महाभारतातील अतर्क्य व चमत्कृतीपूर्ण घटनांचे मानवीय विश्लेषण

Monday, July 19, 2021

कुरुंचे वंशज कि व्यासपुत्र ?


हस्तिनापुरात विचित्रविर्याचा मृत्यू झाल्यावर सत्यवती वर मात्र आभाळ कोसळलं.  विचित्रवीर्य देखील अपत्यहीन मृत्यू पावल्याने आता हस्तिनापूरच्या गादीला वारस उरला नव्हता, व त्यामुळेच आता ज्या राज्याच्या मोहाने सत्यवतीने भीष्मप्रतिज्ञा घडवून आणली होती, तेच राज्य निर्वंश होण्याचा धोका निर्माण झाला.  व ते टाळण्यासाठी सत्यवतीने भीष्मालाच  आपलं ब्रह्मचर्य व्रत मोडण्याची विनंती केली. 

ही विनंती भीष्मांनी अर्थातच अमान्य केली.  यात महाभारतकार भीष्मांच्या वयाचा विचार मात्र मुळीच मध्ये आणत नाहीत.  ते केवळ आपल्यासमोर मांडतात ते सुमारे ८० वर्षे वयाच्या भीष्मांचा प्रतिज्ञा पालनाचा निग्रह. 

 भीष्मांनी मग आपल्या मातेला यातून एक मार्ग सुचविला व तो म्हणजे एखादा सुयोग्य ब्राह्मण बघून अंबिका व अंबालिकांशी  नियोग घडवून आणण्याचा.  तत्कालीन समाजामध्ये, काही विशिष्ट परिस्थितीमध्ये, संततीप्राप्तीचा नियोग हा सर्वमान्य व धर्ममान्य मार्ग होता.  यावर सत्यवतीने देखील आपल्या पुत्राला, भीष्माला, आपल्या विवाहपूर्व पराशर ऋषींसोबतच्या  संबंधांची व त्यातून जन्मलेल्या कृष्णद्वैपायन या कानीन पुत्राची  गोष्ट सांगितली,  तेव्हा ही भीष्मांना यात काही वावगे असल्याचे जाणवले नाही.  याउलट कनिष्ठ भ्राता व अधिकारी ब्राह्मण या न्यायाने व्यासांना नियोगासाठी पाचारण करणे योग्य ठरेल, असा निर्वाळा देखील भीष्मानी सत्यवतीला दिला. 

सत्यवतीच्या क्षत्रियकुलीन असण्याचे महत्व 

या ठिकाणी महाभारतकारांनी सत्यवतीला क्षत्रिय कुलीन ठरविण्याचे महत्त्व पुन्हा एकदा आपल्या लक्षात येते.  ती जर हीन कुलीन ठरवली गेली असती तर, पिता  ब्राह्मण (पराशर) व हीन कुलीन माता सत्यवती यांची संतती असलेले कृष्णद्वैपायन देखील हीन कुलीन ठरले असते.  महाभारतकारानी सत्यवती हि  राजा उपरिचर वसूची क्षत्रिय कन्या असल्याची कथा अगदी जाणीवपूर्वक रचल्याचे यावरून आपल्या लक्षात येते. 

भीष्मांचे  मत विचारात घेत व नियोगासाठी व्यासांना पाचारण करण्यासाठी भीष्मांची  संमती मिळवली सत्यवतीने  सुनांद्वारे नियोग पद्धतीने राज्याचा वारस मिळविण्याचे ठरविले खरे,  पण यासाठी तिने आपल्या सुनांची,  अंबिका अथवा अंबालिकेची  संमती मात्र गृहीत धरली होती. सुरुवातीला या प्रकारे परपुरुषाकडून संतती निर्मितीला त्या तयारच नव्हत्या.  पण सत्यवतीच्या हट्टापुढे त्यांचे काही चालले नाही व त्या नाईलाजास्तव राजी झाल्या.  सत्यवतीने व्यासांना पाचारण केले (व ते प्रकट झाले असे महाभारत सांगते).  ते हजर होताच  सत्यवतीने त्यांना बोलावण्याचे प्रयोजन सांगितले.  तेव्हा त्यांनाही काहीसा धक्का बसला व आपल्याला व तसेच सत्यवतीच्या सुनेला देखील मानसिक व शारीरिक तयारी करण्याकरता एक वर्षाचा कालावधी लागेल असे त्यांनी सांगितले. पण सत्यवती एवढा काळ वाट पाहायला तयार नव्हती. अशा प्रकारे विना-वारस वेळ घालविल्यास प्रजेत अराजक माजेल,  राज्य निर्नायकी  राहिल,  या कारणास्तव एवढा वेळ थांबण्यास तिने व्यासांना नकार दर्शविला. लगेचच नियोग विधीची रीतसर घोषणा करण्यात आली. 

व्यासांचे उग्र रूप 

अंबिकेची समागमाची मानसिक तयारीच नव्हती. तिला नक्की कुणाशी समागम करायचा आहे याची देखील कल्पना नव्हती. तिचा दीरच समागमासाठी येईल असे सांगण्यात आले तेव्हा तिच्या मनात भीष्मांची  प्रतिमा होती,  पण प्रत्यक्षात  पलंगावर तयार असणाऱ्या अंबिकेच्या समोर उभे राहिले ते, कृष्ण वर्णाचे, पिंगट जटांचे, तारट डोळ्यांचे, पिंगट दाढी-मिशांचे व बेढब अंगाचे,  व्यास (होय,  व्यासांचे असेच वर्णन महाभारतकारांनी म्हणजे खुद्द व्यासांनीच करून ठेवले आहे).  आणि या अशा अवताराला घाबरून अंबिकेने आपले डोळे घट्ट मिटून घेतले व ती केवळ शरीराने त्या प्रक्रियेला सामोरे गेली.  अंबिकेच्या पुत्राचे धृतराष्ट्राचे अंधत्व, हा याच घट्ट डोळे मिटुन घेण्याचा परिणाम होता,  असे व्यासांनी सत्यवतीला लगेचच सांगितल्याचे महाभारतकार आपल्याला सांगतात. 

यानंतर लगेचच व्यास तिथून निघून गेले.  यथावकाश अंबिकेला जो पुत्र झाला तो जन्मांध निपजला.  तो म्हणजेच धृतराष्ट्र.  त्याच्या अंधत्वामुळे भविष्यात त्याला राज्यकारभार करता येणार नाही म्हणून, सत्यवतीने पुन्हा एकदा व्यासांना पाचारण केले.  यावेळी अंबालिकेची  पाळी होती.  अंबिकेचा अनुभव गाठीशी होताच,  पण अंबालिका देखील व्यासांना पाहताच भीतीने पांढरीफटक पडली.  त्यामुळे तिच्याशी समागम केल्यानंतर होणारा पुत्र पांडूवर्णी होईल, असे व्यासांनी सांगितले.  अंबालिकेला दिवस भरताच  खरोखरीच तिला एक पांडूवर्णी (त्वचेचा रंग  असणारा)  पुत्र झाला असे महाभारतकारानी नोंदविले.  हाच पांडू याच  नावाने प्रख्यात झाला. 

 या दोन्ही कुमारांमध्ये व्यंग असल्यामुळे सत्यवतीने  पुन्हा एकदा व्यासांना आवाहन / पाचारण केले व अंबिकेला तयार राहण्यास सांगितले.  पण सुमारे दीड-दोन वर्षांपूर्वीचा भीतीप्रद अनुभव गाठीशी असल्याने तिने सत्यवतीला जरी होकार दिला तरी प्रत्यक्ष समागमासाठी आपल्या एका दासीला अलंकारिक वस्त्रे घालून पाठविले.  त्या सुंदर दासीने आपले कर्तव्य मनोभावे पार पाडले. कदाचित पहिले दोन राजपुत्र मानले गेलेले व्यासपुत्र सव्यंग जन्मले व आपला पुत्र  जर अव्यंग जन्मला तर कदाचित पुढेही त्याला राज्यकारभारात महत्त्वाचा वाटा मिळू शकेल या भावनेने देखील असावे.  कारण काहीही असो,  पण व्यास तृप्त झाले. आपली आपल्या सुनेकडून फसवणूक झाली हे सत्यवतीच्या  लक्षात आले. व्यास मात्र एका अव्यंग पुत्राचे दान एका दासीच्या झोळीत टाकून गेले.  पुढे दिवस भरल्यावर तिला जो पुत्र झाला तो होता महात्मा विदूर.  अर्थातच दासीपुत्र असल्याने त्याला तत्कालिन प्रथेप्रमाणे राजपद काही मिळू शकणार नव्हते.  

 व्यासांचा महाभारतात वेळोवेळी हस्तक्षेप 

 या सर्व कथाभागात आपल्या लक्षात काही गोष्टी येतात त्या म्हणजे,  अंबिकेचा पुत्र अंध उपजला हे त्याच्या जन्मानंतरच  लक्षात आले.  पण तो तसाच निपजणार हे व्यासांकडून वदविणे म्हणजे व्यासांना भविष्यकाळाचे ज्ञान होते असे दर्शविणे होय.  तसे खरेच असते तर अंबालिकेकडून पुत्र प्राप्ती करून घेण्यासाठी, धृतराष्ट्र जन्माची वाट पाहण्याची आवश्यकता नव्हती.  व वाट पाहायची होती तर आधी व्यासांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनाही व्यवस्थित नीटनेटक्या  रुपात स्वतःला अंबालिकेसमोर येता आले असते व तिचा पुत्र मग पांडूवर्णीय न निपजता.  

 हीच गोष्ट तिसऱ्या वेळेची.  पण त्याही वेळी ते एखाद्या राजकन्येला घृणा येईल अशा अवतारात होते.  व त्याचमुळे राज्याचा उत्तराधिकार पणाला लागला असल्याचे ठाऊक असून देखील,  अंबिकेने स्वतः न  जाता दासीला त्यांच्याकडे पाठविणे  पसंत केले.  म्हणजे वर्षभराच्या अंतराने जन्माला आलेल्या धृतराष्ट्र व पांडू यांच्या जन्मासंबंधी महाभारतकारांनी आपल्याला व्यासमुखातून  सांगितलेले भाकीत म्हणजे नंतरच्या काळात घुसविलेला प्रक्षेप असावा असे वाटते. 

 पण इथून पुढे सुरु होते ती कहाणी केवळ कुरु वंशाचीच नसून व्यासांच्या पुत्रांचीही असल्याने महाभारत कथेमध्ये वेळोवेळी होत असणारा व्यासांचा हस्तक्षेप हा केवळ महाभारतकार असा नसून तो एक पिता व पितामह असा देखील असल्याचे आपल्या लक्षात येईल. 

_________________________________________________________________________________
संदर्भ : प्रचलित आवृत्ती अध्याय १०५ व १०६, चिकित्सक आवृत्ती - अध्याय १००

Wednesday, June 30, 2021

अंबा - शिखंडी : बादरायण संबंध

 अंबेचा सूडाग्नी 

भीष्मांच्या परवानगीने मोठ्या आनंदाने अंबा आपल्या प्रियकराकडे, सौभराज शाल्वाकडे निघाली.  तिला सोबत करण्याकरता भीष्मांनी वृद्ध ब्राह्मण, पुरोहित व काही दासी सोबत दिल्या होत्या. पण शाल्वाकडे  पोहोचताच मात्र तिचा भ्रमनिरास झाला.  भीष्माने स्वयंवरात सर्व क्षत्रियांचा पराभव करून जिंकलेल्या आंबेला स्वीकारायला शाल्वाने स्पष्ट नकार दिला व तिला तेथून निघून जाण्यास सांगितले. 

अतिशय दुःखद मनाने अंबा तेथून निघाली व नगरा बाहेरील वनात एका ऋषी समूहांच्या आश्रमात गेली.  दोष नक्की कुणाचा हेच न समजल्याने, तिने प्रथम भीष्माला वेळीच शाल्वावरचे  आपले प्रेम न सांगितल्याने स्वतःला दोष दिला,  नंतर आपले स्वयंवर मांडले म्हणून पित्याला  दोष दिला,  त्या स्वयंवरातून आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याला पळवून नेल्या बद्दल भीष्माला दोष दिला व नंतर आपल्याला झिडकारल्याबद्दल शाल्वाला दोष दिला.  आपली कर्मकहाणी तिने सर्व आश्रमवासीयांना सांगितली व आपल्याला तेथेच आश्रय द्यायची तिने विनंती केली.  तेव्हा ही तरुण मुलगी इथे  कशी सुरक्षित ठेवावी व पुढे नक्की काय करावे या चिंतेने आश्रमवासीयांना देखील ग्रासले.  आंबे च्या मनातील दुःखाची जागा हळूहळू संताप व सूडाच्या भावनेने घेतली व आपल्याला पळवून नेणाऱ्या भीष्मा विरुद्धच ही सुडाची भावना प्रबळ होऊ लागली.  पण.......  सूड घ्यायचा कसा?

