महाभारतातील अतर्क्य व चमत्कृतीपूर्ण घटनांचे मानवीय विश्लेषण

Friday, March 26, 2021

महाकाव्याची भव्यता

महाभारताचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे.  सुमारे एक लक्ष श्लोकांसह जगातील सर्वात मोठे काव्य म्हणून मान्यता पावलेले महाभारत जिथून सुरु होते तिथेच ते संपते  देखील. हे कसे? आपण जी कथा वाचतो ही कथा लोमहर्षण (अथवा रोमहर्षण)  यांचा पुत्र उग्रश्रवा सौती  नैमिषारण्यातील शौनकादि ऋषींना सांगतो तेथपासून.  आता आपण या कथेचा उगम पाहू.

महाभारत युद्धामध्ये कौरव-पांडवांकडील सर्व योद्धे मारले जातात व वाचतात केवळ पांडव. पांडवांचा वंश शिल्लक राहतो तो केवळ अर्जुन-पुत्र अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या पोटी. युद्धानंतर ३६ वर्षे युधिष्ठिर राज्य करतो व

पांडवांच्या पश्चात अभिमन्यूपुत्र परीक्षित राजा होतो आणि पांडव स्वर्गारोहणाला निघून जातात. राजा परीक्षिताचा मृत्यू सर्प दंशाने होतो व हे कळल्यावर परीक्षिताचा पुत्र (अभिमन्यूचा नातू)
राजा जनमेजय हे सर्पसत्र (सर्पसत्र म्हणजे सर्पांची आहुती देणारा यज्ञ) आयोजित करतो. या यज्ञासाठी आलेले वैशंपायन नावाचे ऋषी राजा जनमेजयाला आपल्या आजोबा-पणजोबांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगण्यासाठी या भारत कथेचं निवेदन करतात. (सर्पसत्र सध्याच्या तक्षशिला परिसरात, जे आता पाकिस्तानात आहे, तेथे झाले असे मानण्यात येते).  त्यांनी हि कथा जय या नावाने व्यास महर्षींच्या तोंडून ऐकलेली असते. त्यात स्वतःच्या उपकथानकांची भर घालून ते त्याला भारत बनवतात.  अशा रीतीने हे एक वर्तुळ पूर्ण होतं. याच यज्ञाच्या ठिकाणी ही कथा सौतीने ऐकली आणि आपल्या अनेक उपकथानकं व रूपक कथांची भर घालून त्याचं जे महाकाव्य बनलं तेच आपण ऐकत / वाचत असलेलं
महाभारत

व्यासांचे जय हे केवळ ८८०० श्लोकांचं असल्याचं मानलं जातं , तर वैशंपायनांचे भारत २४००० श्लोकांचं बनलं. आणि उग्रश्रवा सौतीनी जेव्हा ते नैमिषारण्यात शौनकादी मुनींना सांगितले तेव्हा ते सुमारे १ लक्ष श्लोकांचे बनले (मुख्य महाभारताचे ८४००० श्लोक + १६००० श्लोकांचे खिलपर्व किंवा हरिवंश ) . अर्थात हि सत्यासत्यता आपल्याला तपासून पाहता येत नाही. 

असं हे महाकाव्य भारताच्या किंवा जगाच्या इतर काव्याच्या तुलनेत किती मोठे आहे हे आपण या लेखासोबत असलेल्या एका तुलनात्मक तक्त्याद्वारे पाहू शकतो. महाभारत हे रामायणाच्या सुमारे चार पट मोठे असून इलियड व ओडिसी या ग्रीक महाकाव्यांच्या एकत्रित श्लोकसंख्येपेक्षा देखील चौपट आहे


गणेशाने लिहिलेलं काव्य ?

एवढं मोठं महाकाव्य अस्तित्वात कसं  आलं असेल ?  हे देखील एक कोडंच आहे. याबद्दल असे सांगितलं जाते कि व्यासांना हे काव्य स्फुरलं व त्यांना ते लिहून घेण्यासाठी श्री गणेशाला विनंती केली. गणेशाने देखील ते मान्य करताना एक अट घातली कि व्यासांनी ते सांगताना कोठेही थांबायचं नाही. व्यासांनी देखील हि विनंती मान्य करताना श्री गणेशाला एक प्रति अट घातली कि त्यानेदेखील यातील प्रत्येक श्लोक समजावून घेतल्याशिवाय शब्द बद्ध करायचा नाही. दोघांनी एकमेकांच्या अटी मान्य करत या महाकाव्याच्या निर्मितीला आरंभ केला. महर्षी व्यासांनी देखील स्वतःच्या निर्मितीला वेळ मिळण्यासाठी काही कूट श्लोकांची निर्मिती केली व एक महाकाव्य जन्माला आलं .

पण खरंच असं घडलं असेल का ? हि कथा कशी आली , गणपती हे दैवत संपूर्ण कथेत कुठेच आढळत नसताना लेखनिक म्हणून कसं आले. यातील अशा अनेक कथांचा उहापोह आपण प्रक्षिप्त म्हणजे नक्की काय?  व भांडारकर संस्थेच्या डॉ सुखटणकर व त्यांच्या चमूने ते कसे ठरविले हे पुढील लेखात पाहू .


Monday, March 15, 2021

औक्षोहिणीच्या गणिताची वास्तवता

महाभारत युद्ध म्हटले कि आपल्या डोळ्यासमोर १८ औक्षोहिणी सेनेच्या युदधाचा एक भलामोठा पट उभा राहतो . पण हे १८ औक्षोहिणी म्हणजे नक्की किती ? व एवढे सैन्य खरोखरीच अस्तित्वात होते का? महाभारतातील आदिपर्वाच्या दुसऱ्या अध्यायात दिलेल्या माहितीवरून घेतलेला हा वेध .

