महाभारतातील अतर्क्य व चमत्कृतीपूर्ण घटनांचे मानवीय विश्लेषण

Wednesday, April 21, 2021

महाभारतकार व्यासांची जन्मकथा

महाभारत कथेची सुरुवात जरी व्यासांच्या जन्माच्या आधी होत असली तरी या कथेत स्वतः व्यास वारंवार भूमिका निभावत असल्याने, महाभारताच्या मुख्य कथानकाला सुरुवात करण्यापूर्वी व्यासांची जन्मकथा जाणून घेणे आवश्यक आहे. महाभारतात असलेले सर्व नाट्य थोड्याफार प्रमाणात व्यास जन्माच्या कथेत देखील आहेच.

महर्षी व्यास हे पराशर मुनी व धीवर कन्या सत्यवती यांचे पुत्र.  त्यांच्या या मात्यापित्यांची कहाणी देखील असंख्य चमत्कारांनी रंगवलेली आणि बरीचशी उत्तरकालीन भर आहे, असे वाटायला लावणारी आहे.  महाभारताच्या पहील्याच म्हणजे आदिपर्वाच्या अध्याय १७६ मध्ये पराशर ऋषींची जन्मकथा येथे ही थोडक्यात अशी..... 

पराशर ऋषींची जन्मकथा

शक्ती ऋषी व कल्माषपाद राजा अरुंद वाटेवर
पूर्वी इश्वाकु वंशातील (रामाचा वंश) कल्माषपाद नावाचा राजा होऊन गेला. एकदा शिकारी करता, हा राजा वनात गेला असताना, एका अरुंद वाटेवर समोरून ज्येष्ठ वशिष्ठ पुत्र शक्‍ती येत होता.  ब्राह्मणाला प्रथम वाट द्यायची हा तत्कालीन संकेत पण राजा वाट द्यायला तयार होईना आणि शक्ती ऋषी देखील वाट सोडेना.  तेव्हा कल्माषपाद राजाने त्याला चाबकाने फोडून काढले आणि त्यामुळे संतापून शक्ती ऋषीने त्याला तू मनुष्य भक्षक राक्षस होशील असा शाप दिला.  त्याबरोबर त्या राजाने शक्तीलाच प्रथम भक्ष केले व त्यानंतर उरलेल्या वशिष्ठ पुत्रांना.  हे कळताच ऋषी वशिष्ठ अतिशय दुःखी झाले व त्यांनी आत्मघाताचे अनेक प्रयत्न केले पण ते सर्व अयशस्वी ठरले.  या सर्व प्रकारात शक्तीची पत्नी अदृश्यन्ती त्यांची पाठराखण करत होती.  व तिच्या गर्भातून येणारा, वेदाध्ययन करणारा एक स्वर वरिष्ठांच्या कानावर पडला तेव्हा वसिष्ठांनी कुतूहलाने अदृश्यन्तीकडे चौकशी केली यावेळी तिने त्यांचा नातू तिच्या उदरात वाढत असल्याचे वसिष्ठांना सांगितले हे कळताच त्यांचे नैराश्य पळाले.  यथावकाश अदृश्यन्तीला जो पुत्र झाला त्याचे नाव वसिष्ठांनी पराशर असे ठेवले. 

सत्यवतीची जन्मकथा 

उपरिचर वसु नावाचा एक राजा होता.  इंद्राच्या इच्छेप्रमाणे त्याने चेदी राज्य जिंकले त्यामुळे इंद्राने त्याची स्तुती करत त्याला सज्जनांचा प्रतिपाळ करण्यासाठी कळकाची काठी दिली.  नवीन संवत्सराचा सुरुवातीला या राजाने ती  काठी जमिनीत रोवून त्यावर शेला व पुष्पमाला बांधून त्याची पूजा केली. तद्नंतर प्रत्येक संवत्सराच्या (वर्षाच्या) सुरुवातीला ही प्रथाच झाली आजही नववर्षाच्या सुरुवातीला असे गुढी पूजन केले जाते