अंबेचे भीष्मवधासाठी परशुरामांना साकडे 

भीष्माने अंबेचे हरण केले त्यावेळी स्वयंवरात या तीनही कन्या भीष्मांसमोरून वरमाला घेऊन गेल्या होत्या व वृद्ध असल्याने त्यांनी त्याला वरमाला घातली नव्हती.  तसेच इतर राजांनीही भीष्माची वृद्ध म्हणून हेटाळणी केली होती.  असे असताना देखील या तीनही कन्यांनी व विशेषत शाल्वावर प्रेम असणाऱ्या अंबेने भीष्मांना त्याच वेळी हे सांगण्याचे धाडस केले नव्हते.  कदाचित प्रथम तिला शाल्वाच्या पराक्रमावर भरवसा असावा, व नंतर भीष्माच्या क्रोधाची भीती वाटली असावी हस्तिनापूरला पोचल्यावर देखील अंबेने विचित्रवीर्याशी विवाह निश्चित होईपर्यंत वाट पाहिली व नंतरच अखेरच्या क्षणी धाडस करून भीष्माला शाल्वावरील प्रेमाची हकिकत सांगितली. त्यामुळे भीष्म,  दुसऱ्या कुणावर तरी प्रेम करणाऱ्या मुलीचे विचित्रवीर्याशी लग्न लावणार नाही हे देखील निश्चित होते.  बरं, भीष्माची लढण्यास सांगणार तरी कुणाला?  नुकताच एकट्या भीष्माने स्वयंवर मंडपात सर्व क्षत्रिय राजांचा केलेला पराभव तिने पाहिला होता.  त्यामुळे ती अधिकाधिक बेचैन होऊन संतापत होती.  ती त्या आश्रमातील ऋषीमुनींचा उपदेशही ऐकत नव्हती व तेथून निघून ही जात नव्हती.  अशा विचित्र परिस्थितीत ते आश्रमवासी असताना राजा होत्रवाहन त्या आश्रमात येऊन पोहोचला.  तेथील चर्चेवरून त्याला या कन्येची,  अंबे ची व्यथा कळली.  आणि तीच आपल्या मुलीची मुलगी,  म्हणजेच आपली नात असल्याचे त्याच्या लक्षात आले.  त्याने तिचे सांत्वन करीत धीर दिला.  राजा होत्रवाहन परशुरामांचा निकटवर्ती होता.  व त्यामुळे परशुरामाचा शिष्य असलेल्या भीष्मांचा बंदोबस्त तो परशुरामाकडून करून घेईल अशी ग्वाही त्यांनी दिली.  ते ऐकताच अंबेच्या सूडाच्या आशा पल्लवित झाल्या. 

याच सुमारास परशुरामांचा अजून एक जवळचा शिष्य अकृतव्रण त्या आश्रमात येऊन पोहोचला. राजा होत्रवाहन व आश्रम वासियांनी त्याचा आदर सत्कार करत परशुरामाद्वारे अंबेला  न्याय मिळवून देण्याची विनंती अकृतव्रणाकडे केली.  परशुराम लवकरच आश्रमात येणार असून ते  निश्चितच अंबेला  न्याय देतील असे आश्वासन त्याने  दिले. 

पाठोपाठ परशुराम देखील त्या आश्रमात येऊन पोहोचले होत्रवाहन व अकृतव्रण या आपल्या निकटवर्तीयांकडून त्यांना अंबेची  कर्मकहाणी कळली. भीष्म  आणि शाल्व हे दोघेही आपले शिष्य असल्याने आपले ऐकतील या विश्वासाने त्यांनी अंबेला  नक्की काय हवे त्याची निवड करण्यास सांगितले.  यावेळी अंबेने भीष्माचा सूड हवा,  असा आपला निर्णय जाहीर केला.  तिला युद्ध हवे हे लक्षात येताच परशुरामांनी आपण सध्या धनुष्य खाली ठेवले असल्याचे तिला सांगितले.  पण लगेचच अकृतव्रणाने  त्यांना त्यांच्या “सर्व क्षत्रिय समुदायाला जो जिंकेल त्याला ठार मारण्यासाठी मी शस्त्र हाती घेईन” या प्रतिज्ञेची आठवण करून दिली व परशुरामाला भीष्माला निरोप पाठवणे भाग पडले.  भीष्म तेथे पोहोचताच परशुरामांनी भीष्माला तोच सर्व अंबा प्रकरणाचे मूळ असल्याचे सांगत अंबेला स्वीकारण्याची आज्ञा केली.  यावर प्रतिज्ञाबद्ध भीष्माने शाल्वासारख्या परपुरुषावर मन जडलेल्या कन्येला मी माझ्या बंधू साठी पण स्वीकारणार नाही असे ठामपणे सांगितले. दोघेही आपापल्या भूमिकांवर अडून बसल्याने आता युद्ध प्रसंगाला तोंड फुटणार हे निश्चित झाले. 

भीष्म - परशुराम युद्ध 

भीष्म परशुराम युद्ध थांबविताना देवर्षी नारद

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे हे युद्ध कुरुक्षेत्रावर सुरू झाले.  आपल्या शिष्याचा,भीष्माचा, आपण सहज पराभव करू शकू हा परशुरामांचा भ्रम भीष्माने आपल्या युद्ध कौशल्याने दूर केला.  तब्बल 23 दिवस हे युद्ध सुरू राहिले.  अखेरच्या दिवशी तर जेव्हा आपल्या प्रस्वाप अस्त्राने भीष्म परशुरामाचा वध करेल अशी परिस्थिती निर्माण झाली,  तेव्हा नारदाने मध्ये पडून हे युद्ध थांबवले. परशुरामांनी आपला पराभव मान्य केला.  याचबरोबर अंबेची  उरलीसुरली आशा देखील संपुष्टात आली आणि अंबा आणखीनच पिसाळली.  तिने आसुरी तपश्चर्येचा मार्ग अवलंबिला.  वायू भक्षण करीत,  पाण्यात उभे राहून,  असे विविध तपांचे मार्ग तिने अनुसरले.  पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही तेव्हा सुमारे बारा वर्षांनी ती तीर्थयात्रेला निघाली.  यातच तिची भेट भीष्माची माता गंगा हिच्याशी देखील घडली आणि तिनेही अंबेला शांत करण्याचा निष्फळ प्रयत्न केला.  आता हळूहळू “मी कुणाच्यातरी मदतीने मी भीष्मांचा वध करेन”,   या ऐवजी “मी स्वतः भीष्माचा वध  करायला हवा” अशी धारणा घेऊन ती तप करायला लागली आणि यातच शंकरांनी तिला “तू भीष्माचा रणात वध करशील” असा वर दिला. वरप्राप्ती  होताच अंबा लगेच हुरळून गेली नाही.  तिने आपल्या स्त्रीत्वाची जाणीव शंकरांना करून दिली.  तेव्हा शंकराने तिला पुरुषत्वाची प्राप्ती होईल व त्या देहात देखील तुला या सर्व गोष्टींचे स्मरण राहील असा देखील वर दिला.  असा वर मिळाल्यावर मात्र अंबेने मुळीच वेळ दवडला नाही आणि सर्वांसमक्ष रानातून लाकडे आणून,  चिता रचून प्रज्वलित करत भीष्म वधासाठी अग्री समर्पण केले आणि एक सूडाग्नी काही कालावधीसाठी शांत झाला. कारण महाभारतकारांच्या म्हणण्यानुसार हीच अंबा पुढे द्रुपदाच्या घरी शिखंडी म्हणून जन्म घेणार होती. 

इकडे हस्तिनापुरात..... 

या सर्व कालावधीत हस्तिनापुरात काय घडत होतं अंबेच्या बहिणींचा, अंबिका व अंबालिका यांचा विवाह विचित्रवीर्याशी  होऊन, त्या पुढील सात वर्षात त्याचा मृत्यूही झाला होता.  सत्यवतीने व भीष्मांनी पुढाकार घेऊन घडवून आणलेल्या नियोगाने त्यांना धृतराष्ट्र व पांडू हे पुत्रही झालेले होते.  अंबेच्या तपाची पहिली बारा वर्षे पूर्ण होईपर्यंत ही मुले चार-पाच वर्षांची झाली होती.  त्यानंतरच्या,  अंबेची तीर्थयात्रा, पुन्हा कठोर तपाचरण व त्यानंतरचे शंकराचे वरदान या कालावधीत ते कुमारवयीन झाले होते.  

अंबा - शिखंडी बादरायण संबंध 

महाभारतकारांनी अंबेची  रचलेली कहाणी बराच काळ लांबविली आहे ते द्रुपदापर्यंत नेऊन पोहचविण्यासाठी.  अन्यथा द्रोणांच्या बरोबरीचा द्रुपद, हा वयाने धृतराष्ट्र पांडू यांच्यापेक्षा काहीसा मोठा आहे. त्याला तसे भीष्मवधाचे  प्रयोजन देखील दिसत नाही.  पण कुरुंच्या शेजारील पांचाल हे एकच मोठे व सशक्त राज्य आहे.  पांचालराज द्रुपदाचे  आपला  बालमित्र द्रोणाशी आलेले वैर ही नंतरची घटना आहे. आणि शिखंडी जर भीष्म वध करण्याएवढा शूर योद्धा असता तर द्रोण  वधासाठी द्रुपदाने वेगळा पुत्र, ते देखील  हवन करून का प्राप्त करून घेतला असावा ? ते देखील समजत नाही.  बरं फक्त भीष्म वधासाठीच अंबेचा  शिखंडी म्हणून जन्म झाला असे मानावे तर शिखंडीच्या हातून भीष्म वध घडलेला नाही.  आणि अंबेच्या अग्नी प्रवेशाच्या वेळीच  सत्तरीपार  असणारे भीष्म आपल्या वयाच्या कितव्या वर्षी युद्धात  सामोरे येणार  हे तरी अंबेला ठाऊक होते का? 

या सर्वांचा विचार करता अंबेचे शिखंडीच्या रूपात जन्म घेणे हा महाभारतकारानी जोडलेला बादरायण संबंध आहे असे माझे स्पष्ट मत आहे. याच शिखंडीच्या लिंगबदलाची कहाणी देखील तितकीच गूढ आडे व त्याचा रहस्यभेद याच मालिकेत योग्य वेळी होईलच. 

___________________________________________________________________________________

संदर्भ : अम्बोपाख्यान पर्व : अध्याय १७२ ते १८७ प्रचलित आवृत्ती



Thursday, June 03, 2021

स्वयंवरातील भीष्मपराक्रम

दाशराजाचा होकार मिळाल्यावर सत्यवतीला रथात सोबत घेऊन राजपुत्र देवव्रत हस्तिनापुरात परतला व सर्व हकीकत पित्याला सांगून त्याने सत्यवतीला शंतनूच्या हवाली केलं. यानंतर शंतनू व सत्यवतीचा विवाह झाला. 

या विवाहानंतर शंतनूपासून सत्यवतीला चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन पुत्र झाले. विचित्रवीर्य कुमार वयात असतानाच शंतनूचे निधन झाले. आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे भीष्मांनी तरुण चित्रांगदाला राज्याभिषेक केला. महाभारत आपल्याला सांगते कि चित्रांगद पराक्रमी होता, मात्र त्याचे चित्रांगद याच नावाच्या गंधर्वाशी युद्ध झाले. कुरुक्षेत्राजवळील हिरण्यवती (प्रचलित प्रतींनुसार सरस्वती नदी ) नदीच्या किनाऱ्यावर झालेले हे युद्ध सुमारे ३ वर्षे सुरु होते, म्हणजेच हा हस्तिनापूरच्या उत्तरेकडील भागातील सीमावाद असावा व वारंवार उफाळून येत असावा. मात्र असे असून देखील पराक्रमी व अजेय भीष्मांनी यात या ३ वर्षात हस्तक्षेप करून गंधर्वाला संपविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. याउलट या युद्धात अखेरीस चित्रांगद गंधर्वाकडून मारला गेला. त्यामुळेच या कालावधीत भीष्म राज्यकारभार चित्रांगदावर सोपवून बाजूला झाले असावेत असे दिसते. नियती मात्र भीष्मांना वारंवार हस्तिनापूरच्या राजगादीकडे वारंवार खेचत होती. 

