महाभारतातील अतर्क्य व चमत्कृतीपूर्ण घटनांचे मानवीय विश्लेषण

Friday, April 02, 2021

जनमेजयाचे सर्पसत्र कि नाग वंशियांचे हत्याकांड ?

जनमेजयाचे सर्पसत्र - राजा रविवर्मा - इंटरनेट वरून साभार
महाभारत कथेत पडलेली भर अभ्यासायची असेल तर सुरुवातीपासूनच ते चिकित्सकपणे अभ्यासायला हवे. त्यातील रूपके , उपकथानके यांची त्यात भर पडत गेली, हे आपल्याला थोड्याश्या चिकित्सक नजरेने पाहताच लक्षात येते.   यासाठी आपण महाभारताच्या सुरुवातीचे कथानक पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल कि या सर्पसत्रात सांगितले गेलेले महाभारताचे कथानक हा कदाचित असाच विध्वंस पुन्हा टाळण्यासाठी केलेला उपदेश असावा . कसे , ते आपण आता पाहू . 

महाभारताची सुरुवात होते ती राजा जनमेजयाच्या सर्प सत्राच्या कथेपासून. येथे व्यासांच्या उपस्थितीत (यासाठी व्यासांचे वय १५० वर्षांपेक्षा जास्त असायला हवे) व्यासशिष्य वैशंपायनाने महाभारत श्रोत्यांना ऐकविले. या सर्पसत्राचे कारण होते राजा परिक्षिताचा सर्पदंशाने झालेला मृत्यू.

राजा परीक्षित शमीक ऋषींवर सर्प टाकताना (इंटरनेट वरून साभार)
महाभारतीय कथेनुसार , युधिष्ठिरानंतर राज्यावर आलेला अभिमन्यूपुत्र परिक्षित बरीच वर्षे (त्याच्या वयाच्या ६० वर्षांपर्यंत?) रा
ज्य करतो. एकदा तो वनात शिकारीला गेलेला असताना एका मृगाला बाण मारतो. जखमी अवस्थेत तो मृग जंगलात निसटतो व त्याचा पाठलाग करीत परीक्षित दाट जंगलात  शिरतो. अरण्यात पुढे गेल्यावर त्याला एक ऋषी ध्यानस्थ असलेले दिसतात. त्यांना (शमीक ऋषींना) भूक व तहानेने व्याकुळ झालेला राजा, तो मृग कोणत्या दिशेनं गेला ते विचारतो पण त्यांचे मौनव्रत असल्याने त्याला काहीच उत्तर मिळत नाही. म्हणून राजा परिक्षित चिडून शेजारी मरून पडलेला एक सर्प बाणाच्या टोकाने उचलून ऋषींच्या अंगावर टाकतो व निघून जातो. शमीक ऋषींना त्याचे काहीच वाटत नाही पण त्यांचा पुत्र शृंगी याला ती बातमी कळल्यावर तो संतापाच्या भारत राजा परिक्षिताला, तू ७ दिवसात सर्पदंशाने मृत्यू पावशील, असा शाप देतो. 

शृंगी जेव्हा आपण दिलेल्या शापाबद्दल आपल्या पित्याला, शमीक ऋषींना, सांगतो तेव्हा ते राजा परीक्षिताचे गुणगान करतात. असा शाप अनाठायी दिल्याबद्दल ते शृंगीला बोल लावतात व आपला एक शिष्य गौरमुख याला हि बातमी कळविण्यासाठी राजा परीक्षिताकडे पाठवितात. 

उंच मनोऱ्यावर परीक्षित - मुघलकालीन चित्र (इंटरनेटवरून साभार)
राजा परीक्षित या बातमीने हादरून जातो व आपला मृत्यू टाळण्यासाठी स्वतःला एका मनोऱ्यात बंदिस्त करून घेतो. शेवटच्या, सातव्या दिवशी, आता कुणी येत नाही या विचाराने तो निर्धास्त झालेला असताना, तक्षक एका सफरचंदातील अळीद्वारे राजमहालात प्रवेश करतो आणि राजाला दंश करतो.. 

परीक्षिताच्या मृत्यूनंतर अल्पवयीन जनमेजय राजा बनतो. यथावकाश काशीराज सुवर्णवर्मा याची कन्या वपुष्टमा हिच्याशी त्याचा विवाह होतो व तो सुखाने राज्यकारभार करू लागतो. 