या उपरिचर वसुला गिरीका नावाची पत्नी होती.  ती ऋतुमती होण्याच्या काळातच राजाला राजवाड्यातील वयोवृद्धांना मांसान्न हवे म्हणून शिकारीसाठी वनात जावे लागले. वनातच गिरीकेच्या आठवणीने राजाचे  वीर्यस्स्खलन झाले.  ते वाया जाऊ नये म्हणून राजाने ते एका द्रोणात धरले व ते गिरिके पर्यंत पोहोचण्यासाठी एका श्येन पक्षाला दिले.  हा पक्षी यमुने वरून जात असता त्याच्या चोचीत काहीतरी पाहून दुसऱ्या एका श्येन पक्षाने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्याशी झालेल्या झटापटीत तो द्रोण यमुनेच्या पाण्यात पडला.  त्या यमुनेच्या पाण्यात अद्रिका नावाची अप्सरा शापामुळे मासा झाली होती.  तिने ते वीर्य गिळले व त्यातून तिला गर्भ राहिला.  पुढे ती प्रसूत झाल्यावर तिला एक मानवी जुळे झाले.  ही जुळी मुले कोळ्यांनी राजा उपरिचर वसु कडे नेली. पैकी जो मुलगा होता तो राजाने ठेवून घेतला तर मुलगी राजाने त्या धीवराला दिली व स्वतःच्या मुलीसारखा प्रतिपाळ करण्यास सांगितले तीच मुलगी म्हणजे सत्यवती. या दोन मानवी मुलांना जन्म देऊन अप्सरा आद्रिका शापमुक्त झाली.

पराशर व सत्यवती यांच्या जन्मकथेचा मतितार्थ

या दोन्ही कथा पाहता आपल्या असे लक्षात येते की हा सर्व खटाटोप व्यासांच्या माता-पित्यांना व पर्यायाने व्यासांना उच्चकुलीन ठरवण्यासाठी उत्तरकाळात केला गेला असावा.  यात पराशरांचे वडील  शक्ती ऋषी कल्माषपाद  राजा पेक्षा श्रेष्ठ व वशिष्ठ कुळातील असे सांगितले गेले,  तर धीवर कन्या मत्स्यगंधा प्रत्यक्षात एका अप्सरेच्या पोटी जन्माला आलेली क्षत्रिय राजकन्या असे दाखवण्याचा प्रयत्न आहे.  कदाचित प्रत्यक्षात राजा उपरिचर वसु, अद्रिका या एखाद्या यमुना काठच्या धीवर कन्येबरोबर रत  झाला असावा व त्यातून मत्स्यगंधा सत्यवतीचा जन्म झाला असावा.

व्यासमहर्षींचा जन्म 

पराशर मुनी व सत्यवती
तर असे हे पराशर मुनी यमुनेच्या किनाऱ्यावर नाव चालवणाऱ्या या सत्यवती नामक धीवर कन्येवर आसक्त  झाले व त्यांनी तिला नावेतच समागमाची विनंती केली.  त्यावेळी ऋषींना नाही कसे म्हणायचे?  मग तिने त्यांना, दोन्ही किनाऱ्यांवर ऋषी उभे आहेत,  असे दाखवले.  तेव्हा त्यांनी आपल्या तपोबलाने नावेभोवती धुके निर्माण केले.  त्यावर सत्यवतीने माझे कौमार्य नष्ट होईल असे सांगताच, ऋषींनी तिला ती कुमारीच  राहील असा आशिर्वाद दिला व एखादा वर मागण्यास सांगितले.  तेव्हा माझ्या सर्वांगाचा माशांचा वास जावून छान सुगंध येऊ देत असा वर तिने मागितला.  ऋषींनी तिची ही इच्छा देखील पूर्ण केली व तिचे नाव गंधवती अथवा योजनगंधा असे देखील पडले.  त्यानंतर पराशर ऋषींनी तिच्याबरोबर समागम केला व ती गर्भवती झाली. 

