ज्य करतो. एकदा तो वनात शिकारीला गेलेला असताना एका मृगाला बाण मारतो. जखमी अवस्थेत तो मृग जंगलात निसटतो व त्याचा पाठलाग करीत परीक्षित दाट जंगलात शिरतो. अरण्यात पुढे गेल्यावर त्याला एक ऋषी ध्यानस्थ असलेले दिसतात. त्यांना (शमीक ऋषींना) भूक व तहानेने व्याकुळ झालेला राजा, तो मृग कोणत्या दिशेनं गेला ते विचारतो पण त्यांचे मौनव्रत असल्याने त्याला काहीच उत्तर मिळत नाही. म्हणून राजा परिक्षित चिडून शेजारी मरून पडलेला एक सर्प बाणाच्या टोकाने उचलून ऋषींच्या अंगावर टाकतो व निघून जातो. शमीक ऋषींना त्याचे काहीच वाटत नाही पण त्यांचा पुत्र शृंगी याला ती बातमी कळल्यावर तो संतापाच्या भारत राजा परिक्षिताला, तू ७ दिवसात सर्पदंशाने मृत्यू पावशील, असा शाप देतो.
शृंगी जेव्हा आपण दिलेल्या शापाबद्दल आपल्या पित्याला, शमीक ऋषींना, सांगतो तेव्हा ते राजा परीक्षिताचे गुणगान करतात. असा शाप अनाठायी दिल्याबद्दल ते शृंगीला बोल लावतात व आपला एक शिष्य गौरमुख याला हि बातमी कळविण्यासाठी राजा परीक्षिताकडे पाठवितात.
राजा परीक्षित या बातमीने हादरून जातो व आपला मृत्यू टाळण्यासाठी स्वतःला एका मनोऱ्यात बंदिस्त करून घेतो. शेवटच्या, सातव्या दिवशी, आता कुणी येत नाही या विचाराने तो निर्धास्त झालेला असताना, तक्षक एका सफरचंदातील अळीद्वारे राजमहालात प्रवेश करतो आणि राजाला दंश करतो..परीक्षिताच्या मृत्यूनंतर अल्पवयीन जनमेजय राजा बनतो. यथावकाश काशीराज सुवर्णवर्मा याची कन्या वपुष्टमा हिच्याशी त्याचा विवाह होतो व तो सुखाने राज्यकारभार करू लागतो.
त्यानंतर काही वर्षांनी राजा जनमेजय आपल्या पित्याच्या मृत्यूबद्दल आपल्या अमात्यांकडे चौकशी करतो आणि त्याला सर्व घटनाक्रम कळतो. तक्षकाच्या दंशाने आपल्या पित्याचा मृत्यू झाला हे कळताच संतापाने तो सर्व सर्प जातीलाच नष्ट करायचे ठरवतो व त्यासाठी सर्पसत्र आयोजित करतो. या सर्पसत्रात बरेच सर्प मृत्युमुखी पडतात व शेवटी तक्षकाची पाळी येते तेव्हा तक्षक इंद्राच्या पाठी लपतो. यावर “इंद्राय स्वाहा , तक्षकाय स्वाहा “ अशी दोघांचीही आहुती देण्याच्या क्षणी, जरत्कारु नावाच्या ऋषींचा, जरत्कारु नावाच्याच पत्नीपासून (हि वासुकी नागाची भगिनी म्हणजेच नाग कुळातील स्त्री) झालेला पुत्र, आस्तिक, जनमेजय राजाला प्रसन्न करून हे सर्पसत्र थांबविण्याचा वर मागून घेतो आणि तक्षकाचा नाश थांबवितो.






