महाभारतातील अतर्क्य व चमत्कृतीपूर्ण घटनांचे मानवीय विश्लेषण

Wednesday, April 21, 2021

महाभारतकार व्यासांची जन्मकथा

महाभारत कथेची सुरुवात जरी व्यासांच्या जन्माच्या आधी होत असली तरी या कथेत स्वतः व्यास वारंवार भूमिका निभावत असल्याने, महाभारताच्या मुख्य कथानकाला सुरुवात करण्यापूर्वी व्यासांची जन्मकथा जाणून घेणे आवश्यक आहे. महाभारतात असलेले सर्व नाट्य थोड्याफार प्रमाणात व्यास जन्माच्या कथेत देखील आहेच.

महर्षी व्यास हे पराशर मुनी व धीवर कन्या सत्यवती यांचे पुत्र.  त्यांच्या या मात्यापित्यांची कहाणी देखील असंख्य चमत्कारांनी रंगवलेली आणि बरीचशी उत्तरकालीन भर आहे, असे वाटायला लावणारी आहे.  महाभारताच्या पहील्याच म्हणजे आदिपर्वाच्या अध्याय १७६ मध्ये पराशर ऋषींची जन्मकथा येथे ही थोडक्यात अशी..... 

पराशर ऋषींची जन्मकथा

शक्ती ऋषी व कल्माषपाद राजा अरुंद वाटेवर
पूर्वी इश्वाकु वंशातील (रामाचा वंश) कल्माषपाद नावाचा राजा होऊन गेला. एकदा शिकारी करता, हा राजा वनात गेला असताना, एका अरुंद वाटेवर समोरून ज्येष्ठ वशिष्ठ पुत्र शक्‍ती येत होता.  ब्राह्मणाला प्रथम वाट द्यायची हा तत्कालीन संकेत पण राजा वाट द्यायला तयार होईना आणि शक्ती ऋषी देखील वाट सोडेना.  तेव्हा कल्माषपाद राजाने त्याला चाबकाने फोडून काढले आणि त्यामुळे संतापून शक्ती ऋषीने त्याला तू मनुष्य भक्षक राक्षस होशील असा शाप दिला.  त्याबरोबर त्या राजाने शक्तीलाच प्रथम भक्ष केले व त्यानंतर उरलेल्या वशिष्ठ पुत्रांना.  हे कळताच ऋषी वशिष्ठ अतिशय दुःखी झाले व त्यांनी आत्मघाताचे अनेक प्रयत्न केले पण ते सर्व अयशस्वी ठरले.  या सर्व प्रकारात शक्तीची पत्नी अदृश्यन्ती त्यांची पाठराखण करत होती.  व तिच्या गर्भातून येणारा, वेदाध्ययन करणारा एक स्वर वरिष्ठांच्या कानावर पडला तेव्हा वसिष्ठांनी कुतूहलाने अदृश्यन्तीकडे चौकशी केली यावेळी तिने त्यांचा नातू तिच्या उदरात वाढत असल्याचे वसिष्ठांना सांगितले हे कळताच त्यांचे नैराश्य पळाले.  यथावकाश अदृश्यन्तीला जो पुत्र झाला त्याचे नाव वसिष्ठांनी पराशर असे ठेवले. 

सत्यवतीची जन्मकथा 

उपरिचर वसु नावाचा एक राजा होता.  इंद्राच्या इच्छेप्रमाणे त्याने चेदी राज्य जिंकले त्यामुळे इंद्राने त्याची स्तुती करत त्याला सज्जनांचा प्रतिपाळ करण्यासाठी कळकाची काठी दिली.  नवीन संवत्सराचा सुरुवातीला या राजाने ती  काठी जमिनीत रोवून त्यावर शेला व पुष्पमाला बांधून त्याची पूजा केली. तद्नंतर प्रत्येक संवत्सराच्या (वर्षाच्या) सुरुवातीला ही प्रथाच झाली आजही नववर्षाच्या सुरुवातीला असे गुढी पूजन केले जाते

या उपरिचर वसुला गिरीका नावाची पत्नी होती.  ती ऋतुमती होण्याच्या काळातच राजाला राजवाड्यातील वयोवृद्धांना मांसान्न हवे म्हणून शिकारीसाठी वनात जावे लागले. वनातच गिरीकेच्या आठवणीने राजाचे  वीर्यस्स्खलन झाले.  ते वाया जाऊ नये म्हणून राजाने ते एका द्रोणात धरले व ते गिरिके पर्यंत पोहोचण्यासाठी एका श्येन पक्षाला दिले.  हा पक्षी यमुने वरून जात असता त्याच्या चोचीत काहीतरी पाहून दुसऱ्या एका श्येन पक्षाने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्याशी झालेल्या झटापटीत तो द्रोण यमुनेच्या पाण्यात पडला.  त्या यमुनेच्या पाण्यात अद्रिका नावाची अप्सरा शापामुळे मासा झाली होती.  तिने ते वीर्य गिळले व त्यातून तिला गर्भ राहिला.  पुढे ती प्रसूत झाल्यावर तिला एक मानवी जुळे झाले.  ही जुळी मुले कोळ्यांनी राजा उपरिचर वसु कडे नेली. पैकी जो मुलगा होता तो राजाने ठेवून घेतला तर मुलगी राजाने त्या धीवराला दिली व स्वतःच्या मुलीसारखा प्रतिपाळ करण्यास सांगितले तीच मुलगी म्हणजे सत्यवती. या दोन मानवी मुलांना जन्म देऊन अप्सरा आद्रिका शापमुक्त झाली.