यानंतर अजूनही कुमारवयीन असणाऱ्या विचित्रवीर्याला भीष्माने राज्यावर बसविले आणि त्याच्या नावाने भीष्माने राज्यकारभार सुरु केला. विचित्रवीर्य तारुण्यात येताच सत्यवतीने व भीष्माने त्याच्या विवाहाचा विचार सुरु केला. याचवेळी काशीराजाने त्याच्या अंबा, अंबिका व अंबालिका या तीन राजकन्यांचे स्वयंवर मांडले असल्याचे कानी आले व विचित्रवीर्याला यात भरीस घालण्याऐवजी स्वतःच या स्वयंवराला हजेरी लावण्याचे ठरविले. कोवळ्या वयाच्या व हस्तिनापूरच्या गादीचा एकमेव वारस असणाऱ्या विचित्रवीर्याला, एकटेच स्वयंवराला पाठविल्यावर, इतर राजांच्या गराड्यातून एखादी राजकन्या घेऊन येणे हे त्याला शक्य होणार नाही याची  सत्यवती व भीष्माला खात्री असावी. म्हणूनच भीष्म या स्वयंवरासाठी भीष्म एकटेच काशी राज्यात पोहोचले 

भीष्मांचा स्वयंवरात उपहास 

भीष्म ४० वर्षाचा असताना शंतनू व सत्यवतीचा विवाह झाला होता. त्यावेळचे शंतनूचेच वय ६८ वर्षांचे होते हे आपण या आधी पाहिले आहे. त्यानंतर त्याला उतारवयात झालेल्या चित्रांगद व विचित्रवीर्य या मुलांमध्ये देखील ४-६ वर्षाचे अंतर असावे असे दिसते. विवाहानंतर सुमारे १६-१७ वर्षांनी म्हणजे वयाच्या ८५ व्या वर्षी शंतनूचा मृत्यू झाला त्यावेळी चित्रांगद १६ वर्षाचा तरुण होता व तो गादीवर आला. यावेळी १०-११ वर्षाचा असणारा विचित्रवीर्य  त्यानंतर जेव्हा ३-४ वर्षांनी चित्रांगदाचा गंधर्वाबरोबरच्या लढाईत मृत्यू झाला,  तेव्हादेखील १४-१५ वर्षाचा कुमारचा होता. म्हणजेच चित्रांगदाच्या मृत्यूच्या वेळी भीष्मानी   वयाची साठी गाठली होती व १-२ वर्षात तारुण्यात पदार्पण केलेल्या कोवळ्या विचित्रवीर्यासाठी वधू आणायला भीष्म निघाले तेव्हा ते साठी उलटलेले (६२-६३ वयाचे) होते

अशा वयोवृद्ध व प्रतिज्ञाबद्ध भीष्माला स्वयंवराच्या मंडपात पाहून तेथील तरुण राजांनी नाके मुरडली व भीष्माची थट्टा देखील केली, असे वर्णन महाभारताच्या सर्व प्रचलित आवृत्त्यांमध्ये येते (चिकित्सक आवृत्ती मध्ये मात्र हे थट्टेचे वर्णन येत नाही). त्यांचे हे टोमणे भीष्माला फारच लागले आणि त्यांनी संतापून तात्काळ त्या तीनही राजकन्यांचे हरण करायचे ठरविले आणि सर्वांसमक्ष त्यांना रथात घालून उपस्थित राजांना त्याने आव्हान दिले. असे करताना त्यात त्यांनी जे वीरोचित भाषण केले त्यात त्यांनी विवाहाचे आठ प्रकार सांगितले  व त्यातील आप्तेष्ठांचा व विवाहोत्सुक क्षत्रियांचा पराभव करून केलेला राक्षस विवाह हा क्षत्रियांसाठी सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगत सर्व उपस्थित क्षत्रियांना युद्धासाठी ललकारले. 

भीष्म पराक्रम 

. महाभारतकारानी या छोटेखानी युद्धात पण भीष्मांनी केलेल्या पराक्रमाचे यथासांग वर्णन केले आहे. सर्व राजे आपापल्या अंगावरचे अलंकार इतस्ततः भिरकावत,  चिलखत चढवीत , सारथ्याना तात्काळ रथ सिद्ध करायला सांगत, शस्त्रसज्ज होत रथारूढ झाले व सर्वानी एकत्रितपणे भीष्मांवर हल्ला केला. पण नरपुंगव भीष्माने अतुलनीय पराक्रम करीत एकट्याने आपल्या धनुष्यबाणाने त्या सर्वांचा असा पराभव केला कि त्या सर्व राजांनीही तोंडात बोटे घातली.

या पराक्रमानंतर भीष्म हस्तिनापुराकडे  निघाला असता त्याला सौभराज शाल्वाची ललकारी ऐकू आली. इतर सर्व राजे  भीष्माच्या शौर्याने दिपून गेले तरीदेखील, त्या तीन  कन्यापैकी, थोरल्या अंबेवर प्रेम करणारा शाल्व मात्र हार मानणारा  नव्हता.  भीष्माने देखील रथ थांबवून त्याच्याशी युद्ध आरंभले. या आधीच पराभूत झालेले इतर राजे आता प्रेक्षक बनले. सुरुवातीलाच शाल्वाने केलेल्या आक्रमणाने,  या राजांनी आता  भीष्मांविरुद्ध शाल्वाला प्रोत्साहितकरायला सुरुवात केली.  ते पाहून चिडलेल्या भीष्माने आपल्या अविरत शरवृष्टीने शाल्वाला संत्रस्त केले.  त्याचे घोडे मारले, रथ मोडला, आणि त्याला जेरीला आणले व अखेर जीवदान देत सोडून दिले.  पराभवाने अपमानित झालेला शाल्व आपल्या नगराकडे परतला व भीष्म त्या तीनही कन्यांना घेऊन हस्तिनापूरला परतला.  स्वतः जिंकून आणलेल्या या तीनही कन्या त्याने सत्यवतीच्या मुलाला, म्हणजेच आपल्या धाकट्या भावाला, विचित्रवीर्याला अर्पण केल्या आणि तो त्याच्या विवाहच्या तयारीला लागला. 

आपला विवाह आता विचित्रवीर्या बरोबर होणार हे कळताच त्या तिघीतली  ज्येष्ठ कन्या अंबा हिने  आपले मन भीष्मांसमोर उघड केले व आपले शाल्व राजावर  प्रेम होते आणि आपल्याला मिळवण्यासाठीच तो भीष्मा बरोबर तुमुल युद्ध करत होता हे तिने सांगितले.  हे ऐकताच धर्म विचार जाणून घेण्यासाठी भीष्माने वेद पारंगत  विद्वानांबरोबर विचारविनिमय केला व नंतर सत्यवतीच्या परवानगीने अंबेला शाल्व  राजाकडे परतण्यास अनुमती दिली. 

तिच्या दोन बहिणी अंबिका व अंबालिका मात्र देखण्या विचित्रवीर्याला पाहताच त्याच्याशी विवाहाला आनंदाने तयार झाल्या. अनुपम सौंदर्यवती असलेल्या या दोन कन्यांना पाहतात विचित्रवीर्य देखील भलताच वेडावला आणि त्यांच्याशी विवाह होतात “धर्मात्मा विचित्रवीर्य कामात्मा झाला”  इतक्या स्पष्ट शब्दात महाभारतकारांनी त्याची लग्नानंतरची विलासी वृत्ती नोंदविली आहे.  या अति कामविकाराचा जो व्हायचा तोच परिणाम झाला. सुमारे सात वर्षे राज्य कारभार दुर्लक्षून कामविहार करणार्‍या विचित्रवीर्या ला तरुण वयातच राजयक्ष्मा म्हणजे क्षयरोग झाला.  वैद्यांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण अखेर या क्षयरोगाने त्याचा अंत झाला व हस्तिनापूरावर पुन्हा एकदा काळोखाचं साम्राज्य पसरले.  भीष्मांच्या वृद्ध खांद्यांवर पुन्हा एकदा हस्तिनापूरला सावरण्याची जबाबदारी येऊन पडली आणि आपल्या प्रतिज्ञेत राहून ती कशी पार पाडायची याची चिंता त्यांना व सत्यवतीला भेडसावू लागली. 

Monday, May 17, 2021

जितेंद्रिय देवव्रत भीष्म (भीष्मप्रतिज्ञा)

गंगेने हाती सोपविलेल्या तेजस्वी कुमार देवव्रताला  घेऊन राजा शंतनू अतिशय आनंदाने हस्तिनापुरात परतला.  सर्वगुणसंपन्न राजकुमार देवव्रताला पाहून नगर जन देखील आनंदी झाले.  राजा शंतनू राज्यकारभारात पुन्हा व्यग्र झाला.  त्याने देवव्रताला युवराज्याभिषेक देखील केला.  अशा प्रकारे सुमारे चार वर्षे सुखात गेली.  यानंतर राज्यकारभार देवव्रतावर सोपवून राजा शंतनु पुन्हा मृगयेत रमू लागला. यावेळी यमुनेच्या तीरावर मृगयेला गेला असताना दूरवरून येणाऱ्या एका सुगंधाने तो धुंद झाला.  या सुगंधाच्या उगमस्थानाचा जेव्हा त्याने शोध घेतला तेव्हा एक लावण्यवती कन्या त्याच्या दृष्टीस पडली आणि राजा शंतनू तिच्याकडे आकृष्ट झाला.  त्याने तिची चौकशी केली
तेव्हा तिने त्याला आपले नाव सत्यवती असून आपण नदीकाठावरील धीवर (कोळी) प्रमुखाची कन्या असल्याचे व उदरनिर्वाहासाठी नौका चालवत असल्याचे तिने सांगितले.  तिच्यावर मोहित झालेल्या शंतनूने तिच्या पित्याला भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली व नंतर त्याला भेटून त्याने त्या धीवराकडे त्याच्या कन्येला सरळ मागणी घातली. 

शंतनूचे  त्या वेळचे वय लक्षात घेता ही मागणी शंतनूने खरं तर राजपुत्र देवव्रतासाठी घालायला हवी होती.  साठी पार केलेल्या शंतनूने आपल्या तरुण राजपुत्राच्या विवाहाचा विचार करायला हवा होता.  पण या वयात देखील शंतनूने असा विवेकी विचार केला नाही. त्याची ही स्थिती सत्यवतीच्या पित्याने  ओळखली व त्याने धूर्तपणे या संधीचा फायदा घ्यायचे ठरवले.  त्याने राजाला आपली अट सांगितली की,  तू माझ्या कन्येच्या  तुझ्यापासून होणाऱ्या  पुत्राला राज्याभिषेक करायला हवा.  देवव्रताला युवराज्याभिषेक करून चुकलेल्या राजा शंतनूला  अर्थातच हा होकार देववला नाही व खिन्न मनाने तो हस्तिनापूरला परतला. 
शंतनू व सत्यवती - (चित्रकार - राजा रवी वर्मा)

याच बरोबर अजून एक गोष्ट आपल्याला ध्यानात घ्यायला हवी ती म्हणजे शंतनू हस्तिनापूरचा राजा होता. यमुना-गंगा प्रदेशात राहणारे सर्वजण, ही त्याची प्रजा होते.  पण शंतनूने आपल्या सत्तेच्या अधिकाराचा वापर,  ही मागणी घालताना केलेला दिसत नाही.  तसेच धीवराने  देखील आपल्या राजाच्या मागणी पुढे दबून जात त्याला होकारही  दिलेला नाही.  आणि त्याने अटी घातल्यावर कोणतीही बळजबरी न करता, शंतनू हिरमुसला होऊन हस्तिनापुरात परतला आहे. 

यानंतर तो सत्यवतीच्या विचारात  सतत  उदास राहू लागला.  त्याचे कशातच लक्ष लागेना.  मुख्य म्लान दिसू लागले.  त्याची ही अवस्था, त्याचा पुत्र देवव्रत त्याच्या लक्षात आली. त्याने शंतनुला त्याबद्दल छेडले असता वेगळ्याचा  शब्दात शंतनूने आपली व्यथा आपल्या पुत्रासमोर मांडली. तो देवव्रताला म्हणाला, तू माझा एकुलता एक पुत्र असून नित्य युद्ध कर्मात व्यस्त असतोस. जर तुला काही झाले तर मी निपुत्रिक होईल व आपला कुलक्षय होईल. तो टाळण्यासाठी मला पुन्हा विवाह करायचा आहे. यापुढे हे लग्न कोळ्याच्या मुलीशी करायचे आहे हे आपल्या मुलाला सांगणे त्याला कदाचित संयुक्तिक वाटले नसावे. वास्तविक पाहता देवव्रत येण्या आधीची छत्तीस  आणि नंतरची चार,  म्हणजे चाळीस वर्षे शंतनु निपुत्रिक असल्याप्रमाणे होता.  कुलक्षय टाळण्यासाठी तो युवराज देवव्रताचा विवाह करून राज्य त्याच्या हाती सोपवू शकला असता असे असताना देखील उतारवयात त्याला झालेल्या मदनबाणाने मती भ्रष्ट झाला हे मात्र खरे. 

भीष्म प्रतिज्ञा 

देवव्रताने त्याची व्यथा समजावून घेतली. या व्यथेचा निश्चित रोख जाणून घेण्यासाठी त्याने अमात्यांना गाठले.  त्यात त्याला धीवर प्रमुखाच्या अटींची कहाणी कळली.  आपल्या पित्यावरील  आत्यंतिक प्रेमाने देवव्रताने तात्काळ एक निर्णय घेतला व सोबत प्रतिष्ठित क्षत्रिय वीरांना घेऊन तो त्या धीवर प्रमुखाकडे गेला, आणि आपल्या पित्यासाठी त्याने सत्यवतीला  मागणी घातली.  

