महाभारतातील अतर्क्य व चमत्कृतीपूर्ण घटनांचे मानवीय विश्लेषण

Sunday, May 02, 2021

व्यासजन्मापूर्वी हस्तिनापुरात....महाभारताची सुरुवात

 

महाभारताची सुरुवात हस्तिनापूरचा राजा शंतनू याच्यापासून होते.  आपण एक पिढी मागे गेलो तर आपल्याला असे आढळते की,  शंतनू हा राजा प्रतिप व शिबी कन्या राणी सुनंदा यांचा पुत्र. प्रतिपाला  एकूण तीन पुत्र होते देवापी, बाल्हिक व शंतनू.  यातील देवापि हा  थोरला पुत्र धर्मपरायण व प्रजाहितदक्ष असूनही, त्याला त्वचारोग असल्याने या “हिनांग भूपतीला” राज्याभिषेक करण्यास प्रजेने व ब्राह्मणांनी नकार दिला. या  घटनेने राजा प्रतीप व्यथित झाला. बाल्हिकाने आपल्या मातुलगृही  म्हणजे मामाकडे जाऊन तिथले राज्य सांभाळणे पसंत केले व प्रतिपाच्या मृत्युनंतर शंतनु राजा झाला.  या घटनेचे  भाष्य  आपल्याला पुढे उद्योग पर्वात आढळते ,  जेव्हा धृतराष्ट्र, दुर्योधनाला त्याचा राज्यावर अधिकार का नाही हे देवापीचे उदाहरण देऊन समजावतो,  कि जसे त्याला हिनांगतेमुळे  राज्य मिळाले नाही तसे अंधत्वामुळे मला मिळू शकले नाही व म्हणूनच हस्तिनापूरच्या राज्यावर पंडूचा जेष्ठ पुत्र युधिष्ठिर याचाच अधिकार आहे. . 

शंतनू देखील एक पराक्रमी व नीतिमान राजा होता व तत्कालीन क्षत्रियांप्रमाणेच त्याला देखील मृगयेचा छंद  होता.  अशाच एका प्रसंगी गंगाकिनारी मृगयेला गेला असता त्याची दृष्टी  गंगा नावाच्या सुंदर स्त्रीवर पडते व तो मोहित होतो. तो  तिला लग्नासाठी मागणी घालतो.  गंगा हि नदीकाठच्या प्रदेशातील एक चतुर तरुणी आहे. ती  त्याच्यापुढे काही अटी ठेवते त्या म्हणजे,  “मी जे काही करीन ते चांगले असो अथवा वाईट, तू मला अडविता कामा नये अथवा मला अप्रिय असे बोलताही कामा नये".  जर तू मला अडविलेस  अथवा बोल लावलास तर तत्क्षणी मी तुला सोडून जाईन. गंगेच्या सौंदर्याने मोहित झालेल्या शंतनू तात्काळ मागचा पुढचा विचार न करता या अटी मान्य करतो  आणि त्याने गंगा त्याच्याशी विवाहबद्ध होते . 

त्यांचे वैवाहिक आयुष्य अत्यंत सुखी आहे. गंगा यथावकाश पुत्रवती होते व पुत्र जन्म झाल्यावर लगेचच ती आपल्या नवजात पुत्राला गंगार्पण करते.  राजा शंतनू ते पाहतो, पण विवाहपूर्व अटींमुळे काहीच बोलत नाही.  या नंतरच्या त्यांच्या सहजीवनात देखील हे असे होतच राहते. त्यांना असे पाठोपाठ ७  पुत्र होतात व राणी गंगा ते गंगा नदीला अर्पण करत राहते.  राजा वरील गंगेच्या प्रेमाचा अंमल हळूहळू उतरू लागतो, आणि आठवा पुत्र झाल्यावर राणी गंगा जेव्हा त्याला गंगार्पण करू पाहते तेव्हा न राहून तो आपल्या पत्नीला अडवितो. तिला बोल लावतो. विचारतो अगे कैदाशीनी,  स्वतःच्या पुत्रांना मारून टाकणारी अशी तु आहेस तरी कोण? आणि तू हे पाप नक्की करतेस तरी का?