पराशर व सत्यवती यांच्या जन्मकथेचा मतितार्थ

या दोन्ही कथा पाहता आपल्या असे लक्षात येते की हा सर्व खटाटोप व्यासांच्या माता-पित्यांना व पर्यायाने व्यासांना उच्चकुलीन ठरवण्यासाठी उत्तरकाळात केला गेला असावा.  यात पराशरांचे वडील  शक्ती ऋषी कल्माषपाद  राजा पेक्षा श्रेष्ठ व वशिष्ठ कुळातील असे सांगितले गेले,  तर धीवर कन्या मत्स्यगंधा प्रत्यक्षात एका अप्सरेच्या पोटी जन्माला आलेली क्षत्रिय राजकन्या असे दाखवण्याचा प्रयत्न आहे.  कदाचित प्रत्यक्षात राजा उपरिचर वसु, अद्रिका या एखाद्या यमुना काठच्या धीवर कन्येबरोबर रत  झाला असावा व त्यातून मत्स्यगंधा सत्यवतीचा जन्म झाला असावा.

व्यासमहर्षींचा जन्म 

पराशर मुनी व सत्यवती
तर असे हे पराशर मुनी यमुनेच्या किनाऱ्यावर नाव चालवणाऱ्या या सत्यवती नामक धीवर कन्येवर आसक्त  झाले व त्यांनी तिला नावेतच समागमाची विनंती केली.  त्यावेळी ऋषींना नाही कसे म्हणायचे?  मग तिने त्यांना, दोन्ही किनाऱ्यांवर ऋषी उभे आहेत,  असे दाखवले.  तेव्हा त्यांनी आपल्या तपोबलाने नावेभोवती धुके निर्माण केले.  त्यावर सत्यवतीने माझे कौमार्य नष्ट होईल असे सांगताच, ऋषींनी तिला ती कुमारीच  राहील असा आशिर्वाद दिला व एखादा वर मागण्यास सांगितले.  तेव्हा माझ्या सर्वांगाचा माशांचा वास जावून छान सुगंध येऊ देत असा वर तिने मागितला.  ऋषींनी तिची ही इच्छा देखील पूर्ण केली व तिचे नाव गंधवती अथवा योजनगंधा असे देखील पडले.  त्यानंतर पराशर ऋषींनी तिच्याबरोबर समागम केला व ती गर्भवती झाली. 

कालांतराने यमुनेतील  एका द्वीपावर (बेटावर) ती प्रसूत झाली.  रंगाने कृष्णवर्ण असलेल्या व द्वीपावर जन्मलेल्या मुलाला सर्वजण कृष्णद्वैपायन म्हणून ओळखू लागले.  पुढे या ज्ञानी पुत्राने शाखा भेदाला अनुसरून वेदांचा विस्तार केला म्हणून त्यांना व्यास हे नाव प्राप्त झाले. 

या कथेतील वरदान नक्की काय ?

या कथेतून आपल्याला असे लक्षात येते की तपोबलापेक्षा आसक्ती,  ती देखील क्षणिक कामासक्ती प्रबळ ठरते व पराशरांसारखे ऋषी देखील त्याला सहज भुलतात.  सत्यवतीला त्यांनी दिलेल्या कौमार्य भंग न होण्याचा वर म्हणजे द्विपावरील तिच्या वास्तव्याने तिची प्रसूती कुणाच्याच लक्षात येणार नाही व मी या पुत्राला लगेच घेऊन जाईन असे वचन जे त्यांनी सत्यवतील दिले व ते पाळले देखील. सत्यवती पुन्हा तिचे आयुष्य तिच्या परीने जगायला मोकळी झाली, असाच याचा अर्थ.  बरे, या प्रसूतिकालाच्या महिन्यांमध्ये माशांपासून दूर एका बेटावर राहिल्याने तिला माशांचा गंध पण येणार नाही,  हे वराचे  आणखी एक स्वरूप. 

पुढील महाभारत 

यमुनेच्या काठावर हे सर्व घडत असतानाच तिकडे दूर हस्तिनापुरात मात्र काही वेगळ्याच घटना घडून गेल्या होत्या आणि या घटनांचा व हस्तिनापुरातील त्या घटनांचा एकमेकात मिलाफ होत पुढे महाभारत घडणार होतं. काय होत्या त्या घटना ? ते आपण पुढील लेखापासून पाहू.

लेखासोबतची छायाचित्रे - मायाजालावरून ... मात्र मूळ स्रोत माहीत नाही 
संदर्भ - आदिपर्व अध्याय ६३, १७६,१७७,१७८




No comments:

Post a Comment