कालांतराने यमुनेतील  एका द्वीपावर (बेटावर) ती प्रसूत झाली.  रंगाने कृष्णवर्ण असलेल्या व द्वीपावर जन्मलेल्या मुलाला सर्वजण कृष्णद्वैपायन म्हणून ओळखू लागले.  पुढे या ज्ञानी पुत्राने शाखा भेदाला अनुसरून वेदांचा विस्तार केला म्हणून त्यांना व्यास हे नाव प्राप्त झाले. 

या कथेतील वरदान नक्की काय ?

या कथेतून आपल्याला असे लक्षात येते की तपोबलापेक्षा आसक्ती,  ती देखील क्षणिक कामासक्ती प्रबळ ठरते व पराशरांसारखे ऋषी देखील त्याला सहज भुलतात.  सत्यवतीला त्यांनी दिलेल्या कौमार्य भंग न होण्याचा वर म्हणजे द्विपावरील तिच्या वास्तव्याने तिची प्रसूती कुणाच्याच लक्षात येणार नाही व मी या पुत्राला लगेच घेऊन जाईन असे वचन जे त्यांनी सत्यवतील दिले व ते पाळले देखील. सत्यवती पुन्हा तिचे आयुष्य तिच्या परीने जगायला मोकळी झाली, असाच याचा अर्थ.  बरे, या प्रसूतिकालाच्या महिन्यांमध्ये माशांपासून दूर एका बेटावर राहिल्याने तिला माशांचा गंध पण येणार नाही,  हे वराचे  आणखी एक स्वरूप. 

पुढील महाभारत 

यमुनेच्या काठावर हे सर्व घडत असतानाच तिकडे दूर हस्तिनापुरात मात्र काही वेगळ्याच घटना घडून गेल्या होत्या आणि या घटनांचा व हस्तिनापुरातील त्या घटनांचा एकमेकात मिलाफ होत पुढे महाभारत घडणार होतं. काय होत्या त्या घटना ? ते आपण पुढील लेखापासून पाहू.

Monday, April 12, 2021

महाभारताचे शुद्धीकरण व BORI

प्रक्षिप्त म्हणजे नक्की काय ?

महाभारताचा अभ्यास करायला लागलं कि हळू हळू त्यातील कोडी सुटायला लागतात आणि व्यासांच्या अगाध प्रतिभेचा प्रत्यय येऊ लागतो. व्यासोच्छिष्ट्म जगत सर्वम म्हणजेच या एका महाकाव्यानेच व्यासांनी जगातलं सर्वच उष्ट करून सोडलेलं आहे या उक्तीचा प्रत्यय येतो. आणि मग यदि हास्ति तद्न्यत्र यन्नेहास्ति न तत् क्वचित ( यात जे आहे ते जगात सर्वत्र आहे मात्र यात जे नाही ते जगात कुठेच सापडावयाचे नाही)  हेदेखील समजते. असं काय विशेष आहे यात ? कसं बनले हे इतकं सर्वसमावेशक ?


महाभारत हा इतिहास असल्याचं खुद्द व्यासांनीच सांगून ठेवलंय. हा इतिहास घडला कधी असावा,  हा वेगळ्या संशोधनाचा विषय आहे. व्यासांनी हे महाभारत सर्व प्रथम त्यांच्या सुमंतू , जैमिनी, पैल , शुक (व्यासपुत्र) व वैशंपायन या ५ शिष्याना सांगितले. व्यासांनी सांगितलेला या इतिहासात वेळोवेळी भर पडत गेली व एक अवाढव्य महाकाव्य घडत गेलं.  ही हस्तलिखिते तयार होताना / झाल्यावर, त्याचा प्रसार भारताच्या इतर भागांमध्ये व भाषांमध्ये होत गेला.  त्यातील कथाकाव्य देखील लोकांना भावले व प्रतिभावंतांनी त्यात आपल्या प्रतिभेचे रंग भरले. यात वेळोवेळी वेगवेगळ्या प्रांतांचे , कवींचे , शासकांचे संस्कार घडत गेले व ते इतके बेमालूम होते कि यातील मूळ गाभा कोणता व वर चढवलेला साज कोणता हे समजणं  कठीण होऊन बसलं. हि  अनावश्यक भर म्हणजेच प्रक्षिप्तता.  मूळ संहिता वाढत वाढत लक्ष श्लोकांवर पोहोचली आणि यातील गाभा वेगळा करण्याचं काम शिवधनुष्य पेलण्याएवढं कठीण होऊन बसलं. 