इथेही चतुर धीवराने आपला संयम सोडलेला दिसत नाही. त्याने सत्यवतीशी देवव्रताने विवाह करावा असेही सुचविल्याचे दिसत नाही कारण कदाचित ती देखील वयाने देवव्रतापेक्षा पोक्त असावी (व काही वर्षांपूर्वी तिच्या पोटी व्यासांचा ही जन्म झाला आहे, जे देवव्रतापेक्षा काही वर्षांनी लहान असावेत).  त्याने पुन्हा एकदा आपली अट देवव्रताला सांगितली.  तो विचार करूनच देवव्रत इथे आला होता व म्हणूनच तात्काळ त्याने आपण राज्यावरचा हक्क सोडत आहोत व सत्यवतीचाच  पुत्र हस्तिनापूरचा राजा होईल असे वचन तिच्या पित्याला दिले.  

भीष्म प्रतिज्ञा (चित्रकार - राजा रवी वर्मा)
या वचनाने जरी तो धीवर खुश झाला तरी त्याने अजून एका संभाव्य धोक्याची जाणीव देवव्रताला करून दिली.  ती म्हणजे,  तू म्हणतोस ते ठीक पण उद्या तुझ्या पुत्रांना राज्य लोभ उत्पन्न झाला व त्यांनी देखील राज्यावर हक्क सांगितला तर?  हे ऐकून देखील देवव्रत जरादेखील विचलित झाला नाही.  व तत्क्षणी त्याने आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याची अजून एक प्रतिज्ञा केली.  आपल्या या प्रतिज्ञेमुळे आपण जरी निपुत्रिक राहिलो तरी आपल्याला स्वर्गप्राप्ती होईल, हा विश्वास देखील त्यांने व्यक्त केला.  त्याची ही प्रतिज्ञा ऐकून सोबत आलेले प्रतिष्ठित क्षत्रिय वीर अवाक झाले.  आणि हा तर भीष्मच आहे अशा शब्दात सर्वांनी त्याचा गौरव केला.  


अशा रीतीने आपल्या इंद्रियांवर विजय मिळवण्याच्या या जितेंद्रिय प्रतिज्ञेमुळे देवव्रत पुढे भीष्म म्हणून ओळखला जाऊ लागला.  त्याच्या या प्रेमामुळे शंतनूने देखील त्याला तू इच्छामरणी होशील असा वर दिला. 

असे घडले असेल का ?

यातील देवव्रताचे  शंतनू वरील निरातिशय प्रेम पाहता,  भैरप्पांनी आपल्या पर्व या कादंबरीतून एक वेगळा विचार आपल्यासमोर मांडला आहे.  तो म्हणजे पहिल्या सात बाळंतपणासाठी गंगाच माहेरी निघून जायची व आपल्या मातृसत्ताक  कुटुंबात पुत्रांना ठेवून परतायची.  पण आठव्या वेळी मात्र शंतनूने तिला माहेरी जाण्यापासून प्रतिबंध केला. म्हणूनच पुत्रजन्म होतात लहानग्या देवव्रताला  शंतनूच्या हाती सोपवून,  आपल्या अटींप्रमाणे ती स्वगृही आपल्या आधीच्या ७ पुत्रांकडे  निघून गेली.  शंतनूने नंतर देवव्रताला सर्व प्रकारचा विद्याभ्यास देऊन घडविले असावे.  पित्याचा हा त्याग पाहून देवव्रताने  देखील आपल्या पित्यासाठी भीष्मप्रतिज्ञेद्वारे एक मोठा आयुष्यभराचा त्याग करायचा निर्णय घेतला. 

अर्थातच हा विचार स्वतः महाभारतकार कुठेच ध्वनित देखील करीत नाहीत.  पण एक गोष्ट आपल्याला महाभारतातून निश्चितपणे कळते ती मात्र अशी की,  शंतनूने जे दोन्ही विवाह केले ते नदी प्रदेशातील  वन कन्या, धीवरकन्या इत्यादी क्षत्रिय नसलेल्या जमातीतील मुलींशी केले व ते देखील दोन्ही वेळी त्यांनी घातलेल्या अटी मान्य करीत केले.  या दोन्ही कन्यांची कदाचित हीन असलेली कुळे उंचावण्यासाठी व त्या राजाला आणि राज्याला अनुरूप आहेत,  ते तत्कालीन जनमानसावर ठसविण्यासाठी त्यांच्या जन्माभोवती अद्भुततेचे  वलय निर्माण केले,  जे आपण या आधीच्या कथा भागात पाहिले आहेच. 

Sunday, May 02, 2021

व्यासजन्मापूर्वी हस्तिनापुरात....महाभारताची सुरुवात

 

महाभारताची सुरुवात हस्तिनापूरचा राजा शंतनू याच्यापासून होते.  आपण एक पिढी मागे गेलो तर आपल्याला असे आढळते की,  शंतनू हा राजा प्रतिप व शिबी कन्या राणी सुनंदा यांचा पुत्र. प्रतिपाला  एकूण तीन पुत्र होते देवापी, बाल्हिक व शंतनू.  यातील देवापि हा  थोरला पुत्र धर्मपरायण व प्रजाहितदक्ष असूनही, त्याला त्वचारोग असल्याने या “हिनांग भूपतीला” राज्याभिषेक करण्यास प्रजेने व ब्राह्मणांनी नकार दिला. या  घटनेने राजा प्रतीप व्यथित झाला. बाल्हिकाने आपल्या मातुलगृही  म्हणजे मामाकडे जाऊन तिथले राज्य सांभाळणे पसंत केले व प्रतिपाच्या मृत्युनंतर शंतनु राजा झाला.  या घटनेचे  भाष्य  आपल्याला पुढे उद्योग पर्वात आढळते ,  जेव्हा धृतराष्ट्र, दुर्योधनाला त्याचा राज्यावर अधिकार का नाही हे देवापीचे उदाहरण देऊन समजावतो,  कि जसे त्याला हिनांगतेमुळे  राज्य मिळाले नाही तसे अंधत्वामुळे मला मिळू शकले नाही व म्हणूनच हस्तिनापूरच्या राज्यावर पंडूचा जेष्ठ पुत्र युधिष्ठिर याचाच अधिकार आहे. . 

शंतनू देखील एक पराक्रमी व नीतिमान राजा होता व तत्कालीन क्षत्रियांप्रमाणेच त्याला देखील मृगयेचा छंद  होता.  अशाच एका प्रसंगी गंगाकिनारी मृगयेला गेला असता त्याची दृष्टी  गंगा नावाच्या सुंदर स्त्रीवर पडते व तो मोहित होतो. तो  तिला लग्नासाठी मागणी घालतो.  गंगा हि नदीकाठच्या प्रदेशातील एक चतुर तरुणी आहे. ती  त्याच्यापुढे काही अटी ठेवते त्या म्हणजे,  “मी जे काही करीन ते चांगले असो अथवा वाईट, तू मला अडविता कामा नये अथवा मला अप्रिय असे बोलताही कामा नये".  जर तू मला अडविलेस  अथवा बोल लावलास तर तत्क्षणी मी तुला सोडून जाईन. गंगेच्या सौंदर्याने मोहित झालेल्या शंतनू तात्काळ मागचा पुढचा विचार न करता या अटी मान्य करतो  आणि त्याने गंगा त्याच्याशी विवाहबद्ध होते . 

त्यांचे वैवाहिक आयुष्य अत्यंत सुखी आहे. गंगा यथावकाश पुत्रवती होते व पुत्र जन्म झाल्यावर लगेचच ती आपल्या नवजात पुत्राला गंगार्पण करते.  राजा शंतनू ते पाहतो, पण विवाहपूर्व अटींमुळे काहीच बोलत नाही.  या नंतरच्या त्यांच्या सहजीवनात देखील हे असे होतच राहते. त्यांना असे पाठोपाठ ७  पुत्र होतात व राणी गंगा ते गंगा नदीला अर्पण करत राहते.  राजा वरील गंगेच्या प्रेमाचा अंमल हळूहळू उतरू लागतो, आणि आठवा पुत्र झाल्यावर राणी गंगा जेव्हा त्याला गंगार्पण करू पाहते तेव्हा न राहून तो आपल्या पत्नीला अडवितो. तिला बोल लावतो. विचारतो अगे कैदाशीनी,  स्वतःच्या पुत्रांना मारून टाकणारी अशी तु आहेस तरी कोण? आणि तू हे पाप नक्की करतेस तरी का?

महाभिष व गंगा 

शंतनुचे ते उद्गार ऐकून गंगा त्याला स्वतःचा व शंतनूच्या पूर्वजन्माचा इतिहास त्याला सांगते. ती म्हणते, हे राजन, तू पूर्वजन्मीचा महाभिष राजा तर मी तर देवलोकीची जन्हूकन्या गंगा. स्वर्गप्राप्ती झालेला महाभिष राजा ब्रह्मदेवाच्या दरबारात उपस्थित असताना मी देखील तेथे पोहोचले.  त्यावेळी माझे वस्त्र वाऱ्याने उडाले आणि ते पाहून सर्व देवांनी माना खाली घातल्या. महाभिष मात्र माझ्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत राहिला, व त्यामुळे ब्रह्मदेवाने त्याला “तू पुन्हा मृत्युलोकी जन्म घेशील” असा शाप दिला.  ज्या गंगेने तुला भुरळ घातली तीच तुझी पत्नी होईल व गंगा तुझ्या  मनाविरुद्ध वागताच  तुला क्रोध येईल, व तुमची या शापातून मुक्तता होईल.  आता पृथ्वीलोकातील वास्तव्याच्या शापातून मी मुक्त  झाले आहे.  आता मी या आठव्या पुत्राला सोबत घेऊन जाते व त्याला सर्व विद्या पारंगत करून तुला परत आणून देइन. 

अष्टवसूंच्या शापाची कथा 

गंगा तिने जन्मताच मृत्युलोकातून मुक्त केलेल्या तिच्या सात पुत्रांचा वृत्तांत त्याला सांगते तो असा. अनेक मुनींचे वास्तव्य असणाऱ्या एका तपोवनामध्ये अष्टवसू सपत्नीक विहार करत असताना द्यू  नावाच्या एका वसूची पत्नी वसिष्ठांच्या नंदिनी या कामधेनूला पाहते व आपल्या पतीकडे, म्हणजे द्यू  कडे, ती कामधेनू आपल्याला मिळवून द्यावी, असा हट्ट धरते.  म्हणून द्यू आपल्या इतर सात भावांसह ती नंदिनी गाय पळवून आणतो.  वसिष्ठांना हे कळताच, ते त्या अष्टवसुना “तुम्हाला मनुष्य लोकात जन्म घ्यावा लागेल” असा शाप देतात. भयभीत व  पश्चात्तापदग्ध होऊन अष्टवसु वसिष्ठ ऋषींना शरण जातात.  वशिष्ठ त्यांना उ:शाप देत म्हणतात, एक वर्षाचा काळ लोटल्यावर तुमच्यापैकी सात जण मुक्त होतील, पण मुख्य अपराधी द्यू  मात्र दीर्घकाळ मृत्युलोकात वास्तव्य करेल.  हे वसू गंगेकडे येऊन गंगेने त्यांना जन्म द्यावा अशी विनंती करतात व गंगा देखील त्यांची विनंती मान्य करते. 