महाभारताच्या १८ पर्वांमधे वर्णन केलेल्या, महाभारतातील १८ दिवसांच्‍या कौरव-पांडव युद्धा मध्ये १८ औक्षोहिणी  सेना सहभागी झाली होती .  या औक्षोहिणी शब्दाचा अर्थ व त्यातील विविध सेना विभागांची संख्या महाभारताच्या आदिपर्वातील  दुसऱ्या अध्यायातच सुमारे ९ श्लोकांमध्ये विस्ताराने दिलेली आहे.  यानुसार एक औक्षोहिणी सैन्यात २१८७० गज (हत्ती) व तितकेच रथ असतात, अश्वांची संख्या ६५,६१० असून पदाती सैनिकांची संख्या १,०९,३५० असते यातील छोट्या-छोट्या विभागांसाठी चढत्या क्रमाने पत्ती, सेनामुख,  गुल्म, गण, पृतना, चमू व अनीकिणी अशी नावे आहेत. यांचे परस्परसंबंध व चढती भाजणी खालील तक्त्यामध्ये दर्शविली आहे.

संज्ञा

गुणक

रथ

हत्ती

अश्व

पायदळ

पत्ती

सेनामुख

३ पत्ती

१५

गुल्म

३ सेनामुख

२७

४५

गण

३ गुल्म

२७

२७

८१

१३५

वाहिनी

३ गण

८१

८१

२४३

४०५

पृतना

३ वाहिनी

२४३

२४३

७२९

१२१५

चमू

३ पृतना

७२९

७२९

२१८७

३६४५

अनीकिणी 

३ चमू

२१८७

२१८७

६५६१

१०९३५

औक्षोहिणी

१० अनीकिनी

२१८७०

२१८७०

६५६१०

१०९३५०

 कौरवांच्या बाजूने लढलेले एकूण सैन्य = ११ x १०९३५० = १२,०२,८५०

आणि पांडवांच्या बाजूने लढलेले एकूण सैन्य = ७ x १०९३५० = ७,६५,४५०

म्हणजेच युद्धातील एकूण सैन्य = १८ x १०९३५० = १९,६८,३०० (सुमारे २० लाख माणसे )

एवढे प्रचंड मनुष्यबळ खरोखरीच होते काय ?

याचाच अर्थ असा की या श्लोकांनुसार सुमारे २० लाख मनुष्य सैनिक कुरुक्षेत्रावर एकवटले होते.  एवढ्या प्रचंड मनुष्यबळासाठी अर्थातच जेवणखाण तयार करण्यासाठी आचारी,युद्ध तयारीसाठी, शस्त्रास्त्र तयारीसाठी, निवास, पाणी, जनावरांची देखभाल आणि दाणा पाणी करण्यासाठी, रथांची डागडुजी करण्यासाठी, जखमींवर मलमपट्टी इत्यादींसाठी अजून किमान लाखभर तरी माणसांची आवश्यकता पडेल.  तत्कालीन लोकसंख्या पाहता ही गोष्ट अशक्यप्राय वाटते. या एवढ्या लढाऊ सैनिकांवर अतिरिक्त न लढणारे व कामासाठी उपयोगात आणले जाणारे विविध प्रकारचे कारागीर जसे रस्ता दुरुस्ती साठी लागणारे कारागीर भाले तलवारी धनुष्य-बाण इत्यादी शस्त्रास्त्रे तयार करण्यासाठी लागणारे कारागीर, याच बरोबर जनावरांची कातडी कमावून पाण्याच्या पखाली बनवण्यासाठी चर्मकार, या व्यक्तींची देखील या युद्धासाठी आवश्यकता होती. युद्धाशी निगडित असणाऱ्या या सर्व व्यक्तींना व्यतिरिक्त अनेक स्त्रिया, युद्धात भाग न घेणाऱ्या इतर व्यक्ती म्हणजे बालके, वृद्ध, अपंग या सगळ्यांचा एकत्रितपणे विचार केला तर तत्कालीन लोकसंख्या काही कोटींच्या घरात असायला हवी जी गोष्ट अशक्यप्राय वाटते.      

अबब - किती हत्ती , किती घोडे ?

या औक्षोहिणी सैन्याच्या उल्लेखा मध्येच अश्व, गज  इत्यादी प्राण्यांच्या संख्यादेखील दिलेली  आहे.  या प्रत्येक औक्षोहिणी  मागे २१८७० गज (हत्ती)  आणि ६५६१० अश्व म्हणजेच एकूण सुमारे ४ लाख  हत्ती आणि बारा लाख अश्व सांभाळणे व त्यांच्या खाण्यापिण्याची आणि देखभालीची व्यवस्था करणे भाग आहे. यातील रथांची संख्या देखील औक्षोहिणी मागे २१,८७० एवढी आहे म्हणजेच सुमारे चार लाख रथ युद्धात वापरले गेले असले  तर ते बनवण्यासाठी प्रचंड कारागीर,लोखंड, लागेल.  सर्व च रथ इतर प्रदेशातून आणणं शक्य नसल्यामुळे त्यातील बरेचसे  रथ हस्तिनापुर मध्येच बनवले असण्याची आवश्यकता आहे. तसेच त्यांची दुरुस्ती देखील तेथेच व्हायला हवी म्हणजे ते दुरुस्त करणारे कुशल कारागीर देखील इतर प्रदेशातून हस्तिनापुर कडे यायला हवे.              

या महायुद्धात १८ औक्षोहिणी  सेनेचा नाश झाला मात्र अश्व, गज यासारख्या जीवित राहणाऱ्या  प्राण्यांना कोणी विनाकारण मारत नाही त्यामुळे यातील काही लाख प्राणी तरी निश्चितच मागे उरले असतील. हे सर्व आणले कुठून व  त्यांचे पुढे काय झाले ? पण त्यांच्या बद्दलचा कोणताही उल्लेख महाभारतात येत नाही, कारण त्यांची संख्याच प्रत्यक्षात एवढी मोठी नाही.     