भांडारकर संस्थेची संशोधित प्रत 
संशोधित प्रत (Critical Edition) म्हणजे महाभारताच्या अनेक प्रतींचा अभ्यास करून बनविलेली तौलनिक प्रत.  एक अशी प्रत की जी कालौघात बरीच मागे जाईल व अनेकविध प्रकारांनी महाभारतात पडलेली अनावश्यक भर दूर करेल.  यापूर्वी आपल्याला उपलब्ध असलेली शेवटची सर्व समावेशक प्रत, छत्रपतींच्या शिवरायांना समकालीन असलेल्या सतराव्या शतकातील निळकंठ याची होती.  निळकंठ चतुर्धर या महाराष्ट्रीय संस्कृत पंडिताने भारतातल्या बऱ्याच प्रतींचा अभ्यास करून, स्वतःच्या संस्कृत टिपणांसह ही सर्वसमावेशक प्रत काशी(वाराणशी) येथे  बनविली. 

भांडारकर इन्स्टिट्यूट मे १९२० च्या सुमारास संशोधित प्रत बनविण्याचे काम हाती घेतले. औंध संस्थानाचे श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी त्या काळी या प्रकल्पासाठी सुमारे एक लक्ष रुपयांची मदत केली होती.डॉक्टर विष्णू सुखटणकर १९२५ च्या सुमारास आपली डॉक्टरेट पूर्ण करून भारतात परतले आणि त्यांनी या कामात आपल्याला झोकून दिले.  त्यासाठी त्यांनी भारतभर विखुरलेल्या विविध भाषातील महाभारताच्या प्रतींचा तौलनिक अभ्यास करायचे ठरविले.  यात काही प्रतींमध्ये फक्त काही पर्वेच सापडली (त्यात संपूर्ण अठरा पर्वे नव्हती).  सुखटणकर यांच्या या पद्धतशीर अभ्यासाचा हेतू हा होता की महाभारताची जास्तीत जास्त जुनी प्रत प्रसिद्ध करणे. म्हणजे असे करताना त्यात भरीला घातले गेलेले चमत्कार, रूपके  इत्यादी आपोआपच गळून पडतील.  

महाभारताची विविध हस्तलिखिते केवळ देशाच्या विविध भागातच  नाही तर नेपाळ, जावा अशी भारताबाहेर देखील आढळली.  भांडारकर संस्थेने अशी देशाच्या अनेक भागात  विखुरलेली हस्तलिखिते एकत्र केली. त्यांचा अभ्यास करून जुन्यात जुन्या प्रतीत एखाद्या पर्वात कोणते श्लोक होते व कोणते नव्हते ते पाहिले,  व त्यातून भांडारकर संस्थेची एक प्रत प्रसिद्ध केली. १९४३ च्या सुमारास डॉ सुखटणकरांचे निधन झाले त्यांच्यानंतरही सुमारे २३ वर्षे, त्यांचे सहकारी श्री दांडेकर, श्री बेलवलकर , पा.वा.काणे , गजेंद्रगडकर, व्ही.के.राजवाडे, उटगीरकर  यांनी हे काम सुरु ठेवले व ते १९६६ च्या सुमारास पूर्ण केले. आज अभ्यासकांमध्ये भांडारकर संस्थेची (BORI) हीच प्रत प्रमाण मानली जाते. अशा प्रकारे तयार केलेली ही प्रत आपल्याला इसवी सन १००० च्या सुमारास अस्तित्वात असलेल्या महाभारतीय काव्याच्या जवळ घेऊन जाते. म्हणजेच निळकंठ यांच्याही सुमारे सहाशे ते सातशे वर्षे आधी. पण अर्थातच हि प्रत म्हणजेच खरे महाभारत असे आपल्याला अजूनही म्हणता येत नाही

भृगु सिद्धांत
डॉक्टर सुखटणकर यांना विविध हस्तलिखितांचा अभ्यास करताना असे लक्षात आले की हे काव्य इसवी सनाच्या उत्तर काळात कधीतरी भृगु कुलातील ऋषींच्या हाती गेलेले आहे व त्यांनीच आपल्या कुलाचे महत्त्व वाढविण्याच्या दृष्टीने त्यात बरीच भर घातलेली आहे. त्यामुळेच यात ब्राह्मणी गुणगानाची बरीच भर आढळते. 