चिकित्सकांच्या दृष्टीतून 

महाभारत कथेच्या या प्रारंभीच्या घटनेकडे चिकित्सक दृष्टीने पाहताना आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. शंतनू गंगेकाठी मृगयेला जातो व एका तरुणीवर भाळतो आणि तिला मागणी घालतो. ती मुलगी प्रत्यक्ष नदी तर असू शकत नाही मग हे वैचित्र्य, शाप यांचा अंतर्भाव या कथेत कशासाठी? तर जिच्याबद्दल काहीच माहीत नाही, अशा एका मुलीला, म्हणजेच गंगेला, हस्तिनापूरच्या राजघराण्यात सामावून घेण्यासाठी. हि गंगा मग होती तरी कोण?गंगा नदीकिनारी राहणाऱ्या अशा   एखाद्या  गणातील/जमातीतील मुलगी, जिला शंतनू  बरोबर विवाह तिच्या अटींवर मान्य होता, पण आपली मुले तेथील राजवाड्यात, नगरात वाढवणं मान्य नव्हतं. कदाचित एखाद्या मातृसत्ताक पद्धतीतील जमातीतील अथवा अप्सरा, देव या उत्तरेकडील गणातील मुलगी जी आपल्या मुलांना जन्मल्यावर अल्पावधीतच आपल्या जमातीत परत करत होती (केवळ “क्षेत्रज-पुत्र” न्यायाने) अथवा त्यांना खरंच मारून टाकत होती (मातृसत्ताक पद्धतीत पुरुष अपत्य नको म्हणून). आणि या गोष्टीला विरोध होताच, आपल्या अटीप्रमाणे  पुन्हा आपल्या गणात / जमातीत परतली. या सर्वांना कथेला अद्भुत असे स्वरूप देण्यासाठी महाभिष राजाची, अष्टवसूंच्या शापाची कहाणी त्याभोवती रचली गेली

काही काळानंतर 

गंगा आपल्या आठव्या पुत्राला सोबत घेऊन जाते.  शंतनू पुन्हा एकटा होतो व हस्तिनापूरच्या राज्यकारभार करू लागतो. मध्ये काही वर्षे जातात (महाभारत आदिपर्व अध्याय १००, श्लोक २०, नुसार ३६ वर्षे). पुन्हा एकदा शंतनू गंगाकिनारी मृगया करत असता, एका ठिकाणी गंगेचे पाणी बाणांनी अडवलेले त्याला  दिसते.  त्याचा शोध घेतला असता, त्याला एक रूपसंपन्न कुमार दिसतो, ज्याने आपल्या शरवर्षावाने ते पाणी अडवून ठेवले होते.  राजाने पृच्छा करतात गंगा तिथे प्रकट होते.  ती  तो आपला पुत्र देवव्रत असल्याचे त्याला सांगते. देवव्रत आता विद्याभ्यास व शस्त्रविद्या पारंगत असल्याचे सांगत तिने तो पुत्र शंतनूच्या हवाली करते.  देवव्रताने वसिष्ठांकडून वेदांचे अध्ययन केले असून (त्या द्यू वसुला शाप देणारे वसिष्ठच) अस्त्र विद्येत तो देवराज इंद्राप्रमाणे पराक्रमी आहे,  शुक्राचार्य जी नीती जाणतात व परशुराम जी अस्त्रविद्या जाणतात त्यातही तो पारंगत आहे असे गंगा शंतनुला सांगते. 

वयाचे गणित 

शंतनूने गंगेवर मोहित होण्याचे वय महाभारताने दर्शविलेले नाही. अगदी ते २०च वर्षे होते असे मानले (व म्हणूनच या वयात तिच्या सर्व अटी शंतनूने मान्य केल्या) , तरी आठवा पुत्र देवव्रताचा जन्म होईस्तोवर ते २८ वर पोहोचेल. महाभारतानुसार ३६ वर्षांनी जर गंगा देवव्रताला परत करते तर त्यावेळी शंतनूचे हे वय २८+३६=६४ वर्षांवर पोहोचते. आणि मग ज्या वयात आपल्या पुत्राचे लग्न करून वानप्रस्थाश्रम स्वीकारायचा त्या वयात शंतनू पुन्हा एकदा लग्नगाठ बांधायला तयार होतो.  आपल्या पित्याची हि इच्छादेखील पूर्ण करणारा देवव्रत मात्र भीष्म होऊन महाभारताला जन्म देतो. ते कसे हे आपण पुढील लेखात पाहू ....

Wednesday, April 21, 2021

महाभारतकार व्यासांची जन्मकथा

महाभारत कथेची सुरुवात जरी व्यासांच्या जन्माच्या आधी होत असली तरी या कथेत स्वतः व्यास वारंवार भूमिका निभावत असल्याने, महाभारताच्या मुख्य कथानकाला सुरुवात करण्यापूर्वी व्यासांची जन्मकथा जाणून घेणे आवश्यक आहे. महाभारतात असलेले सर्व नाट्य थोड्याफार प्रमाणात व्यास जन्माच्या कथेत देखील आहेच.

महर्षी व्यास हे पराशर मुनी व धीवर कन्या सत्यवती यांचे पुत्र.  त्यांच्या या मात्यापित्यांची कहाणी देखील असंख्य चमत्कारांनी रंगवलेली आणि बरीचशी उत्तरकालीन भर आहे, असे वाटायला लावणारी आहे.  महाभारताच्या पहील्याच म्हणजे आदिपर्वाच्या अध्याय १७६ मध्ये पराशर ऋषींची जन्मकथा येथे ही थोडक्यात अशी..... 

पराशर ऋषींची जन्मकथा

शक्ती ऋषी व कल्माषपाद राजा अरुंद वाटेवर
पूर्वी इश्वाकु वंशातील (रामाचा वंश) कल्माषपाद नावाचा राजा होऊन गेला. एकदा शिकारी करता, हा राजा वनात गेला असताना, एका अरुंद वाटेवर समोरून ज्येष्ठ वशिष्ठ पुत्र शक्‍ती येत होता.  ब्राह्मणाला प्रथम वाट द्यायची हा तत्कालीन संकेत पण राजा वाट द्यायला तयार होईना आणि शक्ती ऋषी देखील वाट सोडेना.  तेव्हा कल्माषपाद राजाने त्याला चाबकाने फोडून काढले आणि त्यामुळे संतापून शक्ती ऋषीने त्याला तू मनुष्य भक्षक राक्षस होशील असा शाप दिला.  त्याबरोबर त्या राजाने शक्तीलाच प्रथम भक्ष केले व त्यानंतर उरलेल्या वशिष्ठ पुत्रांना.  हे कळताच ऋषी वशिष्ठ अतिशय दुःखी झाले व त्यांनी आत्मघाताचे अनेक प्रयत्न केले पण ते सर्व अयशस्वी ठरले.  या सर्व प्रकारात शक्तीची पत्नी अदृश्यन्ती त्यांची पाठराखण करत होती.  व तिच्या गर्भातून येणारा, वेदाध्ययन करणारा एक स्वर वरिष्ठांच्या कानावर पडला तेव्हा वसिष्ठांनी कुतूहलाने अदृश्यन्तीकडे चौकशी केली यावेळी तिने त्यांचा नातू तिच्या उदरात वाढत असल्याचे वसिष्ठांना सांगितले हे कळताच त्यांचे नैराश्य पळाले.  यथावकाश अदृश्यन्तीला जो पुत्र झाला त्याचे नाव वसिष्ठांनी पराशर असे ठेवले. 

सत्यवतीची जन्मकथा 

उपरिचर वसु नावाचा एक राजा होता.  इंद्राच्या इच्छेप्रमाणे त्याने चेदी राज्य जिंकले त्यामुळे इंद्राने त्याची स्तुती करत त्याला सज्जनांचा प्रतिपाळ करण्यासाठी कळकाची काठी दिली.  नवीन संवत्सराचा सुरुवातीला या राजाने ती  काठी जमिनीत रोवून त्यावर शेला व पुष्पमाला बांधून त्याची पूजा केली. तद्नंतर प्रत्येक संवत्सराच्या (वर्षाच्या) सुरुवातीला ही प्रथाच झाली आजही नववर्षाच्या सुरुवातीला असे गुढी पूजन केले जाते

या उपरिचर वसुला गिरीका नावाची पत्नी होती.  ती ऋतुमती होण्याच्या काळातच राजाला राजवाड्यातील वयोवृद्धांना मांसान्न हवे म्हणून शिकारीसाठी वनात जावे लागले. वनातच गिरीकेच्या आठवणीने राजाचे  वीर्यस्स्खलन झाले.  ते वाया जाऊ नये म्हणून राजाने ते एका द्रोणात धरले व ते गिरिके पर्यंत पोहोचण्यासाठी एका श्येन पक्षाला दिले.  हा पक्षी यमुने वरून जात असता त्याच्या चोचीत काहीतरी पाहून दुसऱ्या एका श्येन पक्षाने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्याशी झालेल्या झटापटीत तो द्रोण यमुनेच्या पाण्यात पडला.  त्या यमुनेच्या पाण्यात अद्रिका नावाची अप्सरा शापामुळे मासा झाली होती.  तिने ते वीर्य गिळले व त्यातून तिला गर्भ राहिला.  पुढे ती प्रसूत झाल्यावर तिला एक मानवी जुळे झाले.  ही जुळी मुले कोळ्यांनी राजा उपरिचर वसु कडे नेली. पैकी जो मुलगा होता तो राजाने ठेवून घेतला तर मुलगी राजाने त्या धीवराला दिली व स्वतःच्या मुलीसारखा प्रतिपाळ करण्यास सांगितले तीच मुलगी म्हणजे सत्यवती. या दोन मानवी मुलांना जन्म देऊन अप्सरा आद्रिका शापमुक्त झाली.

पराशर व सत्यवती यांच्या जन्मकथेचा मतितार्थ

या दोन्ही कथा पाहता आपल्या असे लक्षात येते की हा सर्व खटाटोप व्यासांच्या माता-पित्यांना व पर्यायाने व्यासांना उच्चकुलीन ठरवण्यासाठी उत्तरकाळात केला गेला असावा.  यात पराशरांचे वडील  शक्ती ऋषी कल्माषपाद  राजा पेक्षा श्रेष्ठ व वशिष्ठ कुळातील असे सांगितले गेले,  तर धीवर कन्या मत्स्यगंधा प्रत्यक्षात एका अप्सरेच्या पोटी जन्माला आलेली क्षत्रिय राजकन्या असे दाखवण्याचा प्रयत्न आहे.  कदाचित प्रत्यक्षात राजा उपरिचर वसु, अद्रिका या एखाद्या यमुना काठच्या धीवर कन्येबरोबर रत  झाला असावा व त्यातून मत्स्यगंधा सत्यवतीचा जन्म झाला असावा.

व्यासमहर्षींचा जन्म 

पराशर मुनी व सत्यवती
तर असे हे पराशर मुनी यमुनेच्या किनाऱ्यावर नाव चालवणाऱ्या या सत्यवती नामक धीवर कन्येवर आसक्त  झाले व त्यांनी तिला नावेतच समागमाची विनंती केली.  त्यावेळी ऋषींना नाही कसे म्हणायचे?  मग तिने त्यांना, दोन्ही किनाऱ्यांवर ऋषी उभे आहेत,  असे दाखवले.  तेव्हा त्यांनी आपल्या तपोबलाने नावेभोवती धुके निर्माण केले.  त्यावर सत्यवतीने माझे कौमार्य नष्ट होईल असे सांगताच, ऋषींनी तिला ती कुमारीच  राहील असा आशिर्वाद दिला व एखादा वर मागण्यास सांगितले.  तेव्हा माझ्या सर्वांगाचा माशांचा वास जावून छान सुगंध येऊ देत असा वर तिने मागितला.  ऋषींनी तिची ही इच्छा देखील पूर्ण केली व तिचे नाव गंधवती अथवा योजनगंधा असे देखील पडले.  त्यानंतर पराशर ऋषींनी तिच्याबरोबर समागम केला व ती गर्भवती झाली. 

कालांतराने यमुनेतील  एका द्वीपावर (बेटावर) ती प्रसूत झाली.  रंगाने कृष्णवर्ण असलेल्या व द्वीपावर जन्मलेल्या मुलाला सर्वजण कृष्णद्वैपायन म्हणून ओळखू लागले.  पुढे या ज्ञानी पुत्राने शाखा भेदाला अनुसरून वेदांचा विस्तार केला म्हणून त्यांना व्यास हे नाव प्राप्त झाले. 

या कथेतील वरदान नक्की काय ?

या कथेतून आपल्याला असे लक्षात येते की तपोबलापेक्षा आसक्ती,  ती देखील क्षणिक कामासक्ती प्रबळ ठरते व पराशरांसारखे ऋषी देखील त्याला सहज भुलतात.  सत्यवतीला त्यांनी दिलेल्या कौमार्य भंग न होण्याचा वर म्हणजे द्विपावरील तिच्या वास्तव्याने तिची प्रसूती कुणाच्याच लक्षात येणार नाही व मी या पुत्राला लगेच घेऊन जाईन असे वचन जे त्यांनी सत्यवतील दिले व ते पाळले देखील. सत्यवती पुन्हा तिचे आयुष्य तिच्या परीने जगायला मोकळी झाली, असाच याचा अर्थ.  बरे, या प्रसूतिकालाच्या महिन्यांमध्ये माशांपासून दूर एका बेटावर राहिल्याने तिला माशांचा गंध पण येणार नाही,  हे वराचे  आणखी एक स्वरूप. 

पुढील महाभारत 

यमुनेच्या काठावर हे सर्व घडत असतानाच तिकडे दूर हस्तिनापुरात मात्र काही वेगळ्याच घटना घडून गेल्या होत्या आणि या घटनांचा व हस्तिनापुरातील त्या घटनांचा एकमेकात मिलाफ होत पुढे महाभारत घडणार होतं. काय होत्या त्या घटना ? ते आपण पुढील लेखापासून पाहू.

Monday, April 12, 2021

महाभारताचे शुद्धीकरण व BORI

प्रक्षिप्त म्हणजे नक्की काय ?