या सर्व गोष्टी विचारात घेता एवढी प्रचंड मनुष्य संख्या या युद्धात असणे शक्य नाही असे वाटते याचे कारण मुख्यत्वे युद्ध करण्यास धडधाकट असणारी एवढी  लोकसंख्या तत्कालीन भारत वर्षात अस्तित्वात नव्हती.  याच्या स्पष्टीकरणासाठी  उदाहरण म्हणून आपण महाभारतातील एक छोटासा प्रसंग पाहू.           

विराटाचे युद्ध ... नेमके किती मोठे ?

विराटाचा  मेहुणा  व सेनापती किचक  आणि त्याचे १०५ बंधू (उपकिचक)  यांचा भीमाने अज्ञातवासात असताना वध केला.  ही बातमी हस्तिनापुरात पोहोचताच ,विराटचे राज्य आता दुबळे झाले आहे व त्यांचे गोधन (जी तत्कालीन मुख्य संपत्ती होती) आपल्याला सहजपणे लुटता येईल या उद्देशाने प्रथम त्रिगर्तराज सुशर्मा याने  विराटावर हल्ला केला. हा  हल्ला परतविण्यासाठी विराटाला  बृहन्नडा रूपातील अर्जुन वगळता,  इतर चार पांडवांची ही मदत घ्यावी लागली ज्यात आचारी असलेला भीम देखील होता.  या सर्वांनी मिळून सुशर्माचा पराभव केला पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूने गोधन लुटण्यासाठी कौरवांनी  हल्ला केला. या हल्ल्यात देखील भीष्म, द्रोण, कर्ण इत्यादी वीरांना  पण सहभागी व्हावे लागले होते.  केवळ गोधन लुटण्यासाठी एवढे सारे वीर  मग याचा अर्थ लढाऊ सैनिक फार उपलब्ध नव्हते का ?           

तिकडे विराटाची परिस्थिती पहा.  त्याचे सैन्य म्हणजे जमवाजमव केलेले मिळेल त्या हत्याराने थोडेफार लढू शकणारे नगरजन असावेत . ते सर्व देखील  सुशर्माशी  लढायला गेल्यावर राजपुत्र उत्तर कडे थोडीफार माणसे असावीत पण कौरव सेनेवर चालून रथातून जाण्याकरता सारथी देखील नव्हता आणि ते काम बृहन्नडा रुपी अर्जुनाला कराव लागलं.  ज्यात त्याने नंतर गांडीव धनुष्य हातात येत कौरव महारथी  त्यांच्या थोडक्या सैन्याचा पराभव करीत कुरूंचं आक्रमण परतवून लावलं. या सर्व प्रसंगांवरून आपल्या असे लक्षात येते कि या गो-ग्रहण युद्धात  सुशर्माचे शे दोनशे सैनिक असावेत व विराटाचे थोडे जास्त. कुरुंचेही सैन्य फार नसावं व  त्यामुळेच अर्जुन त्यांना सहज हरवू शकला . एकंदरीतच या सर्व प्रसंगात विराटासारख्या लहान राजाची व सुशर्मा व कुरु या सर्वांची मिळून ५०० माणसं देखील नसावीत .           

महाभारतीय युद्ध हे महायुद्ध  असल्याने त्यात सैनिकांची हस्तिनापुरात लढण्यायोग्य सैनिक व तसेच विविध राजांकडून केलेली जमवाजमव पाहता हि संख्या जास्तीत जास्त २० ते २५ हजाराच्या घरात जाईल . यातील हत्तीची संख्या देखील १०-१५ पेक्षा जास्त नसावी (हत्तीचे उल्लेख फारच कमी येतात). मात्र बरेचसे महारथी रथातून लढत असल्याने रथांची संख्या ५०-६० असू शकेल. घोडा हा प्राणी युद्धात वापरला जात असला तरी घोड्यांवरून युद्ध केल्याचे उल्लेख नाहीत, म्हणजेच तो मुख्यत्वेकरून रथांसाठीच वापरला जात असावा असे वाटते,           

द्वंद्व युद्धाने एवढी मोठी हानी होऊ शकेल ?

आणखी एक गोष्ट विचारात घेतली पाहिजे ती म्हणजे युद्ध ज्या प्रकारे लढले गेले तो प्रकार बहुतांशी द्वंद्वयुद्धाचा  होता. एक वीर दुसऱ्या (एकाच) वीराशी त्याच्या शस्त्र कौशल्यानुसार लढत होता.  या प्रकारात एवढ्या मोठ्या सैन्यासाठी धनुष्यबाण , तलवारी, भाले , गदा यांसाठी प्रचंड प्रमाणावर लोखंड लागेल, जे उपलब्ध असेल कि नाही याची शंकाच आहे.  अस्त्रांचा उपयोग फार कमी होता त्यामुळेच एवढ्या लक्षावधी सैन्याची हानी फक्त द्वंद्व युद्धाने केवळ १८ दिवसात होणे शक्य नव्हते.  युद्धात तोफा अथवा अस्त्रे वापरली गेली तरच एवढा मोठा विध्वंस कमी कालावधीत शक्य आहे आणि असे असेल तर मग युद्ध १८ दिवस चालवायची तरी काय आवश्यकता होती.

या सर्वांचा सारासार विचार करता मला असे वाटते कि युद्धातील सैनिकांची संख्या निश्चितच फार मोठी नसावी. मी बांधलेला २०-२५ हजार सैनिकांच्या अंदाजाचा आकडा देखील कदाचित मोठा असू शकेल. एवढ्या मोठया पानिपत युद्धात देखील हि संख्या फक्त सव्वा ते दीड लाखाच्या घरात होती. 