महाभारतातील प्रक्षेप मानल्या गेलेल्या काही घटना 
यातील सर्वात सुरुवातीचा प्रक्षेप आहे तो गणेश कथेचा,  ज्यात व्यासांनी सांगितलेले महाभारत काही अटींवर श्रीगणेशाने लिहिले  हा.  व्यासमहर्षीच्या काळात कोणतीही लिपी अस्तित्वात नव्हती व त्यामुळे भर होता तोच स्मृतींवर.   महाभारत कथा शतकानुशतके स्मृतींवर पुढे सरकली व जेव्हा कधी लिपीची निर्मिती झाली त्यावेळी ते हस्तलिखितात उतरवले गेले.  त्यातही संस्कृत केवळ देवनागरी लिपीतच लिहिले गेले असे मानण्याचे काहीच कारण नाही.  कारण देवनागरी लिपी ही साधारणपणे इसवी सन एक हजार च्या आसपास सुस्थितीला पोहोचली असावी असे मानण्यात येते. 

आता आपण अशा काही घटना पाहू कि ज्या खूप प्रसिद्ध आहेत पण भांडारकर प्रतीने त्यांना उत्तरकालीन प्रक्षेप ठरविले आहे. यात मुख्यत्वेकरून 
  • कणिक नावाच्या मंत्र्याने लाक्षागृह प्रसंगी धृतराष्ट्राला सांगितलेली कणिक नीती ,
  • द्रौपदीने स्वयंवराच्या वेळी कर्णाला सूतपुत्र म्हणाल्याचा उल्लेख
  • द्रौपदीला वस्रहरणाच्या वेळी कृष्णाने वस्त्रे पुरविल्याची घटना , 
  • द्रौपदीला सूर्याने थाळी दिली व त्यामुळे दुर्वास तिचे सत्वहरण करू शकले नाहीत हि घटना, 
 या काही घटना येतात. इतर अशा घटना आपण याच ब्लॉगवर पुढे सविस्तर पाहूच. 

सुखटणकरांची पद्धत 
भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिटयूट (BORI) या संस्थेने भारतातील सर्व भाषांतील हस्तलिखिते व मुद्रित प्रति मिळविल्या. यात उत्तरेकडील काश्मीर भागातील शारदा लिपीतील व याच भागातील (काश्मीर व उत्तरेकडील) देवनागरी हस्तलिखितांचा देखील  समावेश होतो. मध्य पूर्वेकडील भागातून (गंगा यमुना प्रदेश) नेपाळी, मैथिली व बंगाली भाषेतील प्रतीचा एक वेगळा गट तयार केला . दक्षिणेकडील तेलगू + ग्रंथ लिपीतील हस्तलिखिते व मल्याळम हस्तलिखिते हि दक्षिण गटात मोडतात. सुखटणकरांनी केलेली वर्गवारी सोबतच्या तक्त्यात दाखविली आहे. हि वर्गवारी ग्रीक अक्षरांनी दर्शविली जाते. 