महाभारताचा अभ्यास करायला लागलं कि हळू हळू त्यातील कोडी सुटायला लागतात आणि व्यासांच्या अगाध प्रतिभेचा प्रत्यय येऊ लागतो. व्यासोच्छिष्ट्म जगत सर्वम म्हणजेच या एका महाकाव्यानेच व्यासांनी जगातलं सर्वच उष्ट करून सोडलेलं आहे या उक्तीचा प्रत्यय येतो. आणि मग यदि हास्ति तद्न्यत्र यन्नेहास्ति न तत् क्वचित ( यात जे आहे ते जगात सर्वत्र आहे मात्र यात जे नाही ते जगात कुठेच सापडावयाचे नाही)  हेदेखील समजते. असं काय विशेष आहे यात ? कसं बनले हे इतकं सर्वसमावेशक ?


महाभारत हा इतिहास असल्याचं खुद्द व्यासांनीच सांगून ठेवलंय. हा इतिहास घडला कधी असावा,  हा वेगळ्या संशोधनाचा विषय आहे. व्यासांनी हे महाभारत सर्व प्रथम त्यांच्या सुमंतू , जैमिनी, पैल , शुक (व्यासपुत्र) व वैशंपायन या ५ शिष्याना सांगितले. व्यासांनी सांगितलेला या इतिहासात वेळोवेळी भर पडत गेली व एक अवाढव्य महाकाव्य घडत गेलं.  ही हस्तलिखिते तयार होताना / झाल्यावर, त्याचा प्रसार भारताच्या इतर भागांमध्ये व भाषांमध्ये होत गेला.  त्यातील कथाकाव्य देखील लोकांना भावले व प्रतिभावंतांनी त्यात आपल्या प्रतिभेचे रंग भरले. यात वेळोवेळी वेगवेगळ्या प्रांतांचे , कवींचे , शासकांचे संस्कार घडत गेले व ते इतके बेमालूम होते कि यातील मूळ गाभा कोणता व वर चढवलेला साज कोणता हे समजणं  कठीण होऊन बसलं. हि  अनावश्यक भर म्हणजेच प्रक्षिप्तता.  मूळ संहिता वाढत वाढत लक्ष श्लोकांवर पोहोचली आणि यातील गाभा वेगळा करण्याचं काम शिवधनुष्य पेलण्याएवढं कठीण होऊन बसलं. 

भांडारकर संस्थेची संशोधित प्रत 
संशोधित प्रत (Critical Edition) म्हणजे महाभारताच्या अनेक प्रतींचा अभ्यास करून बनविलेली तौलनिक प्रत.  एक अशी प्रत की जी कालौघात बरीच मागे जाईल व अनेकविध प्रकारांनी महाभारतात पडलेली अनावश्यक भर दूर करेल.  यापूर्वी आपल्याला उपलब्ध असलेली शेवटची सर्व समावेशक प्रत, छत्रपतींच्या शिवरायांना समकालीन असलेल्या सतराव्या शतकातील निळकंठ याची होती.  निळकंठ चतुर्धर या महाराष्ट्रीय संस्कृत पंडिताने भारतातल्या बऱ्याच प्रतींचा अभ्यास करून, स्वतःच्या संस्कृत टिपणांसह ही सर्वसमावेशक प्रत काशी(वाराणशी) येथे  बनविली. 

भांडारकर इन्स्टिट्यूट मे १९२० च्या सुमारास संशोधित प्रत बनविण्याचे काम हाती घेतले. औंध संस्थानाचे श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी त्या काळी या प्रकल्पासाठी सुमारे एक लक्ष रुपयांची मदत केली होती.डॉक्टर विष्णू सुखटणकर १९२५ च्या सुमारास आपली डॉक्टरेट पूर्ण करून भारतात परतले आणि त्यांनी या कामात आपल्याला झोकून दिले.  त्यासाठी त्यांनी भारतभर विखुरलेल्या विविध भाषातील महाभारताच्या प्रतींचा तौलनिक अभ्यास करायचे ठरविले.  यात काही प्रतींमध्ये फक्त काही पर्वेच सापडली (त्यात संपूर्ण अठरा पर्वे नव्हती).  सुखटणकर यांच्या या पद्धतशीर अभ्यासाचा हेतू हा होता की महाभारताची जास्तीत जास्त जुनी प्रत प्रसिद्ध करणे. म्हणजे असे करताना त्यात भरीला घातले गेलेले चमत्कार, रूपके  इत्यादी आपोआपच गळून पडतील.  

महाभारताची विविध हस्तलिखिते केवळ देशाच्या विविध भागातच  नाही तर नेपाळ, जावा अशी भारताबाहेर देखील आढळली.  भांडारकर संस्थेने अशी देशाच्या अनेक भागात  विखुरलेली हस्तलिखिते एकत्र केली. त्यांचा अभ्यास करून जुन्यात जुन्या प्रतीत एखाद्या पर्वात कोणते श्लोक होते व कोणते नव्हते ते पाहिले,  व त्यातून भांडारकर संस्थेची एक प्रत प्रसिद्ध केली. १९४३ च्या सुमारास डॉ सुखटणकरांचे निधन झाले त्यांच्यानंतरही सुमारे २३ वर्षे, त्यांचे सहकारी श्री दांडेकर, श्री बेलवलकर , पा.वा.काणे , गजेंद्रगडकर, व्ही.के.राजवाडे, उटगीरकर  यांनी हे काम सुरु ठेवले व ते १९६६ च्या सुमारास पूर्ण केले. आज अभ्यासकांमध्ये भांडारकर संस्थेची (BORI) हीच प्रत प्रमाण मानली जाते. अशा प्रकारे तयार केलेली ही प्रत आपल्याला इसवी सन १००० च्या सुमारास अस्तित्वात असलेल्या महाभारतीय काव्याच्या जवळ घेऊन जाते. म्हणजेच निळकंठ यांच्याही सुमारे सहाशे ते सातशे वर्षे आधी. पण अर्थातच हि प्रत म्हणजेच खरे महाभारत असे आपल्याला अजूनही म्हणता येत नाही

भृगु सिद्धांत
डॉक्टर सुखटणकर यांना विविध हस्तलिखितांचा अभ्यास करताना असे लक्षात आले की हे काव्य इसवी सनाच्या उत्तर काळात कधीतरी भृगु कुलातील ऋषींच्या हाती गेलेले आहे व त्यांनीच आपल्या कुलाचे महत्त्व वाढविण्याच्या दृष्टीने त्यात बरीच भर घातलेली आहे. त्यामुळेच यात ब्राह्मणी गुणगानाची बरीच भर आढळते. 

महाभारतातील प्रक्षेप मानल्या गेलेल्या काही घटना 
यातील सर्वात सुरुवातीचा प्रक्षेप आहे तो गणेश कथेचा,  ज्यात व्यासांनी सांगितलेले महाभारत काही अटींवर श्रीगणेशाने लिहिले  हा.  व्यासमहर्षीच्या काळात कोणतीही लिपी अस्तित्वात नव्हती व त्यामुळे भर होता तोच स्मृतींवर.   महाभारत कथा शतकानुशतके स्मृतींवर पुढे सरकली व जेव्हा कधी लिपीची निर्मिती झाली त्यावेळी ते हस्तलिखितात उतरवले गेले.  त्यातही संस्कृत केवळ देवनागरी लिपीतच लिहिले गेले असे मानण्याचे काहीच कारण नाही.  कारण देवनागरी लिपी ही साधारणपणे इसवी सन एक हजार च्या आसपास सुस्थितीला पोहोचली असावी असे मानण्यात येते. 

आता आपण अशा काही घटना पाहू कि ज्या खूप प्रसिद्ध आहेत पण भांडारकर प्रतीने त्यांना उत्तरकालीन प्रक्षेप ठरविले आहे. यात मुख्यत्वेकरून 
  • कणिक नावाच्या मंत्र्याने लाक्षागृह प्रसंगी धृतराष्ट्राला सांगितलेली कणिक नीती ,
  • द्रौपदीने स्वयंवराच्या वेळी कर्णाला सूतपुत्र म्हणाल्याचा उल्लेख
  • द्रौपदीला वस्रहरणाच्या वेळी कृष्णाने वस्त्रे पुरविल्याची घटना , 
  • द्रौपदीला सूर्याने थाळी दिली व त्यामुळे दुर्वास तिचे सत्वहरण करू शकले नाहीत हि घटना, 
 या काही घटना येतात. इतर अशा घटना आपण याच ब्लॉगवर पुढे सविस्तर पाहूच. 

सुखटणकरांची पद्धत 
भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिटयूट (BORI) या संस्थेने भारतातील सर्व भाषांतील हस्तलिखिते व मुद्रित प्रति मिळविल्या. यात उत्तरेकडील काश्मीर भागातील शारदा लिपीतील व याच भागातील (काश्मीर व उत्तरेकडील) देवनागरी हस्तलिखितांचा देखील  समावेश होतो. मध्य पूर्वेकडील भागातून (गंगा यमुना प्रदेश) नेपाळी, मैथिली व बंगाली भाषेतील प्रतीचा एक वेगळा गट तयार केला . दक्षिणेकडील तेलगू + ग्रंथ लिपीतील हस्तलिखिते व मल्याळम हस्तलिखिते हि दक्षिण गटात मोडतात. सुखटणकरांनी केलेली वर्गवारी सोबतच्या तक्त्यात दाखविली आहे. हि वर्गवारी ग्रीक अक्षरांनी दर्शविली जाते. 

(१) अशी १२ लिप्यांमधील सुमारे १२५९ हस्तलिखिते त्यांनी जमविली पण प्रत्यक्षात अभ्यासाअंती केवळ ७३४ हस्तलिखितं वापरता आली. 
(२) यात एकाच पर्वाच्या पूर्णपणे वेगळ्या आवृत्त्यांमध्ये त्याचा अंतर्भाव असेल तर तो श्लोक संशोधित आवृत्तीत घेतला गेला. 
(३) काही न पटणाऱ्या (चमत्कार, वर, शापांशी निगडित असूनदेखील) गोष्टी जर सर्व मूळ आवृत्त्यांमध्ये सापडत असतील आत त्या संशोधित आवृत्तीत देखील राखल्या गेल्या. यात पांडूच्या निधनानंतरच्या वर्णनाचे उदाहरण देता येईल. यात त्याचे वनात दहन केले असे उल्लेख आहेत व त्याचबरोबर पांडू व माद्रीचे शव हस्तिनापुरात आणून तेथे दहनसंस्कार झाले असेही उल्लेख आढळतात व हे दोन्हीही परस्परविरोधी उल्लेख संशोधित आवृत्तीत ठेवले गेलेले आहेत. 
(४) जेव्हा आवृत्त्यांमध्ये वर्णनाचे फरक आढळले तेव्हा जास्तीत जास्त आवृत्त्यांमध्ये आढळले गेलेले वर्णन संशोधित आवृत्तीत ठेवले गेले. 
(५) वर्णनाची भर असलेले श्लोक, समागमाचे वर्णन वगळण्यासाठी तयार केलेले पर्यायी श्लोक यांचा योग्य तो विचार करून त्यातील मुख्य तथ्यांश शोधून तो संशोधित आवृत्तीत राखला गेला. 

काश्मीरमधील शारदा लिपीतील भूर्जपत्रांवरील हस्तलिखितांचा या कमी बराच उपयोग झाला.य. मुख्य म्हणजे यातील एका श्लोकात आदिपर्वातील श्लोकसंख्येचे वर्णन करणारा एक श्लोक आढळला ज्यातील श्लोकसंख्या (७९८४) संशोधित आवृत्तीने काढलेल्या श्लोकसंख्येशी तंतोतंत जुळली , तो श्लोक असा 

सप्त श्लोकसहस्त्राणि तथा नव शतानिच  ।
श्लोकाश्च चतुराशीति ग्रंथो दृब्द्धो  महात्मना ।।

यातील फक्त आदिपर्वातील एकूण श्लोकसंख्या ७९८४ एवढी सांगितली आहे तर निळकंठ प्रतीत ती ८८८४, कुंभकोणम (दक्षिण) प्रतीत १०८८९ एवढी होती. 

या सर्व अभ्यासासाठी BORI ला क्षेमेंद्र च्या भारतमंजिरी, देवबोध यांच्या ज्ञानदीपिका , अर्जुनमिश्र यांच्या भारतसंग्रहदीपिका , निळकंठ यांच्या भावार्थदीपिका, तसेच विमलबोध व सर्वज्ञ नारायण यांच्या ग्रंथ टिपांचाही बराच उपयोग झाला. 

BORI चे हे कार्य खरोखरच अवजड शिवधनुष्य पेलणारे महान कार्य होते व ते वर उल्लेखलेल्या संशोधकांबरोबरच तर अनेक संशोधकांनी ४ दशकांहून अधिक काळ अपार परिश्रम घेत पार पाडले. 

Friday, April 02, 2021

जनमेजयाचे सर्पसत्र कि नाग वंशियांचे हत्याकांड ?