तुम्हाला काय वाटतं ? 


Wednesday, March 10, 2021

महाभारताच्या चोखंदळ वाचकांसाठी संदर्भ व विश्लेषण ग्रंथ

 प्रत्येक मराठी घरात रामायण-महाभारत यासारखे धर्मग्रंथ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रथम हस्तांतरित होतात  होतात ते मौखिक स्वरूपात.  आमच्या लहानपणी तरी तशीच परिस्थिती होती व त्यामुळे त्यातील अद्भुताचे मलाही  एक कुतूहल निर्माण झाले आणि त्यातूनच त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्याची प्रेरणा देखील.  महाभारतासारखा  प्रचंड ग्रंथ तर अनेक अद्भुतांनी भरलेला.  प्रथम त्यातील लहानसहान गोष्टी वाचल्या. त्यानंतर पांडवप्रताप, महाभारत कथासार व त्यापुढे जैमिनी अश्वमेध कथासार अशा छोट्या पुस्तकातून महाभारताचा एक सलग कथा भाग माझ्या मनात साकार झाला. त्याही पुढे जाऊन मृत्युंजय, युगंधर, राधेय यांच्यासारख्या ललित कादंबऱ्या वाचल्या व त्यातील कर्ण, कृष्ण यांच्या रेखाटनाने  तर मी भारावूनच गेलो होतो. 

१९६६ च्या सुमारास पुण्याच्या भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटने (BORI)  महाभारतावर काही दशकं संशोधन करीत महाभारताची चोखंदळ अथवा संशोधित आवृत्ती (ज्याला इंग्रजीमध्ये क्रिटिकल एडिशन CE , म्हणून ओळखलं जातं)  प्रसिद्ध केली होती. मूळ महाभारतात नसलेले आणि नंतर घुसडले गेले असावेत असे वाटणारे -  सर्व श्लोक त्यांनी बाजूला काढले व महाभारताच्या तत्कालीन अभ्यासकांना महाभारताच्या अभ्यासासाठी एक नवं दालन उपलब्ध झालं. असं करताना BORI च्या अभ्यासकांनी भारताच्या विविध भागात उपलब्ध असणाऱ्या महाभारताच्या विविध प्रतींचा सुमारे चाळीसएक वर्ष अभ्यास केला व त्यामुळे या संदर्भ ग्रंथाला एक प्रतिष्ठा प्राप्त झाली. या  संदर्भ ग्रंथांच्या आधी, बर्‍याच जणांनी महाभारताच्या निळकंठ प्रतीला प्रमाण मानलं होतं. ही प्रत म्हणजे महाराष्ट्रातील गोदावरी तीरावरील कोपरगाव या ठिकाणच्या, निळकंठ चतुर्धर, या संस्कृत अभ्यासकांने  महाभारतावर केलेलं सतराव्या शतकातील विवेचन.  सध्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या ठिकाणी जन्मलेले हे कवीवर्य  पुढे संस्कृतच्या अभ्यासासाठी वाराणसीत स्थायिक झाले येथूनच त्यांनी महाभारतावरील हे संस्कृत टिपण लिहिलं.  बऱ्याच संस्कृत अभ्यासकांकडून ते आजही प्रमाण मानले जाते. 

याबद्दल एक विशेष सांगायचे म्हणजे निळकंठ यांची ही प्रत सतराव्या शतकातील असल्याने यातील युध्दवर्णनात  युद्धांच्या उल्लेख तोफांचे उल्लेख देखील आहेत.  याचा उपयोग महाभारतकाळी देखील तोफा होत्या असे सांगायला आज केला जातो तो पूर्णतः  चुकीचा आहे.  

भांडारकर प्रत उपलब्ध झाल्यावर मराठीत देखील अनेक साहित्य कृतींना बहर आला. यात मृत्युंजय, राधेय, युगंधर सारख्या ललित कादंबरी वजा लिखाण होते तसेच युगांत, व्यासपर्व, हा जय नावाचा इतिहास आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, महाभारत एक सूडाचा प्रवास असे विश्लेषणात्मक वृत्तपत्रीय लेखन संकलन अथवा पुस्तके देखील होती. कर्ण व श्रीकृष्ण या व्यक्तिरेखाना त्यामुळे बराच उठाव मिळाला. कर्णावर तर मृत्युंजय, तो राजहंस एक अशी मराठी नाटकं  देखील निघाली होती जी मी देखील त्याकाळी पाहिली होती. 

१९७० व १९८०च्या सुमारास वृत्तपत्रातून महाभारतावर बरेच लेख-प्रति लेख छापून येत. त्यातून यातली बरीचशी पुस्तकं संकलित केली गेली आणि म्हणूनच त्याचे साहित्यिक मूल्य देखील फार आहे.  या टीकात्मक व विश्लेषणात्मक लेख आणि पुस्तकांबरोबरच महाभारताचे एक मानवी स्वरूप देखील उलगडायला सुरुवात झाली व त्यातील प्रत्येक चमत्कृतीपूर्ण व अनाकलनीय प्रसंगावर सांगोपांग विचार व चर्चा सुरू झाली. यातूनच श्री एस एल भैरप्पा यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकाच्या लेखणीतून १९८०च्या सुमारास पर्व ही कादंबरी साकारली आणि महाभारताचा एक वेगळाच मानवी पैलू लोकांच्या ध्यानात आला व हळूहळू वाचकांच्या पचनी पडू लागला.

