणाला प्रथम वाट द्यायची हा तत्कालीन संकेत पण राजा वाट द्यायला तयार होईना आणि शक्ती ऋषी देखील वाट सोडेना.  तेव्हा कल्माषपाद राजाने त्याला चाबकाने फोडून काढले आणि त्यामुळे संतापून शक्ती ऋषीने त्याला तू मनुष्य भक्षक राक्षस होशील असा शाप दिला.  त्याबरोबर त्या राजाने शक्तीलाच प्रथम भक्ष केले व त्यानंतर उरलेल्या वशिष्ठ पुत्रांना.  हे कळताच ऋषी वशिष्ठ अतिशय दुःखी झाले व त्यांनी आत्मघाताचे अनेक प्रयत्न केले पण ते सर्व अयशस्वी ठरले.  या सर्व प्रकारात शक्तीची पत्नी अदृश्यन्ती त्यांची पाठराखण करत होती.  व तिच्या गर्भातून येणारा, वेदाध्ययन करणारा एक स्वर वरिष्ठांच्या कानावर पडला तेव्हा वसिष्ठांनी कुतूहलाने अदृश्यन्तीकडे चौकशी केली यावेळी तिने त्यांचा नातू तिच्या उदरात वाढत असल्याचे वसिष्ठांना सांगितले हे कळताच त्यांचे नैराश्य पळाले.  यथावकाश अदृश्यन्तीला जो पुत्र झाला त्याचे नाव वसिष्ठांनी पराशर असे ठेवले. 

सत्यवतीची जन्मकथा 

उपरिचर वसु नावाचा एक राजा होता.  इंद्राच्या इच्छेप्रमाणे त्याने चेदी राज्य जिंकले त्यामुळे इंद्राने त्याची स्तुती करत त्याला सज्जनांचा प्रतिपाळ करण्यासाठी कळकाची काठी दिली.  नवीन संवत्सराचा सुरुवातीला या राजाने ती  काठी जमिनीत रोवून त्यावर शेला व पुष्पमाला बांधून त्याची पूजा केली. तद्नंतर प्रत्येक संवत्सराच्या (वर्षाच्या) सुरुवातीला ही प्रथाच झाली आजही नववर्षाच्या सुरुवातीला असे गुढी पूजन केले जाते. 

या उपरिचर वसुला गिरीका नावाची पत्नी होती.  ती ऋतुमती होण्याच्या काळातच राजाला राजवाड्यातील वयोवृद्धांना मांसान्न हवे म्हणून शिकारीसाठी वनात जावे लागले. वनातच गिरीकेच्या आठवणीने राजाचे  वीर्यस्स्खलन झाले.  ते वाया जाऊ नये म्हणून राजाने ते एका द्रोणात धरले व ते गिरिके पर्यंत पोहोचण्यासाठी एका श्येन पक्षाला दिले.  हा पक्षी यमुने वरून जात असता त्याच्या चोचीत काहीतरी पाहून दुसऱ्या एका श्येन पक्षाने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्याशी झालेल्या झटापटीत तो द्रोण यमुनेच्या पाण्यात पडला.  त्या यमुनेच्या पाण्यात अद्रिका नावाची अप्सरा शापामुळे मासा झाली होती.  तिने ते वीर्य गिळले व त्यातून तिला गर्भ राहिला.  पुढे ती प्रसूत झाल्यावर तिला एक मानवी जुळे झाले.  ही जुळी मुले कोळ्यांनी राजा उपरिचर वसु कडे नेली. पैकी जो मुलगा होता तो राजाने ठेवून घेतला तर मुलगी राजाने त्या धीवराला दिली व स्वतःच्या मुलीसारखा प्रतिपाळ करण्यास सांगितले तीच मुलगी म्हणजे सत्यवती. या दोन मानवी मुलांना जन्म देऊन अप्सरा आद्रिका शापमुक्त झाली.