जनमेजयाचे सर्पसत्र - राजा रविवर्मा - इंटरनेट वरून साभार
महाभारत कथेत पडलेली भर अभ्यासायची असेल तर सुरुवातीपासूनच ते चिकित्सकपणे अभ्यासायला हवे. त्यातील रूपके , उपकथानके यांची त्यात भर पडत गेली, हे आपल्याला थोड्याश्या चिकित्सक नजरेने पाहताच लक्षात येते.   यासाठी आपण महाभारताच्या सुरुवातीचे कथानक पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल कि या सर्पसत्रात सांगितले गेलेले महाभारताचे कथानक हा कदाचित असाच विध्वंस पुन्हा टाळण्यासाठी केलेला उपदेश असावा . कसे , ते आपण आता पाहू . 

महाभारताची सुरुवात होते ती राजा जनमेजयाच्या सर्प सत्राच्या कथेपासून. येथे व्यासांच्या उपस्थितीत (यासाठी व्यासांचे वय १५० वर्षांपेक्षा जास्त असायला हवे) व्यासशिष्य वैशंपायनाने महाभारत श्रोत्यांना ऐकविले. या सर्पसत्राचे कारण होते राजा परिक्षिताचा सर्पदंशाने झालेला मृत्यू.

राजा परीक्षित शमीक ऋषींवर सर्प टाकताना (इंटरनेट वरून साभार)
महाभारतीय कथेनुसार , युधिष्ठिरानंतर राज्यावर आलेला अभिमन्यूपुत्र परिक्षित बरीच वर्षे (त्याच्या वयाच्या ६० वर्षांपर्यंत?) रा
ज्य करतो. एकदा तो वनात शिकारीला गेलेला असताना एका मृगाला बाण मारतो. जखमी अवस्थेत तो मृग जंगलात निसटतो व त्याचा पाठलाग करीत परीक्षित दाट जंगलात  शिरतो. अरण्यात पुढे गेल्यावर त्याला एक ऋषी ध्यानस्थ असलेले दिसतात. त्यांना (शमीक ऋषींना) भूक व तहानेने व्याकुळ झालेला राजा, तो मृग कोणत्या दिशेनं गेला ते विचारतो पण त्यांचे मौनव्रत असल्याने त्याला काहीच उत्तर मिळत नाही. म्हणून राजा परिक्षित चिडून शेजारी मरून पडलेला एक सर्प बाणाच्या टोकाने उचलून ऋषींच्या अंगावर टाकतो व निघून जातो. शमीक ऋषींना त्याचे काहीच वाटत नाही पण त्यांचा पुत्र शृंगी याला ती बातमी कळल्यावर तो संतापाच्या भारत राजा परिक्षिताला, तू ७ दिवसात सर्पदंशाने मृत्यू पावशील, असा शाप देतो. 

शृंगी जेव्हा आपण दिलेल्या शापाबद्दल आपल्या पित्याला, शमीक ऋषींना, सांगतो तेव्हा ते राजा परीक्षिताचे गुणगान करतात. असा शाप अनाठायी दिल्याबद्दल ते शृंगीला बोल लावतात व आपला एक शिष्य गौरमुख याला हि बातमी कळविण्यासाठी राजा परीक्षिताकडे पाठवितात. 

उंच मनोऱ्यावर परीक्षित - मुघलकालीन चित्र (इंटरनेटवरून साभार)
राजा परीक्षित या बातमीने हादरून जातो व आपला मृत्यू टाळण्यासाठी स्वतःला एका मनोऱ्यात बंदिस्त करून घेतो. शेवटच्या, सातव्या दिवशी, आता कुणी येत नाही या विचाराने तो निर्धास्त झालेला असताना, तक्षक एका सफरचंदातील अळीद्वारे राजमहालात प्रवेश करतो आणि राजाला दंश करतो.. 

परीक्षिताच्या मृत्यूनंतर अल्पवयीन जनमेजय राजा बनतो. यथावकाश काशीराज सुवर्णवर्मा याची कन्या वपुष्टमा हिच्याशी त्याचा विवाह होतो व तो सुखाने राज्यकारभार करू लागतो. 

त्यानंतर काही वर्षांनी राजा जनमेजय आपल्या पित्याच्या मृत्यूबद्दल आपल्या अमात्यांकडे चौकशी करतो आणि त्याला सर्व घटनाक्रम कळतो. तक्षकाच्या दंशाने आपल्या पित्याचा मृत्यू झाला हे कळताच संतापाने तो सर्व सर्प जातीलाच नष्ट करायचे ठरवतो व त्यासाठी सर्पसत्र आयोजित करतो. या सर्पसत्रात बरेच सर्प मृत्युमुखी पडतात व शेवटी तक्षकाची पाळी येते तेव्हा तक्षक इंद्राच्या पाठी लपतो. यावर “इंद्राय स्वाहा , तक्षकाय स्वाहा “ अशी दोघांचीही आहुती देण्याच्या क्षणी,  जरत्कारु नावाच्या ऋषींचा, जरत्कारु नावाच्याच पत्नीपासून  (हि वासुकी नागाची भगिनी म्हणजेच नाग कुळातील स्त्री) झालेला पुत्र, आस्तिक, जनमेजय राजाला प्रसन्न करून हे सर्पसत्र थांबविण्याचा वर मागून घेतो आणि तक्षकाचा नाश थांबवितो.

सर्प सत्राचा अर्थ 
लौकिक पातळीवर या साऱ्या घटनेचा अर्थ आपल्याला कसा लावता येईल ते आपण पाहू. या कथेत आपल्याला दिसते ते सुमारे ४ पिढ्या चालत आलेले पांडव-नाग कुळांचे वैर, ज्याची सुरुवात होते, कृष्णार्जुनांच्या खांडववन दहनापासून. या दहनात अनेक नाग कुळे नष्ट झाली पण तक्षक नाग (हे तेथील नाग कुल प्रमुखाचे नाव असावे ) मात्र त्यावेळी खांडव वनात नसल्याने बचावला व नाग कुळाचे पांडवांशी वैर जडले. 

परीक्षित शिकारीसाठी रानात गेल्यावर त्याने मृग नव्हे तर, या नागकुळातील कुणाचा तरी रानात पाठलाग केला असेल अथवा  हत्या केली असेल. त्यामुळेच त्या कुलप्रमुखाने परीक्षिताचीच हत्या करायची प्रतिज्ञा (हा शृंगी ऋषींचा शाप म्हणून दर्शवला गेला) केली व ती अमलात आणण्यासाठी विषारी सफरचंद अथवा प्रत्यक्ष विषारी सर्पाचा उपयोग केला असावा. परीक्षिताचा मृत्यू हि हत्याच आहे व ती नाग वंशियांनी घडवून आणली  हे काही वर्षांनंतर मोठा झालेल्या व राज्यशकट हाकणाऱ्या जनमेजयाला समजले व म्हणूनच त्याने नाग जमातीला समूळ नष्ट करायचे ठरविले व त्यांच्या विरुद्ध मोहीम उघडली. यात त्याने बऱ्याच नाग कुळांचा निर्वंश करण्याचा सपाटा लावला. यात वासुकी, ऐरावत, कौरव्य, तक्षक, धृतराष्ट्र  अशा विविध नाग कुळातील असंख्य नाग मृत्युमुखी पडले. याला घाबरून तक्षक नाग उत्तरेकडे पळाला व तो इंद्राच्या आश्रयासाठी देवलोकी गेला. हा देवलोकाचा भाग हिमालयाच्या पलीकडे किंवा काश्मीरच्या उत्तरेकडे असावा, व म्हणूनच राजा जनमेजयदेखील त्याच्या पाठी उत्तरेकडे म्हणजे तक्षशिला जवळच्या प्रांतात तळ देऊन होता. यावेळी या महाभारत कथा सांगणाऱ्या वैशंपायन यांचा उद्देश, या वैराची परिणती महाभारतीय युद्धासारखे युद्ध पुन्हा घडून येऊ नये, हा असावा. अशा प्रकारच्या युद्धाने अपरिमित हानी होऊ शकते आणि हेच याच्या ३ पिढ्या आधी घडून आलेले आहे हे जनमेजयाला अवगत करून दिले आणि आस्तिकाने देखील जनमेजयाला प्रसन्न करत हा नागसंहार थांबवला. 

कोणत्याही यज्ञात अशा प्रकारे विविध ठिकाणाहून सर्प येऊन पडणे शक्य नाही व नाग जमातीचा मात्र प्रचंड प्रमाणात संहार राजा जनमेजयाने घडवून आणला हे स्पष्ट करण्यासाठी रचलेल्या कथांमध्ये, महाभारतातील या घटनांचे वर्णन करताना त्यात नंतर अनेक रूपक कथा / उपकथा यात जोडल्या गेल्या. एका पिढीजात वैराला चमत्कारांचे व वर-शाप कथांचे स्वरूप देऊन या साऱ्यांचे एक वेगळेच स्वरूप आपल्या समोर उभे केले गेले. हस्ते परहस्ते पुढील पिढीकडे मौखिक स्वरूपात जाणाऱ्या महाभारताचा प्रचंड विस्तार आपण या पातळीवर हळू हळू उलगडू शकतो. 


Friday, March 26, 2021

महाकाव्याची भव्यता

महाभारताचे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे.  सुमारे एक लक्ष श्लोकांसह जगातील सर्वात मोठे काव्य म्हणून मान्यता पावलेले महाभारत जिथून सुरु होते तिथेच ते संपते  देखील. हे कसे? आपण जी कथा वाचतो ही कथा लोमहर्षण (अथवा रोमहर्षण)  यांचा पुत्र उग्रश्रवा सौती  नैमिषारण्यातील शौनकादि ऋषींना सांगतो तेथपासून.  आता आपण या कथेचा उगम पाहू.

महाभारत युद्धामध्ये कौरव-पांडवांकडील सर्व योद्धे मारले जातात व वाचतात केवळ पांडव. पांडवांचा वंश शिल्लक राहतो तो केवळ अर्जुन-पुत्र अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या पोटी. युद्धानंतर ३६ वर्षे युधिष्ठिर राज्य करतो व

पांडवांच्या पश्चात अभिमन्यूपुत्र परीक्षित राजा होतो आणि पांडव स्वर्गारोहणाला निघून जातात. राजा परीक्षिताचा मृत्यू सर्प दंशाने होतो व हे कळल्यावर परीक्षिताचा पुत्र (अभिमन्यूचा नातू)
राजा जनमेजय हे सर्पसत्र (सर्पसत्र म्हणजे सर्पांची आहुती देणारा यज्ञ) आयोजित करतो. या यज्ञासाठी आलेले वैशंपायन नावाचे ऋषी राजा जनमेजयाला आपल्या आजोबा-पणजोबांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगण्यासाठी या भारत कथेचं निवेदन करतात. (सर्पसत्र सध्याच्या तक्षशिला परिसरात, जे आता पाकिस्तानात आहे, तेथे झाले असे मानण्यात येते).  त्यांनी हि कथा जय या नावाने व्यास महर्षींच्या तोंडून ऐकलेली असते. त्यात स्वतःच्या उपकथानकांची भर घालून ते त्याला भारत बनवतात.  अशा रीतीने हे एक वर्तुळ पूर्ण होतं. याच यज्ञाच्या ठिकाणी ही कथा सौतीने ऐकली आणि आपल्या अनेक उपकथानकं व रूपक कथांची भर घालून त्याचं जे महाकाव्य बनलं तेच आपण ऐकत / वाचत असलेलं
महाभारत

व्यासांचे जय हे केवळ ८८०० श्लोकांचं असल्याचं मानलं जातं , तर वैशंपायनांचे भारत २४००० श्लोकांचं बनलं. आणि उग्रश्रवा सौतीनी जेव्हा ते नैमिषारण्यात शौनकादी मुनींना सांगितले तेव्हा ते सुमारे १ लक्ष श्लोकांचे बनले (मुख्य महाभारताचे ८४००० श्लोक + १६००० श्लोकांचे खिलपर्व किंवा हरिवंश ) . अर्थात हि सत्यासत्यता आपल्याला तपासून पाहता येत नाही. 

असं हे महाकाव्य भारताच्या किंवा जगाच्या इतर काव्याच्या तुलनेत किती मोठे आहे हे आपण या लेखासोबत असलेल्या एका तुलनात्मक तक्त्याद्वारे पाहू शकतो. महाभारत हे रामायणाच्या सुमारे चार पट मोठे असून इलियड व ओडिसी या ग्रीक महाकाव्यांच्या एकत्रित श्लोकसंख्येपेक्षा देखील चौपट आहे


गणेशाने लिहिलेलं काव्य ?

एवढं मोठं महाकाव्य अस्तित्वात कसं  आलं असेल ?  हे देखील एक कोडंच आहे. याबद्दल असे सांगितलं जाते कि व्यासांना हे काव्य स्फुरलं व त्यांना ते लिहून घेण्यासाठी श्री गणेशाला विनंती केली. गणेशाने देखील ते मान्य करताना एक अट घातली कि व्यासांनी ते सांगताना कोठेही थांबायचं नाही. व्यासांनी देखील हि विनंती मान्य करताना श्री गणेशाला एक प्रति अट घातली कि त्यानेदेखील यातील प्रत्येक श्लोक समजावून घेतल्याशिवाय शब्द बद्ध करायचा नाही. दोघांनी एकमेकांच्या अटी मान्य करत या महाकाव्याच्या निर्मितीला आरंभ केला. महर्षी व्यासांनी देखील स्वतःच्या निर्मितीला वेळ मिळण्यासाठी काही कूट श्लोकांची निर्मिती केली व एक महाकाव्य जन्माला आलं .