माझ्यासारखा सर्वसामान्य वाचक मात्र यापासून बराच दूर होता. मी शालेय जीवनात युगंधर, मृत्युंजय सारखे ललित कादंबरी प्रकारात मोडणारे वाङ्मय वाचले होते. परंतु या टीकात्मक अथवा विश्लेषणात्मक लेख व पुस्तकांपासून मी पूर्णपणे अनभिज्ञ होतो व म्हणूनच माझ्या पिढीच्या अनेकांप्रमाणे मलादेखील बी. आर. चोप्रा यांचे दूरदर्शनवरील महाभारत हेच संपूर्ण महाभारत होते. अभ्यासाच्या व नंतरच्या नोकरीच्या व्यस्ततेत महाभारत हा विषय मागे पडला आणि मधल्या कालावधीत केवळ ज्ञानरंजन म्हणून अधून मधून जमेल तसे वाचत राहिलो.

पण सुमारे दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये माझ्या नोकरीच्या अखेरच्या काळात  श्री. एस. एल. भैरप्पा यांची पर्व ही कादंबरी माझ्या हातात पडली. ती वाचताच मी भारावून गेलो. पर्व मधील घटना मनाला पटू लागल्या.  चमत्कारांवरील   दैवी आवरण बाजूला होऊ लागले. त्या मागचा मानवी चेहरा जास्त जवळचा वाटू लागला आणि  मग कुठेतरी मनाच्या मागच्या कोपऱ्यातील अडगळीतून असलेल्या युगांत, व्यासपर्व, महाभारत एक सूडाचा प्रवास,  महाभारत-संघर्ष आणि समन्वय, अशा अनेक पुस्तकांचा शोध सुरू झाला आणि हळूहळू ती वाचताना महाभारता बद्दलची उत्सुकता नव्याने जागृत झाली. त्यातील घटनांना नवे आयाम मिळाले.नवीन दृष्टीकोन मिळाला.  एकदम काहीतरी नवीन वेगळं गवसल्याचा आनंद मिळाला.  मग हे सगळं सांगायचं कुणाला? कळणार कोणाला? आणि कधी? हेच समजेना म्हणून हा ब्लॉग लेखन प्रपंच.

आता ही सर्व पुस्तक दोन-दोनदा वाचल्यावर डॉक्टर रा. शं. वाळिंबे संपादित विदर्भ-मराठवाडा कंपनीचे सर्व खंड नव्याने वाचायला घेतले आहेत.  संदर्भासाठी गीता प्रेस, गोरखपुर यांची संस्कृत हिंदी आवृत्ती व भांडारकर इन्स्टिट्यूटची संस्कृतमधील संशोधित प्रत देखील आहे. या सर्वांचा वापर करून हळूहळू मला उमगलेले महाभारत मराठीतून उलगडण्याचा विचार आहे. तसं पाहिलं तर, ते इतर बऱ्याच ब्लॉगवर पण उपलब्ध आहे तरी पण मला त्याचे अस्तित्व पुर्ण वाटत नसल्याने, माझ्या दृष्टीकोनातून ते सादर करण्याचा माझा प्रयत्न राहील. अर्थात यासाठी बराच कालावधी लागेल याचीही मला जाणीव आहे तरीपण पाहुया किती तग  धरता येतो ते.


मला उपलब्ध झालेले काही साहित्य (गीता प्रेस व भांडारकर प्रती) नेटवर उपलब्ध आहे. यथावकाश मी ते माझ्या या ब्लॉग वर पण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेनच पण त्याआधी त्याचे माझ्या दृष्टिकोनातून परीक्षण देखील वेगळ्या लेखात करेन. आजमितीस खालील पुस्तके माझ्याकडे उपलब्ध आहेत. 