(१) अशी १२ लिप्यांमधील सुमारे १२५९ हस्तलिखिते त्यांनी जमविली पण प्रत्यक्षात अभ्यासाअंती केवळ ७३४ हस्तलिखितं वापरता आली. 
(२) यात एकाच पर्वाच्या पूर्णपणे वेगळ्या आवृत्त्यांमध्ये त्याचा अंतर्भाव असेल तर तो श्लोक संशोधित आवृत्तीत घेतला गेला. 
(३) काही न पटणाऱ्या (चमत्कार, वर, शापांशी निगडित असूनदेखील) गोष्टी जर सर्व मूळ आवृत्त्यांमध्ये सापडत असतील आत त्या संशोधित आवृत्तीत देखील राखल्या गेल्या. यात पांडूच्या निधनानंतरच्या वर्णनाचे उदाहरण देता येईल. यात त्याचे वनात दहन केले असे उल्लेख आहेत व त्याचबरोबर पांडू व माद्रीचे शव हस्तिनापुरात आणून तेथे दहनसंस्कार झाले असेही उल्लेख आढळतात व हे दोन्हीही परस्परविरोधी उल्लेख संशोधित आवृत्तीत ठेवले गेलेले आहेत. 
(४) जेव्हा आवृत्त्यांमध्ये वर्णनाचे फरक आढळले तेव्हा जास्तीत जास्त आवृत्त्यांमध्ये आढळले गेलेले वर्णन संशोधित आवृत्तीत ठेवले गेले. 
(५) वर्णनाची भर असलेले श्लोक, समागमाचे वर्णन वगळण्यासाठी तयार केलेले पर्यायी श्लोक यांचा योग्य तो विचार करून त्यातील मुख्य तथ्यांश शोधून तो संशोधित आवृत्तीत राखला गेला. 

काश्मीरमधील शारदा लिपीतील भूर्जपत्रांवरील हस्तलिखितांचा या कमी बराच उपयोग झाला.य. मुख्य म्हणजे यातील एका श्लोकात आदिपर्वातील श्लोकसंख्येचे वर्णन करणारा एक श्लोक आढळला ज्यातील श्लोकसंख्या (७९८४) संशोधित आवृत्तीने काढलेल्या श्लोकसंख्येशी तंतोतंत जुळली , तो श्लोक असा 

सप्त श्लोकसहस्त्राणि तथा नव शतानिच  ।
श्लोकाश्च चतुराशीति ग्रंथो दृब्द्धो  महात्मना ।।

यातील फक्त आदिपर्वातील एकूण श्लोकसंख्या ७९८४ एवढी सांगितली आहे तर निळकंठ प्रतीत ती ८८८४, कुंभकोणम (दक्षिण) प्रतीत १०८८९ एवढी होती. 

या सर्व अभ्यासासाठी BORI ला क्षेमेंद्र च्या भारतमंजिरी, देवबोध यांच्या ज्ञानदीपिका , अर्जुनमिश्र यांच्या भारतसंग्रहदीपिका , निळकंठ यांच्या भावार्थदीपिका, तसेच विमलबोध व सर्वज्ञ नारायण यांच्या ग्रंथ टिपांचाही बराच उपयोग झाला. 

BORI चे हे कार्य खरोखरच अवजड शिवधनुष्य पेलणारे महान कार्य होते व ते वर उल्लेखलेल्या संशोधकांबरोबरच तर अनेक संशोधकांनी ४ दशकांहून अधिक काळ अपार परिश्रम घेत पार पाडले. 

Friday, April 02, 2021

जनमेजयाचे सर्पसत्र कि नाग वंशियांचे हत्याकांड ?

जनमेजयाचे सर्पसत्र - राजा रविवर्मा - इंटरनेट वरून साभार
महाभारत कथेत पडलेली भर अभ्यासायची असेल तर सुरुवातीपासूनच ते चिकित्सकपणे अभ्यासायला हवे. त्यातील रूपके , उपकथानके यांची त्यात भर पडत गेली, हे आपल्याला थोड्याश्या चिकित्सक नजरेने पाहताच लक्षात येते.   यासाठी आपण महाभारताच्या सुरुवातीचे कथानक पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल कि या सर्पसत्रात सांगितले गेलेले महाभारताचे कथानक हा कदाचित असाच विध्वंस पुन्हा टाळण्यासाठी केलेला उपदेश असावा . कसे , ते आपण आता पाहू . 

महाभारताची सुरुवात होते ती राजा जनमेजयाच्या सर्प सत्राच्या कथेपासून. येथे व्यासांच्या उपस्थितीत (यासाठी व्यासांचे वय १५० वर्षांपेक्षा जास्त असायला हवे) व्यासशिष्य वैशंपायनाने महाभारत श्रोत्यांना ऐकविले. या सर्पसत्राचे कारण होते राजा परिक्षिताचा सर्पदंशाने झालेला मृत्यू.

