महाभारतातील अतर्क्य व चमत्कृतीपूर्ण घटनांचे मानवीय विश्लेषण

Monday, May 17, 2021

जितेंद्रिय देवव्रत भीष्म (भीष्मप्रतिज्ञा)

गंगेने हाती सोपविलेल्या तेजस्वी कुमार देवव्रताला  घेऊन राजा शंतनू अतिशय आनंदाने हस्तिनापुरात परतला.  सर्वगुणसंपन्न राजकुमार देवव्रताला पाहून नगर जन देखील आनंदी झाले.  राजा शंतनू राज्यकारभारात पुन्हा व्यग्र झाला.  त्याने देवव्रताला युवराज्याभिषेक देखील केला.  अशा प्रकारे सुमारे चार वर्षे सुखात गेली.  यानंतर राज्यकारभार देवव्रतावर सोपवून राजा शंतनु पुन्हा मृगयेत रमू लागला. यावेळी यमुनेच्या तीरावर मृगयेला गेला असताना दूरवरून येणाऱ्या एका सुगंधाने तो धुंद झाला.  या सुगंधाच्या उगमस्थानाचा जेव्हा त्याने शोध घेतला तेव्हा एक लावण्यवती कन्या त्याच्या दृष्टीस पडली आणि राजा शंतनू तिच्याकडे आकृष्ट झाला.  त्याने तिची चौकशी केली
तेव्हा तिने त्याला आपले नाव सत्यवती असून आपण नदीकाठावरील धीवर (कोळी) प्रमुखाची कन्या असल्याचे व उदरनिर्वाहासाठी नौका चालवत असल्याचे तिने सांगितले.  तिच्यावर मोहित झालेल्या शंतनूने तिच्या पित्याला भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली व नंतर त्याला भेटून त्याने त्या धीवराकडे त्याच्या कन्येला सरळ मागणी घातली. 

शंतनूचे  त्या वेळचे वय लक्षात घेता ही मागणी शंतनूने खरं तर राजपुत्र देवव्रतासाठी घालायला हवी होती.  साठी पार केलेल्या शंतनूने आपल्या तरुण राजपुत्राच्या विवाहाचा विचार करायला हवा होता.  पण या वयात देखील शंतनूने असा विवेकी विचार केला नाही. त्याची ही स्थिती सत्यवतीच्या पित्याने  ओळखली व त्याने धूर्तपणे या संधीचा फायदा घ्यायचे ठरवले.  त्याने राजाला आपली अट सांगितली की,  तू माझ्या कन्येच्या  तुझ्यापासून होणाऱ्या  पुत्राला राज्याभिषेक करायला हवा.  देवव्रताला युवराज्याभिषेक करून चुकलेल्या राजा शंतनूला  अर्थातच हा होकार देववला नाही व खिन्न मनाने तो हस्तिनापूरला परतला. 
शंतनू व सत्यवती - (चित्रकार - राजा रवी वर्मा)

याच बरोबर अजून एक गोष्ट आपल्याला ध्यानात घ्यायला हवी ती म्हणजे शंतनू हस्तिनापूरचा राजा होता. यमुना-गंगा प्रदेशात राहणारे सर्वजण, ही त्याची प्रजा होते.  पण शंतनूने आपल्या सत्तेच्या अधिकाराचा वापर,  ही मागणी घालताना केलेला दिसत नाही.  तसेच धीवराने  देखील आपल्या राजाच्या मागणी पुढे दबून जात त्याला होकारही  दिलेला नाही.  आणि त्याने अटी घातल्यावर कोणतीही बळजबरी न करता, शंतनू हिरमुसला होऊन हस्तिनापुरात परतला आहे. 

यानंतर तो सत्यवतीच्या विचारात  सतत  उदास राहू लागला.  त्याचे कशातच लक्ष लागेना.  मुख्य म्लान दिसू लागले.  त्याची ही अवस्था, त्याचा पुत्र देवव्रत त्याच्या लक्षात आली. त्याने शंतनुला त्याबद्दल छेडले असता वेगळ्याचा  शब्दात शंतनूने आपली व्यथा आपल्या पुत्रासमोर मांडली. तो देवव्रताला म्हणाला, तू माझा एकुलता एक पुत्र असून नित्य युद्ध कर्मात व्यस्त असतोस. जर तुला काही झाले तर मी निपुत्रिक होईल व आपला कुलक्षय होईल. तो टाळण्यासाठी मला पुन्हा विवाह करायचा आहे. यापुढे हे लग्न कोळ्याच्या मुलीशी करायचे आहे हे आपल्या मुलाला सांगणे त्याला कदाचित संयुक्तिक वाटले नसावे. वास्तविक पाहता देवव्रत येण्या आधीची छत्तीस  आणि नंतरची चार,  म्हणजे चाळीस वर्षे शंतनु निपुत्रिक असल्याप्रमाणे होता.  कुलक्षय टाळण्यासाठी तो युवराज देवव्रताचा विवाह करून राज्य त्याच्या हाती सोपवू शकला असता असे असताना देखील उतारवयात त्याला झालेल्या मदनबाणाने मती भ्रष्ट झाला हे मात्र खरे. 