महाभिष व गंगा 

शंतनुचे ते उद्गार ऐकून गंगा त्याला स्वतःचा व शंतनूच्या पूर्वजन्माचा इतिहास त्याला सांगते. ती म्हणते, हे राजन, तू पूर्वजन्मीचा महाभिष राजा तर मी तर देवलोकीची जन्हूकन्या गंगा. स्वर्गप्राप्ती झालेला महाभिष राजा ब्रह्मदेवाच्या दरबारात उपस्थित असताना मी देखील तेथे पोहोचले.  त्यावेळी माझे वस्त्र वाऱ्याने उडाले आणि ते पाहून सर्व देवांनी माना खाली घातल्या. महाभिष मात्र माझ्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत राहिला, व त्यामुळे ब्रह्मदेवाने त्याला “तू पुन्हा मृत्युलोकी जन्म घेशील” असा शाप दिला.  ज्या गंगेने तुला भुरळ घातली तीच तुझी पत्नी होईल व गंगा तुझ्या  मनाविरुद्ध वागताच  तुला क्रोध येईल, व तुमची या शापातून मुक्तता होईल.  आता पृथ्वीलोकातील वास्तव्याच्या शापातून मी मुक्त  झाले आहे.  आता मी या आठव्या पुत्राला सोबत घेऊन जाते व त्याला सर्व विद्या पारंगत करून तुला परत आणून देइन. 

अष्टवसूंच्या शापाची कथा 

गंगा तिने जन्मताच मृत्युलोकातून मुक्त केलेल्या तिच्या सात पुत्रांचा वृत्तांत त्याला सांगते तो असा. अनेक मुनींचे वास्तव्य असणाऱ्या एका तपोवनामध्ये अष्टवसू सपत्नीक विहार करत असताना द्यू  नावाच्या एका वसूची पत्नी वसिष्ठांच्या नंदिनी या कामधेनूला पाहते व आपल्या पतीकडे, म्हणजे द्यू  कडे, ती कामधेनू आपल्याला मिळवून द्यावी, असा हट्ट धरते.  म्हणून द्यू आपल्या इतर सात भावांसह ती नंदिनी गाय पळवून आणतो.  वसिष्ठांना हे कळताच, ते त्या अष्टवसुना “तुम्हाला मनुष्य लोकात जन्म घ्यावा लागेल” असा शाप देतात. भयभीत व  पश्चात्तापदग्ध होऊन अष्टवसु वसिष्ठ ऋषींना शरण जातात.  वशिष्ठ त्यांना उ:शाप देत म्हणतात, एक वर्षाचा काळ लोटल्यावर तुमच्यापैकी सात जण मुक्त होतील, पण मुख्य अपराधी द्यू  मात्र दीर्घकाळ मृत्युलोकात वास्तव्य करेल.  हे वसू गंगेकडे येऊन गंगेने त्यांना जन्म द्यावा अशी विनंती करतात व गंगा देखील त्यांची विनंती मान्य करते. 