पण खरंच असं घडलं असेल का ? हि कथा कशी आली , गणपती हे दैवत संपूर्ण कथेत कुठेच आढळत नसताना लेखनिक म्हणून कसं आले. यातील अशा अनेक कथांचा उहापोह आपण प्रक्षिप्त म्हणजे नक्की काय?  व भांडारकर संस्थेच्या डॉ सुखटणकर व त्यांच्या चमूने ते कसे ठरविले हे पुढील लेखात पाहू .


Monday, March 15, 2021

औक्षोहिणीच्या गणिताची वास्तवता

महाभारत युद्ध म्हटले कि आपल्या डोळ्यासमोर १८ औक्षोहिणी सेनेच्या युदधाचा एक भलामोठा पट उभा राहतो . पण हे १८ औक्षोहिणी म्हणजे नक्की किती ? व एवढे सैन्य खरोखरीच अस्तित्वात होते का? महाभारतातील आदिपर्वाच्या दुसऱ्या अध्यायात दिलेल्या माहितीवरून घेतलेला हा वेध .

महाभारताच्या १८ पर्वांमधे वर्णन केलेल्या, महाभारतातील १८ दिवसांच्‍या कौरव-पांडव युद्धा मध्ये १८ औक्षोहिणी  सेना सहभागी झाली होती .  या औक्षोहिणी शब्दाचा अर्थ व त्यातील विविध सेना विभागांची संख्या महाभारताच्या आदिपर्वातील  दुसऱ्या अध्यायातच सुमारे ९ श्लोकांमध्ये विस्ताराने दिलेली आहे.  यानुसार एक औक्षोहिणी सैन्यात २१८७० गज (हत्ती) व तितकेच रथ असतात, अश्वांची संख्या ६५,६१० असून पदाती सैनिकांची संख्या १,०९,३५० असते यातील छोट्या-छोट्या विभागांसाठी चढत्या क्रमाने पत्ती, सेनामुख,  गुल्म, गण, पृतना, चमू व अनीकिणी अशी नावे आहेत. यांचे परस्परसंबंध व चढती भाजणी खालील तक्त्यामध्ये दर्शविली आहे.

संज्ञा

गुणक

रथ

हत्ती

अश्व

पायदळ

पत्ती

सेनामुख

३ पत्ती

१५

गुल्म

३ सेनामुख

२७

४५

गण

३ गुल्म

२७

२७

८१

१३५

वाहिनी

३ गण

८१

८१

२४३

४०५

पृतना

३ वाहिनी

२४३

२४३

७२९

१२१५

चमू

३ पृतना

७२९

७२९

२१८७

३६४५

अनीकिणी 

३ चमू

२१८७

२१८७

६५६१

१०९३५

औक्षोहिणी

१० अनीकिनी

२१८७०

२१८७०

६५६१०

१०९३५०

 कौरवांच्या बाजूने लढलेले एकूण सैन्य = ११ x १०९३५० = १२,०२,८५०

आणि पांडवांच्या बाजूने लढलेले एकूण सैन्य = ७ x १०९३५० = ७,६५,४५०

म्हणजेच युद्धातील एकूण सैन्य = १८ x १०९३५० = १९,६८,३०० (सुमारे २० लाख माणसे )

एवढे प्रचंड मनुष्यबळ खरोखरीच होते काय ?

याचाच अर्थ असा की या श्लोकांनुसार सुमारे २० लाख मनुष्य सैनिक कुरुक्षेत्रावर एकवटले होते.  एवढ्या प्रचंड मनुष्यबळासाठी अर्थातच जेवणखाण तयार करण्यासाठी आचारी,युद्ध तयारीसाठी, शस्त्रास्त्र तयारीसाठी, निवास, पाणी, जनावरांची देखभाल आणि दाणा पाणी करण्यासाठी, रथांची डागडुजी करण्यासाठी, जखमींवर मलमपट्टी इत्यादींसाठी अजून किमान लाखभर तरी माणसांची आवश्यकता पडेल.  तत्कालीन लोकसंख्या पाहता ही गोष्ट अशक्यप्राय वाटते. या एवढ्या लढाऊ सैनिकांवर अतिरिक्त न लढणारे व कामासाठी उपयोगात आणले जाणारे विविध प्रकारचे कारागीर जसे रस्ता दुरुस्ती साठी लागणारे कारागीर भाले तलवारी धनुष्य-बाण इत्यादी शस्त्रास्त्रे तयार करण्यासाठी लागणारे कारागीर, याच बरोबर जनावरांची कातडी कमावून पाण्याच्या पखाली बनवण्यासाठी चर्मकार, या व्यक्तींची देखील या युद्धासाठी आवश्यकता होती. युद्धाशी निगडित असणाऱ्या या सर्व व्यक्तींना व्यतिरिक्त अनेक स्त्रिया, युद्धात भाग न घेणाऱ्या इतर व्यक्ती म्हणजे बालके, वृद्ध, अपंग या सगळ्यांचा एकत्रितपणे विचार केला तर तत्कालीन लोकसंख्या काही कोटींच्या घरात असायला हवी जी गोष्ट अशक्यप्राय वाटते.      

अबब - किती हत्ती , किती घोडे ?

या औक्षोहिणी सैन्याच्या उल्लेखा मध्येच अश्व, गज  इत्यादी प्राण्यांच्या संख्यादेखील दिलेली  आहे.  या प्रत्येक औक्षोहिणी  मागे २१८७० गज (हत्ती)  आणि ६५६१० अश्व म्हणजेच एकूण सुमारे ४ लाख  हत्ती आणि बारा लाख अश्व सांभाळणे व त्यांच्या खाण्यापिण्याची आणि देखभालीची व्यवस्था करणे भाग आहे. यातील रथांची संख्या देखील औक्षोहिणी मागे २१,८७० एवढी आहे म्हणजेच सुमारे चार लाख रथ युद्धात वापरले गेले असले  तर ते बनवण्यासाठी प्रचंड कारागीर,लोखंड, लागेल.  सर्व च रथ इतर प्रदेशातून आणणं शक्य नसल्यामुळे त्यातील बरेचसे  रथ हस्तिनापुर मध्येच बनवले असण्याची आवश्यकता आहे. तसेच त्यांची दुरुस्ती देखील तेथेच व्हायला हवी म्हणजे ते दुरुस्त करणारे कुशल कारागीर देखील इतर प्रदेशातून हस्तिनापुर कडे यायला हवे.              

या महायुद्धात १८ औक्षोहिणी  सेनेचा नाश झाला मात्र अश्व, गज यासारख्या जीवित राहणाऱ्या  प्राण्यांना कोणी विनाकारण मारत नाही त्यामुळे यातील काही लाख प्राणी तरी निश्चितच मागे उरले असतील. हे सर्व आणले कुठून व  त्यांचे पुढे काय झाले ? पण त्यांच्या बद्दलचा कोणताही उल्लेख महाभारतात येत नाही, कारण त्यांची संख्याच प्रत्यक्षात एवढी मोठी नाही.     

या सर्व गोष्टी विचारात घेता एवढी प्रचंड मनुष्य संख्या या युद्धात असणे शक्य नाही असे वाटते याचे कारण मुख्यत्वे युद्ध करण्यास धडधाकट असणारी एवढी  लोकसंख्या तत्कालीन भारत वर्षात अस्तित्वात नव्हती.  याच्या स्पष्टीकरणासाठी  उदाहरण म्हणून आपण महाभारतातील एक छोटासा प्रसंग पाहू.           

विराटाचे युद्ध ... नेमके किती मोठे ?

विराटाचा  मेहुणा  व सेनापती किचक  आणि त्याचे १०५ बंधू (उपकिचक)  यांचा भीमाने अज्ञातवासात असताना वध केला.  ही बातमी हस्तिनापुरात पोहोचताच ,विराटचे राज्य आता दुबळे झाले आहे व त्यांचे गोधन (जी तत्कालीन मुख्य संपत्ती होती) आपल्याला सहजपणे लुटता येईल या उद्देशाने प्रथम त्रिगर्तराज सुशर्मा याने  विराटावर हल्ला केला. हा  हल्ला परतविण्यासाठी विराटाला  बृहन्नडा रूपातील अर्जुन वगळता,  इतर चार पांडवांची ही मदत घ्यावी लागली ज्यात आचारी असलेला भीम देखील होता.  या सर्वांनी मिळून सुशर्माचा पराभव केला पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूने गोधन लुटण्यासाठी कौरवांनी  हल्ला केला. या हल्ल्यात देखील भीष्म, द्रोण, कर्ण इत्यादी वीरांना  पण सहभागी व्हावे लागले होते.  केवळ गोधन लुटण्यासाठी एवढे सारे वीर  मग याचा अर्थ लढाऊ सैनिक फार उपलब्ध नव्हते का ?           

तिकडे विराटाची परिस्थिती पहा.  त्याचे सैन्य म्हणजे जमवाजमव केलेले मिळेल त्या हत्याराने थोडेफार लढू शकणारे नगरजन असावेत . ते सर्व देखील  सुशर्माशी  लढायला गेल्यावर राजपुत्र उत्तर कडे थोडीफार माणसे असावीत पण कौरव सेनेवर चालून रथातून जाण्याकरता सारथी देखील नव्हता आणि ते काम बृहन्नडा रुपी अर्जुनाला कराव लागलं.  ज्यात त्याने नंतर गांडीव धनुष्य हातात येत कौरव महारथी  त्यांच्या थोडक्या सैन्याचा पराभव करीत कुरूंचं आक्रमण परतवून लावलं. या सर्व प्रसंगांवरून आपल्या असे लक्षात येते कि या गो-ग्रहण युद्धात  सुशर्माचे शे दोनशे सैनिक असावेत व विराटाचे थोडे जास्त. कुरुंचेही सैन्य फार नसावं व  त्यामुळेच अर्जुन त्यांना सहज हरवू शकला . एकंदरीतच या सर्व प्रसंगात विराटासारख्या लहान राजाची व सुशर्मा व कुरु या सर्वांची मिळून ५०० माणसं देखील नसावीत .           

महाभारतीय युद्ध हे महायुद्ध  असल्याने त्यात सैनिकांची हस्तिनापुरात लढण्यायोग्य सैनिक व तसेच विविध राजांकडून केलेली जमवाजमव पाहता हि संख्या जास्तीत जास्त २० ते २५ हजाराच्या घरात जाईल . यातील हत्तीची संख्या देखील १०-१५ पेक्षा जास्त नसावी (हत्तीचे उल्लेख फारच कमी येतात). मात्र बरेचसे महारथी रथातून लढत असल्याने रथांची संख्या ५०-६० असू शकेल. घोडा हा प्राणी युद्धात वापरला जात असला तरी घोड्यांवरून युद्ध केल्याचे उल्लेख नाहीत, म्हणजेच तो मुख्यत्वेकरून रथांसाठीच वापरला जात असावा असे वाटते,           

द्वंद्व युद्धाने एवढी मोठी हानी होऊ शकेल ?

आणखी एक गोष्ट विचारात घेतली पाहिजे ती म्हणजे युद्ध ज्या प्रकारे लढले गेले तो प्रकार बहुतांशी द्वंद्वयुद्धाचा  होता. एक वीर दुसऱ्या (एकाच) वीराशी त्याच्या शस्त्र कौशल्यानुसार लढत होता.  या प्रकारात एवढ्या मोठ्या सैन्यासाठी धनुष्यबाण , तलवारी, भाले , गदा यांसाठी प्रचंड प्रमाणावर लोखंड लागेल, जे उपलब्ध असेल कि नाही याची शंकाच आहे.  अस्त्रांचा उपयोग फार कमी होता त्यामुळेच एवढ्या लक्षावधी सैन्याची हानी फक्त द्वंद्व युद्धाने केवळ १८ दिवसात होणे शक्य नव्हते.  युद्धात तोफा अथवा अस्त्रे वापरली गेली तरच एवढा मोठा विध्वंस कमी कालावधीत शक्य आहे आणि असे असेल तर मग युद्ध १८ दिवस चालवायची तरी काय आवश्यकता होती.

या सर्वांचा सारासार विचार करता मला असे वाटते कि युद्धातील सैनिकांची संख्या निश्चितच फार मोठी नसावी. मी बांधलेला २०-२५ हजार सैनिकांच्या अंदाजाचा आकडा देखील कदाचित मोठा असू शकेल. एवढ्या मोठया पानिपत युद्धात देखील हि संख्या फक्त सव्वा ते दीड लाखाच्या घरात होती. 

तुम्हाला काय वाटतं ?