त्यानंतर काही वर्षांनी राजा जनमेजय आपल्या पित्याच्या मृत्यूबद्दल आपल्या अमात्यांकडे चौकशी करतो आणि त्याला सर्व घटनाक्रम कळतो. तक्षकाच्या दंशाने आपल्या पित्याचा मृत्यू झाला हे कळताच संतापाने तो सर्व सर्प जातीलाच नष्ट करायचे ठरवतो व त्यासाठी सर्पसत्र आयोजित करतो. या सर्पसत्रात बरेच सर्प मृत्युमुखी पडतात व शेवटी तक्षकाची पाळी येते तेव्हा तक्षक इंद्राच्या पाठी लपतो. यावर “इंद्राय स्वाहा , तक्षकाय स्वाहा “ अशी दोघांचीही आहुती देण्याच्या क्षणी,  जरत्कारु नावाच्या ऋषींचा, जरत्कारु नावाच्याच पत्नीपासून  (हि वासुकी नागाची भगिनी म्हणजेच नाग कुळातील स्त्री) झालेला पुत्र, आस्तिक, जनमेजय राजाला प्रसन्न करून हे सर्पसत्र थांबविण्याचा वर मागून घेतो आणि तक्षकाचा नाश थांबवितो.

सर्प सत्राचा अर्थ 
लौकिक पातळीवर या साऱ्या घटनेचा अर्थ आपल्याला कसा लावता येईल ते आपण पाहू. या कथेत आपल्याला दिसते ते सुमारे ४ पिढ्या चालत आलेले पांडव-नाग कुळांचे वैर, ज्याची सुरुवात होते, कृष्णार्जुनांच्या खांडववन दहनापासून. या दहनात अनेक नाग कुळे नष्ट झाली पण तक्षक नाग (हे तेथील नाग कुल प्रमुखाचे नाव असावे ) मात्र त्यावेळी खांडव वनात नसल्याने बचावला व नाग कुळाचे पांडवांशी वैर जडले. 

परीक्षित शिकारीसाठी रानात गेल्यावर त्याने मृग नव्हे तर, या नागकुळातील कुणाचा तरी रानात पाठलाग केला असेल अथवा  हत्या केली असेल. त्यामुळेच त्या कुलप्रमुखाने परीक्षिताचीच हत्या करायची प्रतिज्ञा (हा शृंगी ऋषींचा शाप म्हणून दर्शवला गेला) केली व ती अमलात आणण्यासाठी विषारी सफरचंद अथवा प्रत्यक्ष विषारी सर्पाचा उपयोग केला असावा. परीक्षिताचा मृत्यू हि हत्याच आहे व ती नाग वंशियांनी घडवून आणली  हे काही वर्षांनंतर मोठा झालेल्या व राज्यशकट हाकणाऱ्या जनमेजयाला समजले व म्हणूनच त्याने नाग जमातीला समूळ नष्ट करायचे ठरविले व त्यांच्या विरुद्ध मोहीम उघडली. यात त्याने बऱ्याच नाग कुळांचा निर्वंश करण्याचा सपाटा लावला. यात वासुकी, ऐरावत, कौरव्य, तक्षक, धृतराष्ट्र  अशा विविध नाग कुळातील असंख्य नाग मृत्युमुखी पडले. याला घाबरून तक्षक नाग उत्तरेकडे पळाला व तो इंद्राच्या आश्रयासाठी देवलोकी गेला. हा देवलोकाचा भाग हिमालयाच्या पलीकडे किंवा काश्मीरच्या उत्तरेकडे असावा, व म्हणूनच राजा जनमेजयदेखील त्याच्या पाठी उत्तरेकडे म्हणजे तक्षशिला जवळच्या प्रांतात तळ देऊन होता. यावेळी या महाभारत कथा सांगणाऱ्या वैशंपायन यांचा उद्देश, या वैराची परिणती महाभारतीय युद्धासारखे युद्ध पुन्हा घडून येऊ नये, हा असावा. अशा प्रकारच्या युद्धाने अपरिमित हानी होऊ शकते आणि हेच याच्या ३ पिढ्या आधी घडून आलेले आहे हे जनमेजयाला अवगत करून दिले आणि आस्तिकाने देखील जनमेजयाला प्रसन्न करत हा नागसंहार थांबवला. 

कोणत्याही यज्ञात अशा प्रकारे विविध ठिकाणाहून सर्प येऊन पडणे शक्य नाही व नाग जमातीचा मात्र प्रचंड प्रमाणात संहार राजा जनमेजयाने घडवून आणला हे स्पष्ट करण्यासाठी रचलेल्या कथांमध्ये, महाभारतातील या घटनांचे वर्णन करताना त्यात नंतर अनेक रूपक कथा / उपकथा यात जोडल्या गेल्या. एका पिढीजात वैराला चमत्कारांचे व वर-शाप कथांचे स्वरूप देऊन या साऱ्यांचे एक वेगळेच स्वरूप आपल्या समोर उभे केले गेले. हस्ते परहस्ते पुढील पिढीकडे मौखिक स्वरूपात जाणाऱ्या महाभारताचा प्रचंड विस्तार आपण या पातळीवर हळू हळू उलगडू शकतो. 


1 comment:

  1. अभिनंदन महेश! इतक्या सोप्या शब्दात हा विषय मांडल्या बददल ! आगामी संशोधनासाठी खुप शुभेच्छा!!

    ReplyDelete