  1. महाभारत संशोधीत आवृत्ती - भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिटयूट - खास संस्कृत जाणकारांसाठी  व अभ्यासकांसाठी 
  2. महाभारत - संस्कृत - हिंदी आवृत्ती - गीताप्रेस - संस्कृत येत नसल्यामुळे येथील भाषांतराचा ताडून पाहण्यास उपयोग होतो 
  3. महाभारत - ११ खंड - संपादक डॉ रा. शं. वाळिंबे , प्रकाशक  विदर्भ मराठवाडा बुक कंपनी - यात संस्कृत श्लोक नाहीत परंतु प्रत्येकी श्लोकाचे अथवा श्लोकसमूहाचे मराठी भाषांतर आहे. मूळ संस्कृत श्लोक पाहायचा असल्यास गीता प्रेस ची आवृत्ती उपयोगी पडते.
  4. महाभारत - २ खंड - लेखिका : कमला सुब्रमण्यम , अनुवाद - मंगेश पाडगावकर - साधं सरळ गोष्टीरूप महाभारत 
  5. पर्व - एस एल भैरप्पा - मराठी भावानुवाद - सौ उमा कुलकर्णी. महाभारतावर आधारित उत्कृत्ष्ट कादंबरी (याचे वेगळे समग्र पुस्तक परीक्षण माझ्या मना सज्जना या ब्लॉग वर मिळेल). 
  6. महाभारत - माधव कानिटकर (कथारूप). एक सलग कथा म्हणून थोडक्यात वाचण्यास उपयुक्त. 
  7. महाभारतातील व्यक्तिदर्शन - शं. के. पेंडसे - व्यक्तीविशेष लेखांचे संकलन, १९६४ सालचे मॉडर्न बुक डेपो यांचे प्रकाशन. महाभारतातील व्यक्तिरेखांवर मानवी दृष्टिकोनातून प्रकाश टाकणारे एक अतिशय उत्कृष्ट पुस्तक. महाभारतातील विविध व्यक्तिरेखांचे बारकावे अभ्यासायचे असतील तर हे पुस्तक  अभ्यासायलाच हवे,
  8. युगांत - इरावती कर्वे - व्यक्तीविशेष लेखांचे संकलन. (याचे वेगळे समग्र पुस्तक परीक्षण माझ्या मना सज्जना या ब्लॉग वर मिळेल). 
  9. व्यासपर्व - दुर्गा भागवत - महाभारतातील व्यक्तीविशेष लेखांचे संकलन.
  10. जय - देवदत्त पट्टनायक - महाभारत व त्याची उपकथानक , लोकगीतं  याच्या संग्रहातून तयार होणारे  उपयुक्त संदर्भ पुस्तक 
  11. महाभारत - एक सूडाचा प्रवास - दाजी पणशीकर - महाभारतातील सूड हि मध्यवर्ती संकल्पना स्पष्ट करणारे पुस्तक. 
  12. महाभारताचे वास्तव दर्शन (आक्षेपांच्या संदर्भात) - प्रो. अनंत दामोदर आठवले (स्वामी वरदानंद भारती) - महाभारताच्या तत्कालीन लेखकांच्या पांडव विरोधी , कौरव व कर्ण धार्जिण्या लेखकांची स-संदर्भ चिरफाड करणारे पुस्तक 
  13. महाभारत - संघर्ष आणि समन्वय - रवींद्र गोडबोले , अतिशय वेगळ्या पद्धतीनं संकल्पना मांडणारे उत्कृष्ट पुस्तक 
  14. कर्ण , महापुरुष कि खलपुरुष - सौ माधवी सप्रे 
  15. कर्ण खरा कोण होता? - दाजी पणशीकर. कर्णाची काळी बाजू उजेडात आणणारे पणशीकरांचे उत्कृष्ट पुस्तक. मृत्युंजय वाचून भारलेल्यानी हे पुस्तक वाचायलाच हवे. 
  16. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे - विश्वास दांडेकर - श्रीकृष्णाच्या आयुष्याची वेगळी बाजू उलगडून दाखविणारे सुंदर पुस्तक.
  17. व्यासांचे शिल्प - नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेल्या महाभारतविषयक प्रस्तावना व लेखांचा संग्रह. एक सुंदर संकलन, महाभारताच्या अभ्यासकांनी वाचायलाच हवे असे. यातील कृष्णाविषयीचे लेख अत्यंत उत्कृष्ट आहेत. 
  18. महाभारताचा मूल्यवेध - डॉ. रवींद्र शोभणे  - महाभारतातील  व्यक्तिरेखांचा वेगळा विचार मांडणारे पुस्तक. (याचे वेगळे समग्र पुस्तक परीक्षण माझ्या मना सज्जना या ब्लॉग वर मिळेल).  
  19. महाभारत - पहिला इतिहास - वि. ग. कानिटकर - सरळ साधं महाभारत, आदिपर्वापासून स्वर्गारोहण पर्व अशी सर्व १८ पर्व थोडक्या व ३८० पानांच्या या पुस्तकात बसविली आहेत.
  20. व्यासांचा वारसा - आनंद जोतेगावकर - महाभारत कथेतील बऱ्याच गोष्टी आरश्यात लक्ख पणे उलगडून दाखविणारे पण समजण्यास थोडेसे कठीण असणारे, एक सुंदर पुस्तक.
  21. यासम हा - प्रा. सदानंद मोरे  - योगेश्वर कृष्णाचे वैचारिक चारित्र्य. कृष्णाच्या आयुष्यावर आधारित शोधनिबंध असल्याने तत्वज्ञानाची बैठक असणारे पुस्तक. वाचायला काहीसे जड.
  22. महाभारत : एक मुक्त चिंतन - प्रेमा कंटक - महाभारता वरील चिंतनात्मक स्फुट लेखन - यात महाभारत काव्याचे लेखक , त्यात अनेकांनी घातलेली भर , महाभारतातील विसंगती व असंभव घटना , दैव कि पुरुषार्थ असा विविधांगी विचार आहे. यातील सूत्रधार या प्रकरणात कृष्णाचे महाभारतातील स्थान या त्याचे जीवन यावरील चर्चा आहे. १९६७ साली प्रकाशित झालेले हे पुस्तक महाभारत अभ्यासकांसाठी संग्राह्य आहे. 







Sunday, March 07, 2021

जरासंध वधाचे अप्रतिम शिल्प

 जरासंधाचा वध हि महाभारतातील अनेक राजकीय कंगोरे असणारी घटना. वरवर एक साधं द्वंद्वयुद्ध पण यात भीमाने केलेल्या जरासंधाच्या वधाने पांडवांसाठी व श्रीकृष्णासाठी अनेक गोष्टी प्रस्थापित केल्या.

खांडववन जाळून इंद्रप्रस्थाची निर्मिती केल्यानंतर आपल्या वेगळ्या राज्याचा डंका पिटणे आवश्यक आहे हे पांडवांच्या व विशेषतः युधिष्ठिराच्या लक्षात आले व यासाठी राजसूय यज्ञ करावा असे त्याच्या मनात आले. अर्जुनाने मधल्या काळात विविध शस्त्रास्त्रांची प्राप्ती करून घेतली होतीच. त्यामुळे स्वतःच्या बंधूंच्या पराक्रमावर युधिष्ठिराचा विश्वास होताच. यासाठी त्याने पांडवांचा मित्र व सखा श्रीकृष्णाला हा विचार बोलून दाखवला आणि त्यालाही तो विचार पटला. पण यात मुख्य अडसर होता तो मगध सम्राट जरासंधाचा. पांडवांबरोबर कृष्णही हे जाणून होता कारण याच जरासंधाच्या १७ आक्रमणांमुळे यादवांना मथुरा सोडून दूर पश्चिमेला द्वारका बेटावर पळून जावे लागले. अशा जरासंधाला पराभूत केल्याशिवाय पांडवांचे सार्वभौमत्व देखील सिद्ध होऊ शकणार नव्हते आणि सेनाबळावर मगधावर आक्रमण करून जरासंधाला जिंकणे केवळ अशक्य होते. मानवी स्वभावाचा प्रचंड अभ्यास असणाऱ्या श्रीकृष्णाने मग यावर वेगळी तोड काढायचे ठरवले, ते म्हणजे जरासंधाला त्याच्याच शब्दात या गुर्मीत बेसावध पकडून त्याला भीमाशी द्वंद्वयुद्ध खेळायला भाग पाडायचे व हा विचार त्याने पांडवांपाशी प्रकट करत आपली योजना त्याने त्यांच्यासमोर मांडली.