राजा परीक्षित शमीक ऋषींवर सर्प टाकताना (इंटरनेट वरून साभार)
महाभारतीय कथेनुसार , युधिष्ठिरानंतर राज्यावर आलेला अभिमन्यूपुत्र परिक्षित बरीच वर्षे (त्याच्या वयाच्या ६० वर्षांपर्यंत?) रा
ज्य करतो. एकदा तो वनात शिकारीला गेलेला असताना एका मृगाला बाण मारतो. जखमी अवस्थेत तो मृग जंगलात निसटतो व त्याचा पाठलाग करीत परीक्षित दाट जंगलात  शिरतो. अरण्यात पुढे गेल्यावर त्याला एक ऋषी ध्यानस्थ असलेले दिसतात. त्यांना (शमीक ऋषींना) भूक व तहानेने व्याकुळ झालेला राजा, तो मृग कोणत्या दिशेनं गेला ते विचारतो पण त्यांचे मौनव्रत असल्याने त्याला काहीच उत्तर मिळत नाही. म्हणून राजा परिक्षित चिडून शेजारी मरून पडलेला एक सर्प बाणाच्या टोकाने उचलून ऋषींच्या अंगावर टाकतो व निघून जातो. शमीक ऋषींना त्याचे काहीच वाटत नाही पण त्यांचा पुत्र शृंगी याला ती बातमी कळल्यावर तो संतापाच्या भारत राजा परिक्षिताला, तू ७ दिवसात सर्पदंशाने मृत्यू पावशील, असा शाप देतो. 

शृंगी जेव्हा आपण दिलेल्या शापाबद्दल आपल्या पित्याला, शमीक ऋषींना, सांगतो तेव्हा ते राजा परीक्षिताचे गुणगान करतात. असा शाप अनाठायी दिल्याबद्दल ते शृंगीला बोल लावतात व आपला एक शिष्य गौरमुख याला हि बातमी कळविण्यासाठी राजा परीक्षिताकडे पाठवितात. 

उंच मनोऱ्यावर परीक्षित - मुघलकालीन चित्र (इंटरनेटवरून साभार)
राजा परीक्षित या बातमीने हादरून जातो व आपला मृत्यू टाळण्यासाठी स्वतःला एका मनोऱ्यात बंदिस्त करून घेतो. शेवटच्या, सातव्या दिवशी, आता कुणी येत नाही या विचाराने तो निर्धास्त झालेला असताना, तक्षक एका सफरचंदातील अळीद्वारे राजमहालात प्रवेश करतो आणि राजाला दंश करतो.. 

परीक्षिताच्या मृत्यूनंतर अल्पवयीन जनमेजय राजा बनतो. यथावकाश काशीराज सुवर्णवर्मा याची कन्या वपुष्टमा हिच्याशी त्याचा विवाह होतो व तो सुखाने राज्यकारभार करू लागतो. 

त्यानंतर काही वर्षांनी राजा जनमेजय आपल्या पित्याच्या मृत्यूबद्दल आपल्या अमात्यांकडे चौकशी करतो आणि त्याला सर्व घटनाक्रम कळतो. तक्षकाच्या दंशाने आपल्या पित्याचा मृत्यू झाला हे कळताच संतापाने तो सर्व सर्प जातीलाच नष्ट करायचे ठरवतो व त्यासाठी सर्पसत्र आयोजित करतो. या सर्पसत्रात बरेच सर्प मृत्युमुखी पडतात व शेवटी तक्षकाची पाळी येते तेव्हा तक्षक इंद्राच्या पाठी लपतो. यावर “इंद्राय स्वाहा , तक्षकाय स्वाहा “ अशी दोघांचीही आहुती देण्याच्या क्षणी,  जरत्कारु नावाच्या ऋषींचा, जरत्कारु नावाच्याच पत्नीपासून  (हि वासुकी नागाची भगिनी म्हणजेच नाग कुळातील स्त्री) झालेला पुत्र, आस्तिक, जनमेजय राजाला प्रसन्न करून हे सर्पसत्र थांबविण्याचा वर मागून घेतो आणि तक्षकाचा नाश थांबवितो.