चिकित्सकांच्या दृष्टीतून 

महाभारत कथेच्या या प्रारंभीच्या घटनेकडे चिकित्सक दृष्टीने पाहताना आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. शंतनू गंगेकाठी मृगयेला जातो व एका तरुणीवर भाळतो आणि तिला मागणी घालतो. ती मुलगी प्रत्यक्ष नदी तर असू शकत नाही मग हे वैचित्र्य, शाप यांचा अंतर्भाव या कथेत कशासाठी? तर जिच्याबद्दल काहीच माहीत नाही, अशा एका मुलीला, म्हणजेच गंगेला, हस्तिनापूरच्या राजघराण्यात सामावून घेण्यासाठी. हि गंगा मग होती तरी कोण?गंगा नदीकिनारी राहणाऱ्या अशा   एखाद्या  गणातील/जमातीतील मुलगी, जिला शंतनू  बरोबर विवाह तिच्या अटींवर मान्य होता, पण आपली मुले तेथील राजवाड्यात, नगरात वाढवणं मान्य नव्हतं. कदाचित एखाद्या मातृसत्ताक पद्धतीतील जमातीतील अथवा अप्सरा, देव या उत्तरेकडील गणातील मुलगी जी आपल्या मुलांना जन्मल्यावर अल्पावधीतच आपल्या जमातीत परत करत होती (केवळ “क्षेत्रज-पुत्र” न्यायाने) अथवा त्यांना खरंच मारून टाकत होती (मातृसत्ताक पद्धतीत पुरुष अपत्य नको म्हणून). आणि या गोष्टीला विरोध होताच, आपल्या अटीप्रमाणे  पुन्हा आपल्या गणात / जमातीत परतली. या सर्वांना कथेला अद्भुत असे स्वरूप देण्यासाठी महाभिष राजाची, अष्टवसूंच्या शापाची कहाणी त्याभोवती रचली गेली

काही काळानंतर 

गंगा आपल्या आठव्या पुत्राला सोबत घेऊन जाते.  शंतनू पुन्हा एकटा होतो व हस्तिनापूरच्या राज्यकारभार करू लागतो. मध्ये काही वर्षे जातात (महाभारत आदिपर्व अध्याय १००, श्लोक २०, नुसार ३६ वर्षे). पुन्हा एकदा शंतनू गंगाकिनारी मृगया करत असता, एका ठिकाणी गंगेचे पाणी बाणांनी अडवलेले त्याला  दिसते.  त्याचा शोध घेतला असता, त्याला एक रूपसंपन्न कुमार दिसतो, ज्याने आपल्या शरवर्षावाने ते पाणी अडवून ठेवले होते.  राजाने पृच्छा करतात गंगा तिथे प्रकट होते.  ती  तो आपला पुत्र देवव्रत असल्याचे त्याला सांगते. देवव्रत आता विद्याभ्यास व शस्त्रविद्या पारंगत असल्याचे सांगत तिने तो पुत्र शंतनूच्या हवाली करते.  देवव्रताने वसिष्ठांकडून वेदांचे अध्ययन केले असून (त्या द्यू वसुला शाप देणारे वसिष्ठच) अस्त्र विद्येत तो देवराज इंद्राप्रमाणे पराक्रमी आहे,  शुक्राचार्य जी नीती जाणतात व परशुराम जी अस्त्रविद्या जाणतात त्यातही तो पारंगत आहे असे गंगा शंतनुला सांगते. 

वयाचे गणित 

शंतनूने गंगेवर मोहित होण्याचे वय महाभारताने दर्शविलेले नाही. अगदी ते २०च वर्षे होते असे मानले (व म्हणूनच या वयात तिच्या सर्व अटी शंतनूने मान्य केल्या) , तरी आठवा पुत्र देवव्रताचा जन्म होईस्तोवर ते २८ वर पोहोचेल. महाभारतानुसार ३६ वर्षांनी जर गंगा देवव्रताला परत करते तर त्यावेळी शंतनूचे हे वय २८+३६=६४ वर्षांवर पोहोचते. आणि मग ज्या वयात आपल्या पुत्राचे लग्न करून वानप्रस्थाश्रम स्वीकारायचा त्या वयात शंतनू पुन्हा एकदा लग्नगाठ बांधायला तयार होतो.  आपल्या पित्याची हि इच्छादेखील पूर्ण करणारा देवव्रत मात्र भीष्म होऊन महाभारताला जन्म देतो. ते कसे हे आपण पुढील लेखात पाहू ....

संदर्भ : 

(१) आदिपर्व अध्याय ९२/९४ , भांडारकर चिकित्सक आवृत्ती, (मूळ कथाभागाकरिता)  (२) महाभारताचा मूल्यवेध - डॉ रवींद्र शोभणे , (३) पर्व - एस एल भैरप्पा [(२) व (३) चिकित्सेकरिता ]

वापरलेली चित्रे - मायाजालावरून साभार 


 



No comments:

Post a Comment