भीष्म प्रतिज्ञा 

देवव्रताने त्याची व्यथा समजावून घेतली. या व्यथेचा निश्चित रोख जाणून घेण्यासाठी त्याने अमात्यांना गाठले.  त्यात त्याला धीवर प्रमुखाच्या अटींची कहाणी कळली.  आपल्या पित्यावरील  आत्यंतिक प्रेमाने देवव्रताने तात्काळ एक निर्णय घेतला व सोबत प्रतिष्ठित क्षत्रिय वीरांना घेऊन तो त्या धीवर प्रमुखाकडे गेला, आणि आपल्या पित्यासाठी त्याने सत्यवतीला  मागणी घातली.  

इथेही चतुर धीवराने आपला संयम सोडलेला दिसत नाही. त्याने सत्यवतीशी देवव्रताने विवाह करावा असेही सुचविल्याचे दिसत नाही कारण कदाचित ती देखील वयाने देवव्रतापेक्षा पोक्त असावी (व काही वर्षांपूर्वी तिच्या पोटी व्यासांचा ही जन्म झाला आहे, जे देवव्रतापेक्षा काही वर्षांनी लहान असावेत).  त्याने पुन्हा एकदा आपली अट देवव्रताला सांगितली.  तो विचार करूनच देवव्रत इथे आला होता व म्हणूनच तात्काळ त्याने आपण राज्यावरचा हक्क सोडत आहोत व सत्यवतीचाच  पुत्र हस्तिनापूरचा राजा होईल असे वचन तिच्या पित्याला दिले.  

भीष्म प्रतिज्ञा (चित्रकार - राजा रवी वर्मा)
या वचनाने जरी तो धीवर खुश झाला तरी त्याने अजून एका संभाव्य धोक्याची जाणीव देवव्रताला करून दिली.  ती म्हणजे,  तू म्हणतोस ते ठीक पण उद्या तुझ्या पुत्रांना राज्य लोभ उत्पन्न झाला व त्यांनी देखील राज्यावर हक्क सांगितला तर?  हे ऐकून देखील देवव्रत जरादेखील विचलित झाला नाही.  व तत्क्षणी त्याने आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याची अजून एक प्रतिज्ञा केली.  आपल्या या प्रतिज्ञेमुळे आपण जरी निपुत्रिक राहिलो तरी आपल्याला स्वर्गप्राप्ती होईल, हा विश्वास देखील त्यांने व्यक्त केला.  त्याची ही प्रतिज्ञा ऐकून सोबत आलेले प्रतिष्ठित क्षत्रिय वीर अवाक झाले.  आणि हा तर भीष्मच आहे अशा शब्दात सर्वांनी त्याचा गौरव केला.  


अशा रीतीने आपल्या इंद्रियांवर विजय मिळवण्याच्या या जितेंद्रिय प्रतिज्ञेमुळे देवव्रत पुढे भीष्म म्हणून ओळखला जाऊ लागला.  त्याच्या या प्रेमामुळे शंतनूने देखील त्याला तू इच्छामरणी होशील असा वर दिला. 

असे घडले असेल का ?

यातील देवव्रताचे  शंतनू वरील निरातिशय प्रेम पाहता,  भैरप्पांनी आपल्या पर्व या कादंबरीतून एक वेगळा विचार आपल्यासमोर मांडला आहे.  तो म्हणजे पहिल्या सात बाळंतपणासाठी गंगाच माहेरी निघून जायची व आपल्या मातृसत्ताक  कुटुंबात पुत्रांना ठेवून परतायची.  पण आठव्या वेळी मात्र शंतनूने तिला माहेरी जाण्यापासून प्रतिबंध केला. म्हणूनच पुत्रजन्म होतात लहानग्या देवव्रताला  शंतनूच्या हाती सोपवून,  आपल्या अटींप्रमाणे ती स्वगृही आपल्या आधीच्या ७ पुत्रांकडे  निघून गेली.  शंतनूने नंतर देवव्रताला सर्व प्रकारचा विद्याभ्यास देऊन घडविले असावे.  पित्याचा हा त्याग पाहून देवव्रताने  देखील आपल्या पित्यासाठी भीष्मप्रतिज्ञेद्वारे एक मोठा आयुष्यभराचा त्याग करायचा निर्णय घेतला. 

अर्थातच हा विचार स्वतः महाभारतकार कुठेच ध्वनित देखील करीत नाहीत.  पण एक गोष्ट आपल्याला महाभारतातून निश्चितपणे कळते ती मात्र अशी की,  शंतनूने जे दोन्ही विवाह केले ते नदी प्रदेशातील  वन कन्या, धीवरकन्या इत्यादी क्षत्रिय नसलेल्या जमातीतील मुलींशी केले व ते देखील दोन्ही वेळी त्यांनी घातलेल्या अटी मान्य करीत केले.  या दोन्ही कन्यांची कदाचित हीन असलेली कुळे उंचावण्यासाठी व त्या राजाला आणि राज्याला अनुरूप आहेत,  ते तत्कालीन जनमानसावर ठसविण्यासाठी त्यांच्या जन्माभोवती अद्भुततेचे  वलय निर्माण केले,  जे आपण या आधीच्या कथा भागात पाहिले आहेच. 

टीप : लेखासोबत वापरलेली दोन्ही चित्रे सुप्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांची असून आंतरजालावरून (इंटरनेटवरून ) घेतलेली आहेत.

संदर्भ : आदिपर्व अध्याय १००, पर्व (एस एल भैरप्पा) 


No comments:

Post a Comment