सर्प सत्राचा अर्थ 
लौकिक पातळीवर या साऱ्या घटनेचा अर्थ आपल्याला कसा लावता येईल ते आपण पाहू. या कथेत आपल्याला दिसते ते सुमारे ४ पिढ्या चालत आलेले पांडव-नाग कुळांचे वैर, ज्याची सुरुवात होते, कृष्णार्जुनांच्या खांडववन दहनापासून. या दहनात अनेक नाग कुळे नष्ट झाली पण तक्षक नाग (हे तेथील नाग कुल प्रमुखाचे नाव असावे ) मात्र त्यावेळी खांडव वनात नसल्याने बचावला व नाग कुळाचे पांडवांशी वैर जडले. 

परीक्षित शिकारीसाठी रानात गेल्यावर त्याने मृग नव्हे तर, या नागकुळातील कुणाचा तरी रानात पाठलाग केला असेल अथवा  हत्या केली असेल. त्यामुळेच त्या कुलप्रमुखाने परीक्षिताचीच हत्या करायची प्रतिज्ञा (हा शृंगी ऋषींचा शाप म्हणून दर्शवला गेला) केली व ती अमलात आणण्यासाठी विषारी सफरचंद अथवा प्रत्यक्ष विषारी सर्पाचा उपयोग केला असावा. परीक्षिताचा मृत्यू हि हत्याच आहे व ती नाग वंशियांनी घडवून आणली  हे काही वर्षांनंतर मोठा झालेल्या व राज्यशकट हाकणाऱ्या जनमेजयाला समजले व म्हणूनच त्याने नाग जमातीला समूळ नष्ट करायचे ठरविले व त्यांच्या विरुद्ध मोहीम उघडली. यात त्याने बऱ्याच नाग कुळांचा निर्वंश करण्याचा सपाटा लावला. यात वासुकी, ऐरावत, कौरव्य, तक्षक, धृतराष्ट्र  अशा विविध नाग कुळातील असंख्य नाग मृत्युमुखी पडले. याला घाबरून तक्षक नाग उत्तरेकडे पळाला व तो इंद्राच्या आश्रयासाठी देवलोकी गेला. हा देवलोकाचा भाग हिमालयाच्या पलीकडे किंवा काश्मीरच्या उत्तरेकडे असावा, व म्हणूनच राजा जनमेजयदेखील त्याच्या पाठी उत्तरेकडे म्हणजे तक्षशिला जवळच्या प्रांतात तळ देऊन होता. यावेळी या महाभारत कथा सांगणाऱ्या वैशंपायन यांचा उद्देश, या वैराची परिणती महाभारतीय युद्धासारखे युद्ध पुन्हा घडून येऊ नये, हा असावा. अशा प्रकारच्या युद्धाने अपरिमित हानी होऊ शकते आणि हेच याच्या ३ पिढ्या आधी घडून आलेले आहे हे जनमेजयाला अवगत करून दिले आणि आस्तिकाने देखील जनमेजयाला प्रसन्न करत हा नागसंहार थांबवला. 

कोणत्याही यज्ञात अशा प्रकारे विविध ठिकाणाहून सर्प येऊन पडणे शक्य नाही व नाग जमातीचा मात्र प्रचंड प्रमाणात संहार राजा जनमेजयाने घडवून आणला हे स्पष्ट करण्यासाठी रचलेल्या कथांमध्ये, महाभारतातील या घटनांचे वर्णन करताना त्यात नंतर अनेक रूपक कथा / उपकथा यात जोडल्या गेल्या. एका पिढीजात वैराला चमत्कारांचे व वर-शाप कथांचे स्वरूप देऊन या साऱ्यांचे एक वेगळेच स्वरूप आपल्या समोर उभे केले गेले. हस्ते परहस्ते पुढील पिढीकडे मौखिक स्वरूपात जाणाऱ्या महाभारताचा प्रचंड विस्तार आपण या पातळीवर हळू हळू उलगडू शकतो.