पराशर व सत्यवती यांच्या जन्मकथेचा मतितार्थ

या दोन्ही कथा पाहता आपल्या असे लक्षात येते की हा सर्व खटाटोप व्यासांच्या माता-पित्यांना व पर्यायाने व्यासांना उच्चकुलीन ठरवण्यासाठी उत्तरकाळात केला गेला असावा.  यात पराशरांचे वडील  शक्ती ऋषी कल्माषपाद  राजा पेक्षा श्रेष्ठ व वशिष्ठ कुळातील असे सांगितले गेले,  तर धीवर कन्या मत्स्यगंधा प्रत्यक्षात एका अप्सरेच्या पोटी जन्माला आलेली क्षत्रिय राजकन्या असे दाखवण्याचा प्रयत्न आहे.  कदाचित प्रत्यक्षात राजा उपरिचर वसु, अद्रिका या एखाद्या यमुना काठच्या धीवर कन्येबरोबर रत  झाला असावा व त्यातून मत्स्यगंधा सत्यवतीचा जन्म झाला असावा.

व्यासमहर्षींचा जन्म 

पराशर मुनी व सत्यवती
तर असे हे पराशर मुनी यमुनेच्या किनाऱ्यावर नाव चालवणाऱ्या या सत्यवती नामक धीवर कन्येवर आसक्त  झाले व त्यांनी तिला नावेतच समागमाची विनंती केली.  त्यावेळी ऋषींना नाही कसे म्हणायचे?  मग तिने त्यांना, दोन्ही किनाऱ्यांवर ऋषी उभे आहेत,  असे दाखवले.  तेव्हा त्यांनी आपल्या तपोबलाने नावेभोवती धुके निर्माण केले.  त्यावर सत्यवतीने माझे कौमार्य नष्ट होईल असे सांगताच, ऋषींनी तिला ती कुमारीच  राहील असा आशिर्वाद दिला व एखादा वर मागण्यास सांगितले.  तेव्हा माझ्या सर्वांगाचा माशांचा वास जावून छान सुगंध येऊ देत असा वर तिने मागितला.  ऋषींनी तिची ही इच्छा देखील पूर्ण केली व तिचे नाव गंधवती अथवा योजनगंधा असे देखील पडले.  त्यानंतर पराशर ऋषींनी तिच्याबरोबर समागम केला व ती गर्भवती झाली. 

कालांतराने यमुनेतील  एका द्वीपावर (बेटावर) ती प्रसूत झाली.  रंगाने कृष्णवर्ण असलेल्या व द्वीपावर जन्मलेल्या मुलाला सर्वजण कृष्णद्वैपायन म्हणून ओळखू लागले.  पुढे या ज्ञानी पुत्राने शाखा भेदाला अनुसरून वेदांचा विस्तार केला म्हणून त्यांना व्यास हे नाव प्राप्त झाले. 

या कथेतील वरदान नक्की काय ?

या कथेतून आपल्याला असे लक्षात येते की तपोबलापेक्षा आसक्ती,  ती देखील क्षणिक कामासक्ती प्रबळ ठरते व पराशरांसारखे ऋषी देखील त्याला सहज भुलतात.  सत्यवतीला त्यांनी दिलेल्या कौमार्य भंग न होण्याचा वर म्हणजे द्विपावरील तिच्या वास्तव्याने तिची प्रसूती कुणाच्याच लक्षात येणार नाही व मी या पुत्राला लगेच घेऊन जाईन असे वचन जे त्यांनी सत्यवतील दिले व ते पाळले देखील. सत्यवती पुन्हा तिचे आयुष्य तिच्या परीने जगायला मोकळी झाली, असाच याचा अर्थ.  बरे, या प्रसूतिकालाच्या महिन्यांमध्ये माशांपासून दूर एका बेटावर राहिल्याने तिला माशांचा गंध पण येणार नाही,  हे वराचे  आणखी एक स्वरूप. 

पुढील महाभारत 

यमुनेच्या काठावर हे सर्व घडत असतानाच तिकडे दूर हस्तिनापुरात मात्र काही वेगळ्याच घटना घडून गेल्या होत्या आणि या घटनांचा व हस्तिनापुरातील त्या घटनांचा एकमेकात मिलाफ होत पुढे महाभारत घडणार होतं. काय होत्या त्या घटना ? ते आपण पुढील लेखापासून पाहू.