या योजनेनुसार स्वतः श्रीकृष्ण, अर्जुन व बलशाली भीम हे तिघेच जण ब्राम्हणवेषात जरासंधाच्या मगधात जाऊन जरासंधाला दान मागणार होते.स्वतःला क्षत्रिय शिरोमणी समजणारा जरासंध मग या मागणीला निश्चितच भुलणार होता.बलदंड जरासंधाशी युद्ध करण्यासाठी साजेशी शरीरयष्टी केवळ भीमाकडेअसल्याने तो भीमालाच आपला प्रतिस्पर्धी मानणार होता व हीच संधी शेवटी भीमाला साधायची होती.

कृष्णाच्या योजनेप्रमाणे तो भीम वअर्जुनासह मगधात पोहचला.जरासंधाला भेटून द्वंद्वाचे दान मागताच त्याच्या लक्षात आले कि हे ब्राम्हण नसून क्षत्रिय आहेत.त्यांची शरीरयष्टी पाहून ते कोण असावेत हेदेखील त्याच्या लक्षात आले व तरीदेखील आपल्या सामर्थ्याचा अभिमान बाळगणाऱ्या जरासंधाने हे आव्हान स्वीकारले आणि सर्वसाधारण शरीरयष्टी असणाऱ्या अर्जुन व कृष्णाला वगळून त्याने तुल्यबळ वाटणाऱ्या भीमाची या द्वंद्वासाठी निवड केली.

कित्येक दिवस चाललेल्या या द्वंद्वात तरुण भिमाचीही जरासंधाने दमछाक केलीच पण अखेरीस भीमाने त्याला जेरीस आणले.या द्वंद्वात जरासंधाचा मृत्यू होणार होता तो त्याच्या देहाची दोन शकले केल्यावरच व याचं कारण होत ते जरासंधाची अतर्क्य जन्मकहाणी. दोन वेगवेगळ्या मातांच्या पोटी अर्ध्या भागात जन्मलेल्या या बालकाचे हे तुकडे टाकून देण्यात  आल्यावर “जरा” नावाच्या राक्षसिणीने ते “सांधून” त्यातून “जरासंध” हे एक बालक तयार झालं होत म्हणूनच त्याचा मृत्यूदेखील त्याच पद्धतीत होऊ शकत होता. भीमाला द्वंद्वायुद्धाच्या वेळी हे सूचित करताना श्रीकृष्णाने  एका काडीची दोन भेकलं करून बाजूला फेकली होती. अशा प्रकारे शकलं केलेला जरासंध मात्र पुन्हा जुळला गेला व म्हणून कृष्णाने पुन्हा काडीची भेकलं केली व ती विरुद्ध दिशेला फेकली.भीमाने मग पुन्हा डाव टाकला व जरासंधाला उभा चिरत त्याची शकलं विरुद्ध दिशेला फेकत त्याचा अंत केला.

कंबोडियाच्या Banteay Srey या मंदिरात जी अनेक अप्रतिम शिल्पे आहेत त्यातील खांडव वन दहनाच्या शिल्पाचा उल्लेख मी याआधीच्या लेखात केला होता.त्याच मंदिरात असलेलं जरासंधवधाच शिल्प देखील अप्रतिम आहे.यात भीमानं केलेली जरासंधाची दोन शकलं व्यवस्थितपणे दाखवलेली आहेत. महाभारतातील अनेक कथानकं भारताबाहेर पण किती खोलवर रुजली आहेत याचं हे द्योतक आहे. Banteay Srey हे मंदिर अशा अनेक शिल्पांनी सजलेलंआहे व म्हणूनच अंगकोर वाटचं मंदिर पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांनी Banteay Srey चं हे मंदिर निश्चितच चुकवू नये.

खांडववन दहनाचे सुंदर शिल्प

कृष्णार्जुनानी केलेले खांडव वनाचे दहन हि महाभारतातील एक उल्लेखनीय घटना असल्याचे मानावे लागते कारण वरवर अनेक घटनांपैकी एक असे वाटणारी हि घटना पांडवांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करणारी एक घटना ठरली

एका ब्राह्मणाच्या रूपात आलेल्या अग्नीला  दिलेले वाचन पूर्ण करण्याकरिता म्हणून कृष्णार्जुनांनी खांडव वन जाळल्याचा उल्लेख महाभारतात येतो. पण केवळ हे वन जाळूनच ते स्वस्थ बसले नाहीत तर या वनात वास करणाऱ्या व या अग्नीच्या ज्वालांतून स्वतःला सोडवू पाहणाऱ्या नाग जमातीच्या लोकांचा त्यांनी संहार केला व याला काहीतरी विशिष्ट कारण असले पाहिजे. या आधीही हे वन जाळण्याचे  प्रयत्न अग्नीने केले होते नाग प्रमुख तक्षकाचा मित्र असलेल्या  इंद्राने आपल्या पर्जन्य वर्षावाने ते हणून पडले होते. यावेळी मात्र प्रत्यक्ष कृष्णार्जुनच युद्धात उतरल्याने इंद्राचे काही चालले नाही व खांडव वन अग्नीच्या भक्षस्थानी पडले तेदेखील आता प्राणी व नाग जमातीच्या लोकांसह.

या प्रसंगाचे दृष्य कंबोडियातील Banteay Srei या ठिकाणच्या मंदिरात असलेल्या एका गोपुराच्या शिखरावर कोरलेले आहे. सोबत जोडलेल्या छायाचित्रात आपल्याला ते पहाता येत ज्यात वरच्या बाजूला तीन मस्तके असलेल्या ऐरावत या हत्तीवर बसलेला इंद्र आपल्याला पर्जन्यवर्षाव करताना दिसतो तर याच्या दोन्ही बाजूला रथात उभे असलेलं कृष्ण आणि अर्जुन यांनी आपल्या शर वर्षावाने हा पाणलोट थांबविल्याचे आपल्याला दिसते. त्याखाली या ज्वाळांनी वेढलेल्या जंगलातून बाहेर  पडण्यासाठी धडपडणारे प्राणी व काही नाग जमातीचे लोक दिसतात. या सर्व होरपळणाऱ्या प्राण्यांच्या वर शर साकवाखाली आपल्या नाग जमातीचा चिन्ह असलेल्या नागाचे शिल्प दिसतं.

या अग्निसंहाराच्या वेळी खांडव वनातील नागांचा प्रमुख तक्षक वनात नव्हता म्हणून तो वाचला. त्याची बायको व काही मुलं मात्र यात मृत्युमुखी पडली व म्हणूनच नाग पांडवांचे वैरी झाले, पुढे महाभारत युद्धात पांडवांचा सूड घेण्यासाठी सर्व नाग जमाती कौरवांच्या बाजूने लढल्या.अर्जुनासाठी तर पुढे हे वैर अभिमन्यूचा  मुलगा परीक्षित याचा सर्पविषाने मृत्यू घडवून आणेपर्यंत गेलं. परीक्षिताचा मुलगा जनमेजय याने मग नागांच्या नाशासाठी याज्ञ देखील केला.या सर्वांवरून या प्रसंगाची दाहकता  पुढच्या पिढ्यांपर्यंत कशी पसरत गेली हेआपल्या लक्षात येईल.

याचअग्निसंहारातून तक्षकाच्या घरी आश्रयास असलेला मय हा असुर शिल्पी बाहेर पडला.कृष्णार्जुनांनी त्याला जीवदान दिले व या उपकारांची परतफेड म्हणून त्याने पांडवांना इंद्रप्रस्थात भव्य मयसभा नावाचं भव्य सभागृह बांधून दिले

मोक्षदा एकादशी (गीता जयंती )

 #GeetaJayanti, #VaikuntaEkadashi, #GitaJayanti, #GitaJayanti2020, #vaikuntaekadasi2020

२०२० ची गीता जयंती २५ डिसेंबर रोजी साजरी झाली , त्यानिमित्ताने लिहिलेली गीतेच्या १८ अध्यायांची ही छोटीशी ओळख .

गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ असला तरी यात काय आहे याची माहिती आपल्यापैकी बरेच जणांना नसते. महाभारत युद्धाच्या सुरुवातीला समोर सगे सोयरे, आप्त बंधू यांना  रणमैदानात पाहिल्यावर अर्जुन भ्रमित झाला, त्याला हे युद्धच नको असे वाटू लागले व त्याला समजावून युद्धाला तयार करण्यासाठी श्रीकृष्णांनी जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे भगवतगीता.   मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल एकादशीला हि सांगितली गेली असे मानून हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वैकुंठाची दारे उघडी असतात व या दिवशी मृत्यू आल्यास मोक्षप्राप्ती होते असे मानून या दिवसाला वैकुंठ एकादशी अथवा मोक्षदा एकादशी असेही म्हटले जाते. एकूण १८ अध्यायाच्या ७०० संस्कृत श्लोकांमध्ये गीता सांगितली गेली आहे.

अध्याय पहिला : अर्जुन विषाद योग - या अध्यायात अर्जुनाला आपले आप्त स्वकीय समोर पाहून त्यांच्याशी युद्ध  करायचे याबद्दल वाटणाऱ्या विषादाचे वर्णन आहे.

अध्याय  दुसरा : सांख्य योग

अध्याय तिसरा - कर्म योग

अध्याय चवथा - ज्ञानकर्म सन्यास  योग

अध्याय पाचवा - सन्यास योग

अध्याय सहावा - ध्यान योग

अध्याय सातवा  - ज्ञान विज्ञान योग 

अध्याय आठवा - अक्षरब्रम्ह योग

अध्याय नववा - राजविद्या राजगुह्य योग

अध्याय   दहावा - विभूती योग

अध्याय अकरावा - विश्वरूप दर्शन योग - याअध्यायात भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप दर्शन करवले आहे.स्तिमित झालेला अर्जुन मग भगवंतांना त्यांच्या मूळ रूपात येण्याची विनंती करतो 

अध्याय बारावा - भक्ती योग - या अध्यायात भगवंतांनी आपल्याला कोणत्या प्रकारचे भक्त प्रिय  ते स्पष्ट केले आहे व  त्यानुसार अर्जुनाने  कसे वागले पाहिजे हे सांगितले आहे 

अध्याय तेरावा - क्षेत्र क्षेत्रज्ञविभाग योग 

अध्याय चौदावा - गुणत्रय विभाग योग 

अध्याय पंधरावा - पुरुषोत्तम योग

अध्याय सोळावा - दैवासुरसंपद विभाग योग

अध्याय सतरावा - श्रद्धात्रय विभाग योग

अध्याय अठरावा - मोक्ष सन्यास योग